शिक्षण क्षेत्रातील एनजीओची लुडबुड थांबवावी

40

🔹पुरोगामी शिक्षक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
—————————————-
गेल्या १० वर्षांपासून एनजीओ संस्था चुकीची आकडेवारी घोषित करत शाळा आणि शिक्षकांची बदनामी करून नवीन उपक्रम शिक्षणक्षेत्रात घुसवतात . त्यात शिक्षकांना राबवून आलेल्या यशाचे श्रेय स्वतः लाटतात . शिक्षक आधीही विद्यार्थी हितासाठी झटत होता , आताही तळमळीने स्वतःला झोकून देत असताना एनजीओ ची शिक्षणक्षेत्रातील लुडबुड जनसामान्यांच्या मनात विष पेरण्याचे काम करीत आहे – अल्का ठाकरे, महिला राज्याध्यक्ष
—————————————-

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15ऑक्टोबर):-पुरातन काळापासून शिक्षक हा राष्ट्रनिर्मितीचे कार्य करीत असून , सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामीण जीवनाचा कणा बनलेला असताना , त्याच्या निर्विवाद कार्यावर ताशेरे ओढून जनमानसात मलिनता पसरवण्यासाठी आज पुरोगामी महाराष्ट्रात चढाओढ पहायला मिळते . यात संस्थेच्या आर्थिक उत्थानासाठी कार्य करताना अनेक एनजीओ मूलभूत हक्क असलेल्या शिक्षणक्षेत्रात अतिरेक करून अदृश्य उत्पादन निर्मितीचा पवित्र क्षेत्र मलिन करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केलेला आहे .

शाळेत येणारा बालक हा स्वतंत्र व्यक्तिमत्व असून त्याचा दहांगी विकास ही अविरत चालणारी प्रक्रिया असताना , राबलेल्या शैक्षणिक धोरणात सुधारणा सुचवण्याऐवजी अनेक एनजीओ सरळ शाळा आणि शिक्षक यांना टार्गेट करून अनुदान लाटण्याचा स्पर्धेत उतरले आहेत . त्यांनी सुचवलेले उपक्रम शिक्षकांनी राबवायचे आणि श्रेय एनजीओला भेटावे ही बुद्धिभेदाची मालिका पुरोगामी संघटनेला मान्य नसून , शिक्षकांना शिकवू द्या . अभ्यासक्रमाचा टार्गेट शिक्षक पूर्ण करण्याबरोबर मूल्यशिक्षणाची रुजणूक करण्यात सक्षम असल्याचा दावा पुरोगामी शिक्षक संघटनेने केला आहे .

परिणामकारक शिक्षण तळागाळात पोहचायचे असेल तर आभासी वास्तव दर्शविणाऱ्या एनजीओ शाळांपासून दूर ठेवून त्यांची लुडबुड शिक्षक आणि समाजात दुरी निर्माण करीत आहे . गुणवत्तेसाठी कार्य करणाऱ्या शासकीय संस्था राज्यात असताना एनजीओ ची लुडबुड कां सहन करायची? गुणवत्तेसाठी या संस्थांना कार्य करू द्यावे. वर्गस्तरावर कार्य प्रत्यक्ष शिक्षकांनी करायचे. पर्यवेक्षिय यंत्रणेने आढावा घेण्यासाठी भेटी द्यायच्या आणि एनजीओ ने आलेल्या यशाचे श्रेय लुटायचे हे थांबणे आवश्यक आहे .अशी विनंती महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समितीच्या एका निवेदनातून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे .