कलेतून उलगडला महामानव डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट

30

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.16ऑक्टोबर):- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नृत्य, गायन आणि संगीत या तिन्ही कलांचा माध्यमातून जीवनपट उलगडण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त घटनेचे शिल्पकार किंवा फक्त दलितांचे नेते नसून देशातील प्रत्येक घटकासाठी आणि प्रत्येक क्षेत्रासाठी व्यापक असे कार्य त्यांनी केले आहे. ते दूरदृष्टी असणारे द्रष्टे नेते होते. त्यांनी समाजातील विविध घटकासाठी भरीव कार्य केले आहे. त्या त्यांच्या विविध कार्य पैलूंवर प्रकाश टाकणारा भीम पर्व ज्ञानसूर्याकडून स्वयंप्रकाशाकडे हा नृत्य, गायन आणि संगीत या तिन्ही कलांचा समावेश असणारा प्रबोधनपर कार्यक्रम राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे मोठ्या उत्सहात पार पडला.

निर्मिती फिल्म क्लब, शिवतेज फिल्म इंटरनॅशनल यांच्या वतीने आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भीम पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भीम पर्व या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन अविनाश गायकवाड यांचे तर लेखन युवराज पाटील यांनी केले आहे. संगीत संयोजन महेश सोनुले यांचे तर नृत्य दिग्दर्शन श्रद्धा शुक्ल व अविनाश गायकवाड यांनी केले आहे. गायन आणि वादन रसिकरंजन वाद्य वृंद यांचे असून केडीसी अकॅडमीचे नृत्यकर्मी यात मोठ्या प्रमाणात सहभागी होते.

भीम पर्व ज्ञानसूर्याकडून स्वयंप्रकाशाकडे या सांस्कृतिक कार्यक्रमास अनिल म्हमाने, डॉ. कपिल राजहंस, ऍड. करुणा विमल, डॉ. नंदकुमार गोंधळी, डॉ. दयानंद ठाणेकर, डॉ. शोभा चाळके, बाजीराव नाईक, तात्यासाहेब कांबळे, विजय कोरे, विमल पोखर्णीकर, अमोल कांबळे, रवींद्र खैरे, राहुल काळे, अरहंत मिणचेकर, अनुष्का माने, सनी येळावकर यांच्यासह फुले शाहू आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.