शिक्षकांच्या दिवाळी वेतनासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची शिक्षक भारतीची मागणी

18

🔸आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पत्र

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.14नोव्हेंबर):- राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या दिवाळीच्या वेतनासाठी कमी पडलेला अपुरा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा यासंबंधीची मागणी आमदार कपिल पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री यांना एका पत्राद्वारे केली आहे. दिवाळी सणासाठी वेतन दिवाळीपूर्वी करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. परंतु दिवाळी संपून १५ दिवसांचा कालावधी होऊनही राज्यातील अनेक जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन झालेले नाही. या वेतनासाठी तरतूद कमी झाल्याचे लक्षात आले असून ही बाब गंभीर असल्याचे आमदार कपिल पाटील यांनी म्हटले आहे.

वेतन न झाल्यामुळे शिक्षकांनी घेतलेल्या गृहकर्ज, बँका, सोसायट्या यांच्या कर्जाचा त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ज्या जिल्ह्यात निधी अपुरा पडला आहे त्या जिल्ह्यात अपुरा पडलेला निधी त्वरित उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. ज्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे वेतन होण्याचा मार्ग मोकळा होईल. राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या दिवाळीच्या वेतनासाठी कमी पडलेला निधी त्वरित उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार कपिल पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री यांना केली असल्याची माहिती शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे यांनी दिली आहे.