धरणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार !…

96

🔹पोलीस आणि पत्रकार यांचा समन्वय समाजहिताचा – पो.नि.राहुल खताळ

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.17नोव्हेंबर):- राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत बुधवार रोजी धरणगाव पोलिसांकडून पत्रकारांचा पोलिस स्थानकाच्या प्रांगणात सत्कार सन्मानाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपनीयचे मिलिंद सोनार यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ तर प्रमुख उपस्थितीत पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, शहराध्यक्ष विनोद रोकडे, जेष्ठ पत्रकार ॲड.व्ही.एस.भोलाणे, के.आर.महाजन, राजेंद्र रडे, डी.एस.पाटील, बी.आर.महाजन, धर्मराज मोरे, शैलेश भाटिया, प्रभुदास जाधव, भगीरथ माळी, पी.डी.पाटील, शेख इब्राहीम, सतिष शिंदे, हर्षल चौहाण, निलेश पवार, लक्ष्मणराव पाटील, विकास पाटील, धनराज पाटील, दिपक पाटील आदी पत्रकार उपस्थित होते.

पत्रकारांचा सन्मान प्रसंगी पो.नि. खताळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पत्रकारिता हे समाजसेवेचे व्रत असून अतिशय प्रामाणिकपणे समाजसेवा करण्याची श्रेष्ठ संधी व भाग्य पत्रकारांना मिळते. समाज प्रसारमाध्यमांना आजही अतिशय आदराने पाहतात. लोकशाहीला अधिक बळकटी देऊन संस्कारक्षम व सृजनशील समाजनिर्मिती करिता पत्रकारांचा मोलाचा सहभाग असल्याचे मत श्री. खताळ यांनी व्यक्त केले.

तद्नंतर पो.उ.नि. अमोल गुंजाळ यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मी पदभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत पत्रकारांची निष्पक्ष पत्रकारिता पहावयास मिळाली असेही श्री. गुंजाळ यांनी सांगितले. यानंतर ॲड. व्ही.टी.भोलाणे यांनी एखाद्या पत्रकाराने एखादा घोटाळा समोर आणला, तर ती लोकं आर्थिक ताकद वापरून प्रसार माध्यमात आलेली ती माहिती कशी खोटी आहे, किंवा तो पत्रकार कसा वैयक्तिक अजेंडा राबवत आहे, अश्या प्रकारे सांगत असतो. यातून संबंधित पत्रकाराची प्रभाविता संपते. पुढे लक्ष्मणराव पाटलांनी सांगितले की, सद्याच्या काळात केंद्र स्तरावरून एखाद्या विशिष्ट समुहाची अर्थात मॅनेज पत्रकारिता पहावयास मिळते. परंतु, धरणगाव तालुक्यातील अधिकृत पत्रकार संघ व इतर पत्रकार बांधव हे निरंतर दीन दुबळ्या, उपेक्षित, दुर्लक्षितांचे प्रश्न मांडण्यासाठी कठीबद्ध असतात. त्याचप्रमाणे धरणगावात तरी निष्पक्षपणे पत्रकारिता केली जाते असा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे.

तद्नंतर डी.एस.पाटील सरांनी पत्रकारिता जेव्हा सामाजिक माहितीच्या केंद्रबिंदूपासून हलते, तेव्हा पत्रकारांची मुस्कटदाबी करणंदेखील सोपं होऊन जातं. पोलिसांकडून पत्रकारांच्या प्रति आदर, स्नेहभाव व्यक्त करून केलेल्या सन्मानबद्दल पो.स्टे. यांचे मनस्वी आभार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, दिवसेंदिवस पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने माध्यम जगतात अस्वस्थतः आणि संतापाची भावना दिसते आहे. पत्रकारांना धमकी दिले जाते, हल्ले होतात, खोटे गुन्हे दाखल केले जातात. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असतानाही दर तीन दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे ही गोष्ट चिंताजनक असून पत्रकारांना निर्भयपणे काम करणे अशक्य झाल्याने पोलिस प्रशासनाने नक्किच दखल घ्यायला पाहिजे, असेही श्री. वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भगीरथ माळी यांनी केले. पो.स्टे.कडून आमचा सन्मान घडवून आणल्याबद्दल सर्व पोलिस बांधवांचे आभार सतिष शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपनियचे वैभव बाविस्कर, ज्योती चव्हाण, विनोद संदानशिव, प्रविण पाटील, विजय धनगर, समाधान भागवत, विजय शिंदे, निलेश बडगुजर, अरुण सातपुते आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.