घोडदेव रस्त्यावरील खड्ड्यावर बेशरमचे झाड लावून शासनाचा निषेध !

29

🔸रस्ता देता का रस्ता, आदिवासीची बांधवांच्या व्यथा कोणी समजून घेणार का ?

🔹डोंगरयावाली – घोडदेव रस्ता देत आहे अपघाताला आमंत्रण !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.21जानेवारी):-तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेला जोडणारे महाराष्ट्रातील शेवटचे घोडदेव गाव पाचशेहून अधिक लोकवस्तीच्या गावाला मागील ५ वर्षापासून आजपर्यंत महत्वाचा रस्ता मिळालेला नाही. त्यामुळे घोडदेव येथील नागरिकांच जगणं मुश्‍कील झालेल्या आदिवासींवर रस्ता देता का रस्ता असं म्हणण्याची वेळ आलीय. “गाव तिथं रस्ता’ ही सरकारची जाहिरात किती फसवी आहे, असे घसा कोरडा करुन आदिवासी बांधव सांगताहेत. पण त्यांचा आवाज यंत्रणेपर्यंत पोहचविण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, उपसरपंच कांचन कुकडे यांच्या नेतृत्वात खड्डेमय झालेला अपघातग्रस्त डोंगर यावली रस्त्यावर बेशरमचे झाड लावून शासनाचा निषेध केला.

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोर्शी वरुड मतदार संघातील विकासासाठी कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर करून आणली होती. मात्र, शिंदे सरकार आल्यानंतर मोर्शी वरुड मतदार संघातील कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांना स्थागिती मिळाल्याने विकासाला ब्रेक लागला आहे. सरकार बदलल्यानंतर मतदार संघातील विकास कामांना स्थगिती देण्यात आली.

डोंगरयावली घोडदेव हा रस्ता ग्रामिण मार्ग क्र. १५ असुन हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे संपूर्ण रस्त्याचा पृष्ठभाग खराब झाला आहे, सदर रस्त्यावर ३०५४ म्हाडा मिनीमाडा ३०४४/०३०६ व ३०५४/०४०७ या लेखाशिर्षका अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सा. क्र. ०/०० ते १/२०० मध्ये रस्ता सुधारण्याचे रुपये ३० लक्षाचे काम मंजुर आहे. तसेच ३०५४ गट ब अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये सा.क्र. १/०० ते २/५०० रुपये २० लक्षांचे काम मंजुर असुन दोन्ही कामे निवीदा स्तरावर आहे. मात्र या कामांना सद्या स्थितीत शिंदे सरकारने स्थगिती दिल्यामुळे दोन्ही कामाची निवीदा प्रक्रीया झालेली नाही.

मोर्शी तालुक्यातील डोंगर यावली ते घोडदेव रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत असून हा रस्ता मृत्यूला निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्यावर बेशरमचे झाड लावून शासनाचा निषेध व्यक्त करून सदर कामावरील स्थगिती उठऊन त्वरीत रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, उप सरपंच कांचन कुकडे, मनीष गुडधे, विजय गांजरे, सतीश पंडागडे, अनुप राऊत, सात्विक बारस्कर, संचित गांजरे, ऋषिकेश गांजरे, आदर्श ठाकरे, कृणाल सातपुते, अक्षय म्हस्के, बाबू शेंडे यांनी केली आहे अन्यथा तिव्र आंदोलन करन्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे.

डोंगर यावली घोडदेव अवघे दोन किमी अंतरावर आहे, परंतू या दोन किमीचे अंतर रस्त्यावरील खड्ड्यामुळे २०० किमी झाले आहे. रस्त्यावरील खड्डे पाहता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती झाली आहे. दोन किमीच्या या संपूर्ण रस्त्याची अवघी चाळणी झाली असून दररोज लहान -मोठे अपघात होत आहेत. परंतू स्थगिती सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते, परंतू शासनाला त्यांच्याशी काहीएक देणेघेणेच नसल्याचे शासनाच्या कार्यप्रणालीवरुन दिसून येते.