भारतीय संविधान वाचणे व वाचवणे काळाची गरज : ॲड. विवेक घाटगे

30

🔸भारतीय संविधान : का वाचावे? का वाचवावे? ग्रंथाचे प्रकाशन

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.2फेब्रुवारी):-आपल्या भारत देशाच्या दृष्टीने भारतीय संविधान महत्वाचे असून हे भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांनी वाचायला पाहिजे. आज काही लोक संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे भारतीय संविधान जसे वाचण्याची गरज आहे, तसेच ते वाचवण्याची देखील गरज आहे असे प्रतिपादन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे उपाध्यक्ष ॲड. विवेक घाटगे यांनी केले. ते भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निर्मिती प्रकाशन प्रकाशित ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई लिखित भारतीय संविधान : का वाचावे? का वाचवावे? या महत्वपूर्ण सैद्धांतिक ग्रंथाच्या प्रकाशन समारंभा प्रसंगी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे बोलत होते.

यावेळी लातूरचे ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे म्हणाले, आजच्या काळात भारतीय संविधान घराघरात पोहोचण्याची व सर्वांनी नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. भारतीय संविधानाचा अनेक लोक चुकीच्या पद्धतीने अर्थ लावत आहेत. गैरसमज पसरवत आहेत. ते रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

यावेळी संविधानाचे अभ्यासक जॉर्ज क्रुज म्हणाले, प्रशासकीय क्षेत्रामध्ये जायचे असेल तर भारतीय संविधानाचा विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास केला पाहिजे. लोकशाही धोक्यात आली असून लोकशाही वाचवायची असेल तर भारतीय संविधान वाचवण्यासाठी एक व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे. भारतातील सर्वसामान्य माणसाला देखील भारतीय संविधान समजणे गरजचे आहे.

स्वागत व प्रास्ताविक निर्मिती प्रकाशनाचे प्रकाशक अनिल म्हमाने यांनी केले. सूत्रसंचालन सुनिल कांबळे यांनी केले तर आभार सुरेश केसरकर यांनी मानले.प्रकाशन समारंभास संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ. शोभा चाळके, मधुकर शिर्के, मिलिंद यादव, अ‍ॅड. करुणा विमल, मोहन मिणचेकर, बाजीराव नाईक, बाबासाहेब कश्यप, रुपाली व्हटकर यांच्यासह संविधान प्रेमी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.