दैवी स्वरांची देणगी लाभलेल्या लतादीदी!

33

आपल्या मंजुळ आवाजाने संपूर्ण जगाला मोहिनी घालणारी भारताची गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतिदिन. लता मंगेशकर यांचा आवाज म्हणजे जगातील आठवे आश्चर्य होते. त्यांचा आवाज म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर येथे एका गोमंतकीय कुटुंबात झाला. लता दिदींना गायनाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते. त्यांच्या वडिलांकडूनच त्यांनी गायनाचे धडे गिरवले. तेच त्यांचे गायनातील पहिले गुरू होते. लता दिदींना लहानपणी हेमा नावाने हाक मारली जायची पण मास्टर दीनानाथ यांच्या एका नाटकातील नाव लतिका असे होते या नावावरूनच त्यांनी त्यांचे नाव लता असे ठेवले.

हेच नाव आज जगातील आठवे आश्चर्य ठरले. आपल्या वडिलांच्या संगीत नाट्यात त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी काम केले. वयाच्या तेराव्या वर्षी लता दीदींनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवले आणि १९४२ साली त्यांनी आपले पहिले गाणे रेकॉर्ड केले. किती हसाल ? या चित्रपटातील नाचू या गडे खेळू सारे….. हे गाणे त्यांनी गायले मात्र या गाण्याचा चित्रपटात समावेश झाला नाही. त्याचवर्षी मंगळागौर या चित्रपटात नटली चैत्राची नवलाई…. हे गाणे गायले. या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिकाही केली होती. त्यानंतर त्यांनी काही मराठी चित्रपटात गाणी गायली. लता दिदींचे खूप गाजलेले पहिले गाणे म्हणजे १९४९ सालच्या महल चित्रपटातील खेमचंद प्रकाश या संगीतकाराने स्वरबद्ध केलेले आयेगा आनेवाला…. हे गाणे इतके लोकप्रिय झाले की त्यांच्याकडे संगीतकरांची रांग लागली. त्यांनी गायलेली गाणी लोकप्रिय होऊ लागली. १९५० नंतर दिदींचा उत्कर्षाचा काळ सुरू झाला.

त्या काळातील नौशाद, सज्जाद, वसंत देसाई, दत्ता डावजेकर यासारखे जुने आणि त्या काळात उदयाला येणारे एस डी बर्मन, सी रामचंद्र, शंकर – जयकिशन, मदन – मोहन, उषा खन्ना, कल्याणजी – आनंदजी, रवी, लक्ष्मीकांत – प्यारेलाल, आर डी बर्मन अशा सर्वच संगीतकारांकडे दीदी गाऊ लागल्या. या सगळ्यांकडे गायलेल्या दिदींच्या गाण्याला अमाप लोकप्रियता मिळत गेली. त्यांच्या आवाजाने रसिक तृप्त होत गेले. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले. त्या युद्धात भारताचे शेकडो जवान धारातीर्थी पडले. या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २७ जून १९६३ रोजी दिल्लीत एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एक खास गीत कवी प्रदीप यांनी लिहिले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले होते. ते गीत लता दीदींनी गायले.

ते गीत आजही लोकप्रिय असलेले ये मेरे वतन के लोगो……. हे गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपले आश्रू आवरता आले नाही. मराठीतही दीदींनी असंख्य गाणी गायली. आनंदघन या नावाने दीदींनी काही चित्रपटांना संगीतही दिले. जवळपास सात दशके आपल्या मंजुळ आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लता दीदींनी जवळपास एक हजार चित्रपटातून ३० हजारांहून अधिक गाणी गायली. मराठी, हिंदीसह २० हुन अधिक प्रादेशिक भाषेत त्यांनी गाणी गायली. मधुबाला, नूतन, मीना कुमारी पासून श्रीदेवी, माधुरी, जुही ते काजोल, करिश्मा, करीना कपूरपर्यंत सर्व अभिनेत्रींना त्यांनी आवाज दिला. त्यांच्या गायन कलेची दखल घेऊन सरकारने त्यांना अनेक मानाचे पुरस्कार दिले. १९६९ साली भारत सरकारने त्यांना देशाचा सर्वोच्च तिसरा नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरवले. १९९९ साली देशाचा सर्वोच्च दुसरा नागरी पुरस्कार पद्मविभूषणने गौरविण्यात आले. २००१ मध्ये त्यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले.

एम एस सुब्बालक्ष्मी नंतर या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या त्या केवळ दुसऱ्या गायिका होत्या. त्यांना दादासाहेब फाळके हा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार देखील मिळाला आहे. फ्रांस सरकारने ऑफिसर ऑफ लिजन ऑफ ऑनर या त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. लता दिदींना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर चार वेळा फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला. फिल्मफेअर कडून त्यांचा दोनदा विशेष सन्मान करण्यात आला. कालांतराने त्यांनी नवीन गायकांना पुरस्कार मिळावा या हेतूने पुरस्कार स्वीकारणेच सोडून दिले. १९९२ साली महाराष्ट्र राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने पुरस्काराची सुरवात केली तर मध्यप्रदेश सरकारने १९८४ सालापासूनच लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. लता दिदींना अनेक विद्यापीठांनी मानाची डिलीट पदवी देऊन गौरविले. मागीलवर्षी ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश स्तब्ध झाला. त्यांच्या निधनाने केवळ भारतातच नव्हे तर जगभर हळहळ व्यक्त केली गेली.

त्यांच्या निधनाने एका दैवी युगाचा अंत झाला असे मानलं गेले. लता दिदींशीवाय भारतीय चित्रपट सृष्टीचा आणि संगीत कलेचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या अलौकिक स्वरांनी चित्रपट सृष्टीवरच नव्हे तर संपूर्ण देशावर वेगळा ठसा उमटवणाऱ्या लता दिदींचे संगीत क्षेत्रातले योगदान पुढील १०० पिढ्यांना विसरता येणार नाही.जगभरातील कोट्यवधी संगीत प्रेमींच्या कानाला तृप्त करणारा दैवी स्वर आज हरपला असला तरी त्यांच्या आवाजाच्या परिसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर अनंतकाळ आपल्या मनामध्ये गुंजन करत राहणार आहे. दैवी स्वरांची देणगी लाभलेल्या गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५