श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिराच्या गडावर साकारले छत्रपती शिवरायांचे १३००० स्क्वेअर फूटाचे भव्यदिव्य रेखाचित्र

29

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.9फेब्रुवारी):- तालुक्यातील तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिराच्या गडावरील दर्शनी भागातील डोंगर उतारावर महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तलवाडा व पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिकांच्या संकल्पनेतून आणि प्रसिद्ध चित्रकार उद्देश पघळ राहेरी व त्यांचे सहकारी नितीन पवार पुणे यांच्या कलाकृतीतून १३००० स्क्वेअर फूटाचे भव्यदिव्य रेखाचित्र अवघड परिस्थिती असताना देखील सर्व कामासहित अवघ्या २० तासात रेखाटण्यात आले असून हे रेखाचित्र पाहण्यासाठी शिवप्रेमी नागरिक गर्दी करत असल्याचे पहावयास मिळत आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिराच्या गडावर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भवितव्य १३००० स्क्वेअर फूटाचे रेखाचित्र दगड,गोटे,खडी,चूना, वाॅटर बेस कलर याचा वापर करून शिवप्रेमी नागरिक, जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक, तलवाडा जि.प.मा.शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, युवक वर्ग यांनी केलेल्या श्रमदानातून साकारले असून हे काम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाचित्र तयार करण्यासाठी झाडेझुडपे तोडणे, जागेची साफसफाई करणे, रेखाचित्रासाठी लागणारं सर्व साहित्य त्याठिकाणी आणून देणे हि कामे तलवाडा व पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिकांनी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठी जोखीम घेऊन पूर्णत्वास नेली आहेत.

श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिराच्या गडावर श्रमदानातून साफसफाई करण्यासाठी शिवप्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. तलवाडा सारख्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे भवितव्य असे रेखाचित्र डोंगर उतारावर रेखाटण्यात आले आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रसिद्ध चित्रकार उद्देश पघळ याने बीड जि.प.चे माजी अध्यक्ष – विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून आर.बी.अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर पंधरा हजार स्क्वेअर फूटाचे रेखाचित्र रेखाटले होते. तसेच जानेवारी महिन्यात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त कर्जत-जामखेड मतदार संघाचे आ.रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून राजमाता जिजाऊंचे १५००० स्क्वेअर फूट रेखाचित्र तयार करून ग्रामीण भागातील चित्रकार उद्देश पघळ याने जागतिक विक्रम केला आहे.

आता ग्रामीण भागात तलवाडा येथील श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिराच्या गडावरील दर्शनी भागातील डोंगर उतारावर शाळकरी मुले, शिक्षक व शिवप्रेमी नागरिक यांच्या श्रमदानातून तसेच लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे भवितव्य असे १३००० स्क्वेअर फूटाचे रेखाचित्र बुधवार दि.०८ फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रकार उद्देश पघळ राहेरी आणि त्यांचा सहकारी नितीन पवार पुणे यांच्या कलाकृतीतून रेखाटून ते पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी तलवाडा व पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिकांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी टिकाव, फावडे, कुदळ, टोपली आदी साहित्य सोबत आणून साफसफाई आणि श्रमदान करण्यासाठी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे.

तसेच तलवाडा येथील शिवप्रेमी युवक – अशोक शिंदे, शुभम जैत, प्रल्हाद मरकड, महेश शिंदे यांनी तर सुरूवातीपासून ते रेखाचित्र रेखाटून पूर्ण होईपर्यंत खूप अनमोल असे सहकार्य केल्यामुळे त्यांचे चित्रकार उद्देश पघळ यांनी अभिनंदन करून विशेष कौतुक केले आहे. प्रसिद्ध चित्रकार उद्देश पघळ राहेरी व त्यांचे सहकारी नितीन पवार पुणे यांनी छत्रपती शिवरायांचे अप्रतिम रेखाचित्र रेखाटून पूर्ण केल्याबद्दल तलवाडा व पंचक्रोशीतील शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने श्रीक्षेत्र त्वरितादेवी मंदिर परिसरात त्यांचा यथोचित सन्मान करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

#महत्वाची चौकट#
#शिवरायांचे रेखाचित्र संकल्पना#

शिवजयंती उत्सवानिमित्त त्वरितादेवी मंदिराच्या गडावरील दर्शनी भागातील डोंगर उतारावर शिवरायांचे रेखाचित्र तयार करण्याची संकल्पना डॉ.आसाराम मराठे यांनी मांडली होती. त्यानंतर चित्रकार उद्देश पघळ राहेरी यांना बोलावून घेऊन पत्रकार बापू गाडेकर, डॉ.गर्जे साहेब, डॉ.मराठे, सुनिल गवांडे यांनी वरील विषयावर चर्चा केली आणि लगेच त्याच दिवशी संध्याकाळी महारूद्र हनुमान मंदिर तलवाडा याठिकाणी शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीत सखोल चर्चा झाल्यानंतर शिवरायांचे रेखाचित्र तयार करण्याचे सर्वानुमते ठरले आणि त्याचवेळी लोकसहभागातून चक्क ६०,००० रूपये जमा झाले. तसेच पुन्हा तलवाडा व परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी आर्थिक मदत दिली आणि रेखाचित्र रेखाटण्याचे काम हाती घेण्यात आले. डोंगराच्या उतारावर रेखाचित्र रेखाटणे हे काम अवघड होते. परंतु सर्वांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अवघ्या २० तासात साफसफाई करण्यापासून ते शिवरायांचे रेखाचित्र रेखाटण्यापर्यंतचे काम पूर्णत्वास नेले असून चित्रकार उद्देश पघळ यांचा उद्देश सफल होऊन शिवप्रेमी नागरिकांचे स्वप्न देखील साकार झाले आहे.