पत्रकार वारिशे यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आक्रमक

35

✒️नांदेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नांदेड(दि.12फेब्रुवारी):-राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा निषेध नोंदवत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने किनवट पोलीस ठाणेस निवेदन देण्यात आले.

सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो. पत्रकारावर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे. या घटना सातत्याने वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे.

महानगर टाईम्सचे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे हे कोंदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा थार या गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की शशिकांत वारिशे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे हे उघडच आहे. शशिकांतने ज्यांच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केली ते कारचालक पंढरीनाथ आंबेकर होते. सकाळी पंढरीनाथ आंबेकर यांच्या विरोधात बातमी लागते आणि त्याच व्यक्तीची कार शशिकांत वारिशे यांच्या गाडीला जोरदार धडक देते त्यात शशिकांत वारिशे यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. हा केवळ योगायोग नसून कट रचून केलेला हा खूनच आहे. या घटनेचा आम्ही राज्यातील सर्व पत्रकार तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. तसेच आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.

या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक (जलदगती न्यायालयामार्फत) कोर्टामार्फत करावी आणि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी आमची अपेक्षा आहे. राज्यातील पत्रकारांचा विविध पद्धतीने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही. वारंवार पत्रकारावर होणारे हल्ले त्यांच्यावर दाखल केले जाणारे खोटे गुन्हे थांबले नाही तर राज्यातील पत्रकारांना उग्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देत आहोत. राज्यात गेल्या आठ दिवसात पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या किमान आठ घटना घडल्या आहेत. हत्या झालेले पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे. तसेच राज्यात पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करण्यासारखे वातावरण तयार करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने भविष्यात प्रयत्न व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे.

सदर निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे व नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले.याप्रसंगी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, किनवट तालुकाध्यक्ष नसीर तगाले, युवा तालुकाध्यक्ष प्रणय कोवे, युवा सचिव मारोती देवकते, युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, तालुका सहसचिव शेख अतीफ, सावते सर, विनोद गायकवड, संतोष मुळे,पत्रकार आदि पदाधिकारी उपस्थित होते.