चौगान येथे अवैध दारू विक्रीला उधाण

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 21 फेब्रुवारी):-तालुक्यातील चौगान येथे अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. गावात दिवसरात्र खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असून पोलिस प्रशासनाचे या दारू विक्रेत्यांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यात चौगान गावाची प्रतिष्ठा मलिन होत आहे. तालुक्यातील सर्वात उन्नत, शिक्षित आणि विशेष म्हणजे सैनिकांचा गाव म्हणून चौगान गावाची ओळख आहे. परंतु अवैध दारूविक्रीने चौगान गावच्या इभ्रतीला डाग लावला आहे.

गावातील मुख्य चौकातच अवैधरित्या दारूविक्री होत असल्याने चौकात अंडाभुर्जी सारख्या थाटलेल्या दुकानाच्या आसपास तळीरामांची गर्दी दिसून येते. या तळीरामाच्या त्रासाला अनेक मुलींना, महिलांना व शेजारी राहणाऱ्या जनतेला सामोरे जावे लागते. चौकाच्याच ठिकाणी हे अवैध दारूचे अड्डे सुरू करण्यात आले आहेत. वाईनशॉप पेक्षा पाच ते दहा रुपये जास्त दर आकारून ही देशी दारू विकण्यात येते.

ह्या दारूने गावातील अनेक कुटुंबाची होळी केली आहे. गावातील तरुण दारूच्या आहारी जात आहे. दारूच्या आहारी गेलेले तळीराम दारू पिण्यासाठी घरातील साहित्याची विक्री करून आलेल्या पैशातून मद्यप्राशन करीत आहेत. दारू पिऊन अनेक कुटुंबातील तळीराम बायकोशी धिंगाणा घालत आहेत. वेळेवर पैसे मिळाले नाही तर चोरी सारखे प्रकार पण घडत आहेत. तर मागील वर्षात गावातील काही युवकांनी दारूच्या आहारी जाऊन आत्महत्या सुद्धा केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

या पूर्वी ग्रामपंचातीतर्फे अवैध दारूविक्री विरोधात मोहिम हाती घेतली होती परंतु त्याचाही फार काही परिणाम ह्या अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर झाला नाही. त्यामुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांना कुणाचा वरदहस्त लाभलेला आहे? अश्या प्रकारची चर्चा ही गावात आहे. यासर्व प्रकाराला गावातील महिलांसह, नागरिक मोठ्या संख्येने कंटाळले आहेत. लवकरात लवकर या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यात यावा. अशी चौगान वासीय जनतेने मागणी केली आहे.