शिवनामाच्या जयघोषात अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता

31

[पाच हजार भाविकांनी घेतला शिस्तबद्ध पंगतीत महाप्रसादाचा लाभ]

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.23फेब्रुवारी):-

गुरु प्रसादाची थोरी।
महिमा असे श्रेष्ठ भारी।।
प्रसाद घेताची स्वामीचा।
नाश होईल षडरिपूचा ।।

प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराज यांचा प्रासादिक असणारा अभंग, अभंगाच्या माध्यमातून जीवाचं शिवत्व व्हावं ,दुःखाच रूपांतर सुखा मध्ये व्हावं ,दु:खाला कारण असणारे षडरिपू , दु:खाला कारण असणारा मी आणि तू पणा आणि त्यातून निवृत्त झाल्यानंतर ज्या पदाची प्राप्ती होते तो ब्रह्मानंद जन्म आणि मृत्यूवर कसा विजय प्राप्त करून देतो याचे चिंतन करणारा अभंग म्हणजेच प्रसादाचा अभंग असल्याचे प्रतिपादन वेदांताचार्य गु.ष.ब्र.108 दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत यांनी येथील महात्मा बसवेश्वर संस्थांन शिवमंदीरामध्ये गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहाच्या समाप्ती प्रसंगी आपल्या प्रसादरुपी कीर्तन सेवेतून केले.

जीवनामध्ये गुरुशिवाय मार्ग नाही .अज्ञान घालून ज्ञानाचा प्रकाश देणारे गुरुच असतात आणि म्हणून अशा गुरुकृपेमुळेच आपल्या मधील काम, क्रोध, मद ,मस्तर, दंभ,अहंकार आदी षडरिपूचा नाश होतो. ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. म्हणूनच गुरुची कृपा जीवनात महत्त्वाची आहे. भक्ती ,ज्ञान ,वैराग्य या मार्गापैकी भक्तीचा मार्ग सरळ साधा सोपा आहे. ही भक्ती प्रत्येकाला करता येते.

प्रत्येक वीरशैव लिंगायत यांनी शिवदीक्षा घेऊन दररोज नित्यनेमाने भस्म धारणा, लिंगधारणा करून ईष्टलिंग पूजा करावी, शिवदिक्षा घेऊन आपला लिंग खूंटीला टांगून ठेवू नये,महादेवाला जल अर्पण करण्यासाठी वीरशैव लिंगायतांना कोठेही जायची गरज नाही त्यांनी आपल्या गळ्यातील ईष्टलिंगाला दररोज जल अर्पण करावे.बालकांनाही शिवदीक्षा देऊन त्यांना धर्मसंस्कार देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गुरुवर्यांनी आपल्या प्रसाद रुपी कीर्तनातून केले.

महात्मा बसवेश्वर संस्थान पासून सकाळी “परमरहस्य” ग्रंथाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

कलशधारी बालिका ,ग्रंथदारी महिला, भजनी मंडळी ,पावली – फुगडी खेळणाऱ्या बालिका ,महिला व पुरुष मंडळी, युवावर्ग शोभायात्रेचा उत्साह वाढवीत होते. शोभायाञेचे ठिकठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले.

पालखी मार्गावर सडा व रांगोळ्यांनी रस्ते सजली होती.

यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहात वाशीम येथील शिवकथाकार शि.भ.प. सागर महाराज यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून सुंदर अशा शिवकथेचा लाभ औदुंबरवाशीयांना दिला.

तसेच या सप्ताहा दरम्यान महात्मा बसवेश्वर शिव मंदिरात संत शिरोमणी मन्मथ माऊली व राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. सप्ताहात गु.ष.ब्र. शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हदगावकर यांच्याही आशीर्वाचनाचा लाभ भक्तांना मिळाला.

महाशिवरात्रीच्या पवन पर्वावर सौ. रजनीताई वगरकर यांच्या मार्गदर्शनात सामूहिक ईष्टलिंगपूजा तसेच परमरहस्य पारायण ग्रंथाचे पारायणही संपन्न झाले. शि.भ.प.सौ.रत्नमाला विनोद हदगावकर यांनी टाळआरती वरील सुंदर असे कीर्तन महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सादर केले.दररोज सकाळ – सायंकाळच्या शिवपाठामध्ये शेकडो शिवभक्त तन मन विसरून पाऊली खेळण्यात दंग होत.
अनेक महिला व पुरुष भजनी मंडळांनी शिवजागर व शिवनाम जपात भाग घेऊन अखंड शिवनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी सहयोग दिला. अनेक पुरुष व महिलांनी सातही दिवस विणााधरण्याची सेवा देऊन सहभाग घेतला.

प्रसादावरील कीर्तनानंतर अखंड शिवनाम सप्ताहात विशेष योगदान देणाऱ्या सर्व भजनी मंडळ,गायक,वादक यांचा योग्य तो सन्मान गुरुवर्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

लुप्त होत असलेल्या भारतीय बैठक पद्धतीनेच म्हणजेच पंगती बसवून दुपारी चार ते रात्री अकरा पर्यंत जवळपास पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

अत्यंत शिस्तबद्ध महिला व पुरुषांच्या पंगती व व प्रत्येक पंगत ऊठल्यानंतर करण्यात येणारी स्वच्छता हे दरवर्षीच या अखंड शिवनाम सप्ताहाचे वैशिष्ट्य असते.यासाठी परिसरातील शेकडो युवा कार्यकर्ते आपली सेवा देत असतात.

संपूर्ण अखंड शिवनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी महात्मा बसवेश्वर संस्थांनचे सर्व पदाधिकारी तसेच अखंड शिवनाम सप्ताह उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली.

औदुंबर नगरीतील सर्व महिला व पुरुष भजनी मंडळ तसेच किसान गणेश मंडळ, मित्र गणेश मंडळ, बसवेश्वर गणेश मंडळ, छावा गणेश मंडळ,वीरशैव दूर्गौत्सव, वैष्णवी दुर्गोत्सवाच्या शेकडो कार्यकर्त्यांची मोलाची साथ मिळाली.