चोपडा महाविद्यालयात “भारतीय अर्थव्यवस्था” या विषयावर पोस्टर प्रदर्शन उत्साहात संपन्न

35

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.25मार्च):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने *भारतीय अर्थव्यवस्था* या विषयावरील ‘पोस्टर प्रदर्शन व सादरीकरण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.एस.कोल्हे यांच्या हस्ते फीत कापून ‘पोस्टर स्पर्धा व प्रदर्शनाचे’ उदघाटन करण्यात आले.याप्रसंगी अर्थशास्त्र विभागप्रमुख विशाल हौसे परीक्षक वाणिज्य विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत देवरे, परीक्षक इंग्रजी विभाग प्रमुख दीनानाथ पाटील, सौ.क्रांती क्षीरसागर, श्री.एन.बी.शिरसाठ, डॉ.मधुचंद्र भुसारे, सौ. मायाताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या पोस्टर स्पर्धेत अर्थशास्त्र विभागातील एफ.वाय.बी.ए, एस.वाय.बी.ए, टी.वाय.बी.ए, व एम.ए. या वर्गातील ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या प्रदर्शनात भारतीय अर्थव्यवस्थेतील समाविष्ट सर्व आर्थिक घटकांवर आधारित पोस्टर तयार करण्यात आलेले होते. यामध्ये दारिद्र्य,बेरोजगारी,आर्थिक विषमता,राष्ट्रीय उत्पन्न,कर महसूल,करेत्तर महसूल,आंतरराष्ट्रीय व्यापार ,उद्योग,सेवा,भारतीय कृषी,राजस्व,भारतीय कररचना,वित्तीय संस्था,RBI,बँकिंगसेक्टर,मक्तेदारी,पूर्णस्पर्धा,अवपुंजन,मूल्यभेद,अंदाजपत्रक,ऑनलाइन बँकिंग,वित्तीय घोटाळे इ. घटकांवर व आर्थिक समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. त्यातून त्यांना भारतीय अर्थव्यवस्था याविषयी माहिती मिळाली.पोस्टर सादरीकरणासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना ०३ मिनिटे देण्यात आलेली होती. त्यांच्या सदारीकरणावर प्रतिप्रश्न विचारून अतिसूक्ष्मपणे दीनानाथ पाटील व वाणिज्य विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत देवरे यांनी परीक्षकांच्या भूमिकेतून परीक्षण केले.या पोस्टर सादरीकरण स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे रु.५०१/-,४०१/-, ३०१/- अशी रोख पारितोषिके दिली जातील व रु.१०१/- ची दोन उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहेत, असे विभागप्रमुख श्री.विशाल हौसे यांनी सांगितले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी पोस्टर सादरीकरण कार्यक्रमाचे उत्कृष्ट पद्धतीने आयोजन केल्याबद्दल अर्थशास्त्र विभागाचे अभिनंदन व कौतुक केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सौ. पूजा पूंनासे,आशा शिंदे,डॉ.एन.सी.पाटील यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.