अंथुर्णेत निरंकारी मिशनचा समर्पण दिवस संपन्न

31

✒️प्रतिनिधी बारामती(अशोक कांबळे)

बारामती(दि.15मे):- संत निरंकारी मिशनचे तत्कालीन सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त 13 मे हा दिवस संपूर्ण निरंकारी जगतामध्ये समर्पण दिवस म्हणून साजरा केला जातो.त्याच अनुषंगाने 13 मे रोजी सायं. 6 ते 9-30 यावेळेत अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील जि. प. शाळेच्या भव्य पटांगणात विशाल सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये इंदापूर सह बारामती फलटण तालुक्यातील भाविक भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रति आपली श्रद्धा सुमने अर्पण केली.

याप्रसंगी अनेक वक्त्यांनी व्याख्यान, गीत, भजन व कविता आदि माध्यमातून बाबाजींच्या प्रेम, करूणा, दया व समर्पण यांसारख्या दिव्य गुणांचे वर्णन आपल्या शुभ भावनानांद्वारे केले. बाबा हरदेवसिंहजी यांची करूणामय अनुपम छबी प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयात कोरली गेली असून त्यातून प्रेरणा घेऊन आज प्रत्येक भक्त आपले जीवन कृतार्थ करत आहे.

संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा (हरियाणा) येथे आयोजित समर्पण दिवसाच्या मुख्य समारोहामध्ये उपस्थित विशाल जनसमुदायाला संबोधित करताना सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या की, “सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी यांच्या प्रति आपले प्रेम तेव्हाच सार्थक ठरेल जेव्हा आपण त्यांची शिकवण आचरणात आणू. आपण त्यांची शिकवण केवळ बोलण्या पुरती सीमित ठेवायची नसून आपल्या वास्तविक जीवनात उतरवायची आहे. तसेच शिकवणुकीच्या रूपात जे दिव्य मोती बाबजींनी दिले आहेत ते आपल्या जीवनात धारण करायचे आहेत.

प्रेम, समर्पण आणि गुरूच्या प्रति जो आदर आहे तो अंतःकरणपूर्वक असावा, केवळ दिखावा नसावा . आपण स्वतःचे आत्मचिंतन करायचे आहे. प्रत्यक्षाल प्रमाणाची गरज नसते अशा प्रकारे आपला गुरुप्रति समर्पणाचा सच्चा भाव असावा. केवळ एका विशिष्ट दिवशी आपण त्यांचे स्मरण करायचे नसून त्यांनी दिलेल्या शिकवणुकीतून सदैव प्रेरणा घेऊन आपले जीवन सार्थक करावे.” असे भाव व्यक्त केले. या कार्यक्रमात सद्गुरु माताजींच्या समवेत निरंकारी राजपिताही उपस्थित होते.

सद्गुरु माताजींनी एक उदाहरण देऊन समजावले, की दूध घुसळून त्यातून मलई किंवा नवनीत बाहेर पडू शकेल पण पाण्यात रवी घुसळून काहीही मिळणार नाही. तात्पर्य, ईश्र्वराशी नाते जोडल्यानेच खरी भक्ती होऊ शकेल आणि आपले मन आदर प्रेमाच्या भावनेने ओतप्रोत होईल व गुरूच्या प्रति खरीखुरी प्रेमाभक्ती हृदयात उत्पन्न होईल.