ब्रम्हपुरी तालुक्यात शासकीय वाळू डेपोची निर्मिती नाही?

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि. 30 मे) :- संपूर्ण राज्यात वाळू घाटांवर शासकीय डेपो निर्माण करण्यात येणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. आणि काही जिल्ह्यात डेपो निर्माण करण्यात आले. केवळ 600 रुपये ब्रास वाळू हवी त्याला मिळणार आहे. ब्रम्हपुरी तालुक्याला वैनगंगा नदीने घेरले असून काही वाळू घाटांचा लिलाव नियमाप्रमाणे करण्यात आला होता. तर काही अनेक वाळू घाटांचा लिलावच करण्यात आलेला नाही. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाळू डेपो निर्माण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या. मात्र खूप प्रमाणात वाळू घाट व वाळूसाठा उपलब्ध असताना तालुक्यात कुठेही शासकीय वाळू डेपो निर्माण करण्याच्या हालचाली नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

तालुक्यातील सर्वच वाळू घाटावर अवैध वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. तर दुसरीकडे रात्रीच्या सुमारास तालुक्यातून अवैध वाळू वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासामुळे गावातील नागरिक त्रस्त आहेत. तर शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून संबंधित विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. रात्रीच्या सुमारास गावातील रस्त्यावरून होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे गावातील नागरिकांना गाड्यांच्या आवाजाचा त्रास होत असून त्यांची झोपमोड होत आहे. तर ग्रामीण क्षेत्रातील रस्त्यांची चाळण होत असल्याने व शेतीतील पिकांवर धूळ जमा झाल्याने शेतकरी चांगलाच संतापला आहे. या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैद्य वाळू उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात शासकीय महसूल बुडत असल्याने जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण होत आहे. तर तालुक्यातील वाळू माफियांची दबंगगिरीला प्रोत्साहन मिळत आहे.