सिटू तर्फे आयोजित कार्यक्रमात सुनिल खरे ह्यांना गुणवंत कामगार पुरस्कार

29

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.4जून):-सि आय टी युनियन सिटुच्या ५३ वा वर्धापनदिन नुकताच नाशिक मधील सिटू भवन येथे आयोजित करण्यात आला होता ह्या कार्यक्रमात जेष्ठ पञकार उत्तम कांबळे जेष्ठ साहित्यिक हे प्रमुख अतिथी होते, वर्धापनदिनानिमित्त अंबड एम आय डी सी येथिल अल्फ इंजिनिअरिंग कंपनी मधील कामगार सुनील खरे यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कंपनीत काम करत असताना सामाजिक उपक्रम राबवणे, लेणीवर कार्यशाळा आयोजित करणे, धम्म लिपी मोफत शिकवणे, आरोग्य शिबीर भरवणे, अवयवदान जनजागृती करणे व सामाजिक कार्य यांची दखल घेऊन त्यांना आज ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत कॉ. उत्तमराव कांबळे व सिटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ.डी.एल.कराड यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात आला,

श्री खरे ह्यांना ५ प्रकारच्या लिपि अवगत असून मोडी लिपि, धम्मलिपि, शारदा लिपि, ग्रंथा लिपि, सिद्धमातृका लिपि अवगत असून धम्मलिपि निशुल्क शिकवतात, लेणी अभ्यासक व धम्म लिपी अभ्यासक म्हणून काम करताना अनेक तरुणांना लेणी व धम्म लिपीचे ज्ञानार्जन केले आहे. दान पारमिता फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून धम्मलिपी विषयी जनजागृती करण्यासाठी मोफत धम्मलिपीचे धडे गेल्या ५ वर्षांपासून देत आहेत. केवळ धम्म लिपी शिकवत नाहीत तर ह्या धम्मलिपी शिकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन प्रत्यक्ष बुद्ध लेणींवर जात व लेणींवर असलेले शिलालेख वाचन करून घेता,लेणींवर वेळोवेळी मोफत कार्यशाळा आयोजित करत असतात.

आत्तापर्यंत श्री खरे ह्यानी ५० कार्यशाळाचे निशुल्क आयोजन विविध लेणींवर केले आहे, एक वेळ अशी होती की धम्मलिपी वाचण्यासाठी कुणी व्यक्ती सापडत नव्हते आणि आज त्यांच्या प्रयत्नातून मोठ्या संख्येने म्हणजेच 10 हजार विद्यार्थ्यांना धम्मलिपीचे धडे गिरवले आहे व अभ्यासक तयार झाले आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. आदिवासी पाड्यात जाऊन शालेय साहित्य वाटप करतात, अवयव दान जनजागृती करतात, रक्तदान शिबिरे आयोजित करतात, कोरोना काळात अन्नधान्य वाटप, परप्रांतीय बांधवांना घरी जाण्यासाठी बसची व्यवस्था करून देत होते, हे सर्व उपक्रम आपण कंपनी मध्ये नोकरी करून करत असतात..म्हणून या कार्याची दखल घेऊन सिटू मार्फत गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले