७ जून रोजी माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम चिमुर व ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात!

34

🔸चाहुल लोकसभा निवडणुकीची…..

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-८६०५५९२८३०

चिमुर(दि.६जुन):- गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रातील चिमुर व ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम हे दिनांक ७ जुन रोजी दौरा करणार असल्याचे कळताच राजकीय क्षेत्रात अनेक तर्क-वितर्क लावल्या जात आहे. हा दौरा संघटन बांधणीचा आहे की लोकसभा निवडणुकीची चाचपणी आहे? याबाबत अचानकपणे चर्चेला उधाण आले आहे.

गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्रात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीचे उमेदवार रिंगणात राहणार अशी चर्चा गेल्या काही महिण्यापासून या परिसरात सुरु असतांनाच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते, माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा ७ जुन रोजी चिमुर व ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात दौरा आहे. हा दौरा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व पक्ष संघटन वाढविण्यासाठी असल्याचे बोलल्या जात असले तरी अन्य राजकीय पक्षांनी मात्र वेगळीच धडकी घेवून राजकीय चर्चेला प्रारंभ केला आहे.

गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्र कॉंग्रेस आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाटयाला आहे. यात मारोतराव कोवासे वगळता काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागत आहे. कोवासे यांची उमेदवारी डावलुन काँग्रेसने डॉ. नामदेवराव उसेंडी यांना उमेदवारी दिली. त्यांचा भाजपाचे अशोक नेते यांनी सातत्याने पराभव केला आहे. पराभव जरी झाला तरी डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी जनसंपर्क कायम ठेवला आहे.

चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार विजयश्री खेचून आणण्यास अपयशी असल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला उमेदवार मैदानात उतरवेल अशी जाहीर भूमिका यापुर्वी अनेकदा राष्ट्रवादीच्या जिल्हा स्तरीय नेत्यांनी बोलून दाखविले आहे. आता धर्मरावबाबा आत्राम यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीच्या भुमिकेला बळ मिळत असल्याचे दिसुन येत आहे. आमदार धर्मरावबाबा आत्राम हे दिनांक ७ जुन रोजी गडचिरोली जिल्हयातील अहेरी वरुन आष्टी, चामोर्शी, मुल, सिंदेवाही, नवरगांव असा मार्गक्रमण करुन सकाळी ११ वाजता चिमुर तालुक्यातील भिसी येथे आगमण करतील. त्यानंतर १२ वाजता कार्यकर्त्यांना संबोधीत करुन दुपारी २ वाजता सिंदेवाही येथील विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक घेतील.

त्यानंतर दुपारी ३.३० वाजता नागभिड व ५ वाजता ब्रम्हपूरी येथील कार्यकर्त्यांची बैठक घेवुन संघटन वाढीसोबतच भविष्यातील रणनिती आखतील. या दौऱ्याबाबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये उलट-सुलट कुजबुज सुरु झाली असली तरी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मात्र याबाबत कुठलीही जाहीरपणे प्रतिक्रिया देतांना दिसत नाही. धर्मरावबाबा आत्राम यांच्या दौऱ्यामुळे भाजपालाच फायदा होईल अशी चर्चा या परिसरात सुरु आहे. या चर्चेतील गुढ मात्र आजही कायम आहे.