🔺कोरोना मृत्यूची नोंद तेलंगाणा राज्यात होणार असल्याचे प्रशासनाचे स्पष्टीकरण

✒️चंद्रपूर पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.२४जुलै):-तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्हयातील रहिवासी असणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचे काल रात्री उशिरा ( २४ जुलैला पहाटे २.३० वाजता ) निधन झाले. या महिलेला रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात खाजगी इस्पितळातून दाखल करण्यात आले होते. ही महिला तेलंगणाची मूळनिवासी असल्यामुळे या महिलेचा मृत्यूची नोंद चंद्रपूर येथील कोरोना बाधित म्हणून होणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्फत जारी करण्यात आलेल्या अधिकृत प्रेस नोट मध्ये सदर महिला ही तेलंगाना राज्यातून २१ जुलै रोजी चंद्रपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे.
२१ जुलै रोजी दाखल केलेल्या महिलेला श्वसनासंदर्भातील समस्या होती. तसेच ही महिला उच्चरक्तदाबाची देखील रुग्ण होती. खाजगी रुग्णालयात असताना या महिलेचा स्वॅब २२ जुलै रोजी घेण्यात आला. या नमुन्यांचा अहवाल २३ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. २३ जुलैच्या रात्री १२.५०च्या सुमारास ( २४ जुलैला )या महिलेला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर शर्थीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र २४ जुलैच्या पहाटे २.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
सदर महिला रुग्ण यांचा मूळ पत्ता तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील जैनढ या गावाचा आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधित म्हणून होणार नाही असे स्पष्टीकरण डॉ. भास्कर सोनारकर यांनी आपल्या अधिकृत प्रेसनोट मध्ये स्पष्ट केले आहे.त्यांच्या मृत्यूची नोंद आदिलाबाद तेलंगणा येथे होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३३६ पॉझिटिव्हची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सुदैवाने अद्याप एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही. जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू असून संशयित रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावा यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED