पी.डी.पाटील व लक्ष्मणराव पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !….

271

🔸पुरस्काराने ऊर्जा मिळते – पी.डी.पाटील व लक्ष्मणराव पाटील.

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगांव(दि.1ऑक्टोबर):- महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे उपक्रमशील शिक्षक पी.डी.पाटील व गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलचे आदर्श शिक्षक लक्ष्मणराव पाटील यांना धुळे येथे भारत सरकारच्या गैर शासकीय नामांकन असलेल्या नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम यांच्या माध्यमातून ५ सप्टेंबर, २०२३ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन अजय भवन, धुळे येथे मान्यवरांच्या हस्ते “राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय सेनेचे निवृत्त कर्नल गणपती श्रीनिवासन तसेच प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब शिवाजी अकलाडे, नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे, महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त डायरेक्टर प्रमोद पाटील, महाराष्ट्र सचिव ईश्वर पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रफुल्ल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून नामांकन मागविण्यात आले होते. त्यामधून निवडक १३८ शिक्षक – शिक्षकांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. यामध्ये धरणगाव तालुक्यातून पी.डी.पाटील व लक्ष्मणराव पाटील यांना सन्मानित करण्यात आले. या अगोदर दोन्ही पुरस्कारार्थी शिक्षकांना राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पुरस्काराने अनेकदा सन्मानित करण्यात आलेले आहे. पुरस्काराने ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पी.डी.पाटील यांनी केले. पी.डी.पाटील व लक्ष्मणराव पाटील यांचे सर्व वैचारिक मित्र परिवार, विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संघटना तसेच आप्तेष्टांकडून अभिनंदन होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नै.मा.अ.सु.प. फोरमचे रा.अध्यक्ष गोरख देवरे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा सांगितला तसेच विविध विधायक कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्नल गणपती श्रीनिवासन यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक मौलिक भूमिका बजावत असल्याचे सांगून सर्व पुरस्कारार्थी शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जोत्स्ना पवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रफुल्ल पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.