सत्यमेव जयते फाऊंडेशनचा वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा

77

🔸भारताचे संविधान हा अभ्यासक्रम अनिवार्य म्हणून समाविष्ट करावा यासह अन्य 50 मागण्या

✒️वाशिम(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वाशिम(दि.9ऑक्टोबर):- आकांक्षीत व आत्महत्याग्रस्त असलेल्या वाशिम जिल्हयाच्या सर्वागीण विकासासाठी सत्यमेव जयते फाऊंडेशनच्या वतीने अध्यक्ष परमेश्वर अंभोरे यांनी शासनापुढे ५० मागण्याचे निवेदन शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार, विद्यार्थीवर्ग आणी तळागाळातील वंचित बांधव आणि भगिनींच्या सहभागातून वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा द्वारे देण्यात आले.

विशाल मोर्चा समोर अधिक माहिती देतांना अंभोरे म्हणाले की, वाशिम जिल्हा आकांक्षीत असून ७१ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाशिमचा समावेश आहे. या जिल्ह्याचा मानवनिर्देशांक ०.६६ आहे. त्यामुळे जिल्हयाचा सर्वागीण विकास करण्यासाठी संघटनेच्या वतीने मोर्चाच्या माध्यमातून ५० मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये, जिल्ह्यात कॅन्सर व मेडीकल कॉलेज सुरु करावे, मागेल त्याला शेतीपुरक व्यवसायासाठी कर्ज द्यावे, प्रत्येकाला कर्जासाठी सिबीलची अट रद्द करावी, जिल्हा रुग्णालयात १२८ स्लाईसची सीटी स्कॅन मशीन, थ्रीटी लोज्ड एमआरआय मशीन, २ डी इको व बायोप्सी मशीन द्यावी तसेच नवीन पलंग, गाद्या, पंखे, कुलरसह रुग्णालयाची रंगरंगोटी करावी, स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य देवून जिल्ह्याचा शासकीय कर्मचार्‍यांचा अनुशेष १०० टक्के पुर्ण करावा, विकासकामात स्थानिक पुरवठादार व कंत्राटदारांना प्राधान्य द्यावे

जिल्हयातील विविध मार्गावर रोजगारासाठी टिनशेडचे व्यापारी संकुल बनवून बेरोजगारांना उपलब्ध करुन द्यावे, ५४२ इ क्लास शेतजमिनीवरील अतिक्रमण तात्काळ नियमानुकुल करावे, बेघरांच्या अतिक्रमीत शासकीय जागा नियमानुकूल करुन त्यांना घरकुलाचा लाभ द्यावा, शेतमालाला जागतीक बाजारपेठ उपलब्धतेसाठी आठवड्यातून दोनदा वाशीम ते मुंबई मालगाडी सुरु करावी, प्रत्येक तालुकयात शेतमालासाठी कोल्ड स्टोरेज उभारावे, जिल्हयातील सर्व एमआयडीसी मध्ये सुविधा देवून बेरोजगारांना प्राधान्य द्यावे, जि.प. मध्ये १५ व्या वित्त आयोगातील २५ टक्के तरतुदीनुसार बेरोजगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे, मागेल त्याला १०० टक्के पशुपक्षी अनुदानावर उपलब्ध करुन हर घर गोठा योजनेची अंमलबजावणी करावी, जि.प. च्या मालकीच्या जागेवर व्यापारी संकुल उभारुन बेरोजगारांना उद्योगासाठी द्यावे.

विविध शिष्यवृत्त्यांमध्ये तिप्पट वाढ करावी, सर्व महिला व पुरुष बचत गटांना पुर्वीप्रमाणे ५० टक्के अनुदानावर ४ टक्के व्याजदराने १० ते २० लाख कर्ज द्यावे, जिल्हयातील सर्व बसस्थानकांचे सुशोभिकरण करुन बसेसची संख्या वाढवावी व गाव तेथे एसटी सुरु करावी, पाोलीस व आरोग्य कर्मचार्‍यांचे निवासस्थानांचे पुनरुज्जीवन करावे, जिल्हयाबाहेर असलेल्या ९ कार्यालयांना जिल्ह्यात सुरु करावे, फासेपारधी बांधवांना शासनाच्या जागेत पक्की घरे बांधून देवून आदिवासी लाभार्थी उद्दीष्ट ४० वरुन २०० करावे, बडनेरा वाशीम रेल्वेमार्ग जालनापर्यत न्यावा, सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्‍यांना १०० टक्के अनुदानावर शेडनेट द्यावे, न.प. क्षेत्रातील भूखंडधारकांना त्यांच्याजवळील करारनामा किंवा नोटरीवरुन घरकुलाचा लाभ द्यावा, जिल्ह्यात संविधान सभागृहासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अनुसुचित जाती व जमातीच्या जात दाखल्यांमध्ये त्रुटीच्या नस्ती तात्काळ निकाली काढाव्या, केेंद्रीय शाळेला जागा उपलब्ध करुन देवून बांधकाम सुरु करावे.

सरकारी महिला रुग्णालयात पुर्ण नौकरभरती करावी, न.प. हद्दीतील अतिक्रमण धारकांना टिनशेडचे गाळे बनवून अल्पदरावर वाटप करावे, छत्रपती संभाजीनगर जिल्हयाप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संगणक बस सुरु करुन विद्यार्थी व शेतकर्‍यांना मोफत संगणक प्रशिक्षण द्यावे, जिल्हयातून तापी व कृष्णा खोर्‍यात जाणारे पाणी थांबविण्यासाठी नियोजन करावे, मजूरांच्या हाताला काम देवून त्यांचे स्थलांतर थांबवावे, ४० वर्षावरील सर्व पदवीधरांना महिना ४ हजार बेरोजगार भत्ता द्यावा, वाशिम जिल्हा नानासाहेब देशमुख कृषी समृध्दी प्रकल्पात समाविष्ट करावा, भुयारी पाईप लाईनव्दारे पैनगंगा नदीचे पाणी प्रत्येक धरणात सोडण्यासह तलावातील गाळ काढावा, विशेष मोहीम राबवून मौलाना आझाद महामंडळाचे ३० लाखापर्यतचे कर्ज पुर्वीप्रमाणे महार जात दाखल असणार्‍यांना द्यावे, ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार सर्व शाळा महाविद्यालयात भारताचे संविधान हा अभ्यासक्रम अनिवार्य म्हणून समाविष्ट करावा, सन २०१७-१८ पासून थकीत उपस्थिती भत्त्याचे १ ते ४ च्या विद्याथ्यार्र्ंना त्वरीत वाटप करावा तसेच त्यात प्रतिदिवस ४० रुपये वाढ करावी, जिल्हयातील सर्व शेतकर्‍यांचे कृषीपंप विजबिल माफ करुन पुढील पाच वर्षे मोफत भारनियमनमुक्त विजपुरवठा करावा.

संपुर्ण जिल्हा मानव विकासमध्ये समाविष्ट करावा, घरकाम करणार्‍या महिलांना कामगार कल्याण मंडळाचा लाभ द्यावा, जिल्हयात माजी सैनिकांसाठी सवलतीच्या दरात मिलीटरी सि. एस. डी. कॅन्टीन सुरु करावे तसेच प्रत्येक खाजगी रुग्णालयात माजी सैनिक आरोग्य योजना सुरु करावी, विरचक्र प्राप्त सुभेदार भिवसन लक्ष्मण अंभोरे यांचा अर्धाकृती पुतळा व गौरवगाथा रेल्वेस्टेशन समोर उभारुन त्यांचा सन्मान करावा. शेतकर्‍यांच्या कृषीपंप भाराचे स्थळ निरिक्षण करुन त्यांना योग्य बिल देण्यात यावे, जि.प. च्या सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचार्‍यांचे निवृत्तीवेतन सुरु करुन त्यांना सातव्या वेतन आयोगाचे सर्व लाभ देण्यात यावे, पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी तसेच जाणीव जागृती करावी, कलावंतांना विविध योजनेचे मानधन महिन्याच्या सात तारखेपुर्वी देण्यात यावे, विविध महामंडळ आणि गटांकडून कर्ज घेतलेल्या जिल्हयातील बेरोजगारांचे सर्व कर्ज माफ करावे, जिल्हयातील सर्व गावांना शहराशी जोडण्यासाठी नकाशाप्रमाणे पक्के रस्ते तयार करावे. या पन्नास मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे निवेदनात देण्यात आल्या.

मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, हमाल,बेरोजगार युवक, युवतीं मोठ्या संख्येने सामील झाले होते. त्या सर्वांचे सत्यमेव जयते फाऊंडेशनचे अध्यक्ष परमेश्वर अंभोरे यांनी आभार मानले.