बेघर केंद्रासाठी आपण मागाल ती मदत तीन तासात या केंद्रात पोहचवू – माजी पालकमंत्री प्रवीण पोटे

95

✒️बडनेरा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

बडनेरा(दि.12ऑक्टोबर):-” स्थानिक आधार शहरी बेघर निवारा केंद्रातील बेघर लोकांसाठी आपण मागाल ती कुठलीही मदत मी तीन तासाच्या आत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी देऊन बडनेरा आधार केंद्रातील स्वच्छता आणि सुंदर व्यवस्थापनेबद्दल संस्थाध्यक्ष राजू बसवनाथे व व्यवस्थापक ज्योती राठोड मँडम तथा काळजी वाहकाचे कौतुक करुन अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मान्यवराच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर सत्कार केला.

ते महानगरपालिका अमरावती तथा पब्लिक एज्युकेशन अँण्ड वेलफेअर सोसायटीचे संयुक्त विद्यमाने चालवित असलेल्या बडनेरा येथील पोस्ट ऑफिस जवळ असलेल्या आधार शहरी बेघर निवारा केंद्रात जागतिक बेघर दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अचानक दिलेल्या सस्नेह सदिच्छा भेटी दरम्यान ते बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी मनपा आयुक्त देविदास पवार सामाजिक कार्यकर्तै डॉ.गोविंद कासट,अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बा. बुंदेले, सुदर्शनजी गांग, डॉ राजकुमार दासरवाड ( समाजकल्याण महाविद्यालय, अमरावती ) माजी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षक श्री कमलाकर विसाळे, शहर अभियान व्यवस्थापक अमरावती मनपाचे भूषण बाळे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तै श्री प्रफुल्ल कुकडे, माजी नगरसेवक चेतन पवार, श्री प्रदीप जैन, श्री सुदर्शनजी गांग, माजी सभापती सौ.प्रभा देविदासराव आवारे,श्री सुरेश कस्तूरकर, श्री.चारुदत्त चौधरी, श्री लक्ष्मणराव तडस होते. तसेच अमरावती तथा बडनेरा शहरातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्तै, बचत गटाच्या महिला तथा युवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाईच्या प्रतिमेचे पूजन वंदन व हार्रापण करण्यात आले.
व्यवस्थापक ज्योती राठोड मँडम यांनी सर्व पाहुण्यांंचा शाल व विविध रंगीबेरंगी वृक्षांचे रोपटे देऊन यथोचित सन्मान सत्कार केला.

प्रमुख अतिथी समाजसेवी डॉ.गोविंद कासट यांनी,” शहरी बेघर लोकांसाठी बडनेरा येथील असलेला हा निवारा बेघर असणाऱ्यांना वरदान आहे. बेघरांच्या जीवनात आनंद भरणारे संस्थाध्यक्ष राजू बसवनाथे व व्यवस्थापक ज्योतीताई राठोड मॅडम यांना मनापासून धन्यवाद देतो.” असे विचार ‘ व्यक्त केले.

प्रमुख अतिथी अभंगकार प्रा. अरुण बा. बुंदेले यांनी “बेघरांचे घर “या स्वरचित अभंगाचे गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध करून” जागतिक बेघर दिन ” या विषयावर विचार व्यक्त करताना म्हणाले की, ” विश्व बेघर दिवस हा बेघर लोकांकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी असून बेघर लोकांना शोधून त्यांना बेघर आधार केंद्रात अश्रय देऊन त्यांच्या पुढील जीवनात मागील दुःख विसरून आनंद देण्यासाठी असतो आणि हेच कार्य या शहरी बेघर आधार केंद्रात संस्थाध्यक्ष श्री राजू बसवनाथे व व्यवस्थापिका ज्योतीताई राठोड मॅडम करीत आहेत.ते स्वतःच्या आई वडिलांप्रमाणे येथील बेघरांना प्रेम देतात तेच बेघरांचे खरे आधारवड आहेत म्हणूनच येथील बेघरांचे चेहरे आज प्रफुल्लित दिसत आहेत.मी त्यांचे मनस्वी अभिनंदन करतो.”असे विचार व्यक्त केले.

प्रमुख अतिथी श्री चारुदत चौधरी यांनी ,” बेघरांना नवजीवन देणारे हे आधार केंद्र अनमोल असून येथील व्यवस्थापन,परिसर स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. निराधारांना आधार देणाऱ्या येथील सर्व कर्मचारी वर्गाला मी शुभेच्छा देतो.”असे विचार व्यक्त केले.

” बेघरांच्या समाजप्रबोधन रॅलीला बडनेरावाशियांनी दिला उत्तम प्रतिसाद”

समाजकल्याण महाविद्यालयाचे डॉ.राजकुमार दासरवाड यांनी जागतिक बेघर दिनानिमित्त बडनेरा नगरीतून काढलेल्या समाजप्रबोधन रॅलीला विशेष सहकार्य केले. या रॅलीमध्ये त्यांच्या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यानी ” प्रत्येकाने स्वतःच्या आई वडिलांचा चांगला सांभाळ करा.त्यांना बेघर करू नका” हा मोलाचा संदेश रॅलीमधून दिला.सहभागी बेघर केंद्रातील बेघरांनीही घोषणा देऊन ” आम्हाला आमच्या मुलांनी बेघर केले तुम्ही तरी तुमच्या आई -वडिलांना बेघर करू नका. त्यांनी तुम्हाला जीवनभर प्रेम दिले. आता वृद्ध वयात तुम्ही त्यांना प्रेम द्या.” हा संदेश रॅलीमध्ये बेघर देत होते.

यावेळी समाजसेवी डॉ. गोविंद कासट, श्री सुदर्शनजी गांग, प्रा.अरुण बुंदेले यांनीही वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन मनोगत व्यक्त करताना दिले.संस्थाध्यक्ष श्री राजू बसवनाथे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक करताना “बारा वर्षांपासून आपण हा बेघर निवारा महानगरपालिका अमरावतीच्या मदतीने चालवित असून आम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना, अडचणींना तोंड द्यावे लागत असले तरी समाजातील होतकरु सामाजिक संस्था, महिला बचत गट, युवा कार्यकर्ते वेळोवेळी आमच्या मदतीला धाऊन येत असल्याने आम्ही कसेतरी तग धरून आहोत.

केंद्र शासनाचे तुटपुंजे अनुदान मिळत असून तेही उद्या चालून कदाचित बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत तेव्हा आपल्यासारखे सामाजिक जाण आणि भान ठेवणाऱ्या सर्व मान्यवरांची अशीच फुल नाही फुलांची पाकळी मदत मिळाली तर फार मोठा आधार होईल असे सांगून आम्ही दरवर्षी दि.10 ऑक्टोबर “जागतिक बेघर दिना “निमित्त 1 आँक्टोबर ते 11 आँक्टोबरपर्यंत दहा दिवशीय भरगच्च असे बौद्धिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असून यामध्ये स्वच्छता साफसफाईचे महत्त्व , अंधश्रद्धा निर्मूलन, तंबाखू, विडी घुटका, दारु, गांजा, सिगारेटचे सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम, योगा प्राणायाम, व्यायाम विपश्यनेचे महत्त्व, आँर्केस्टा, गीत, गायन, नृत्य, संगीत, कथा,नाटक एकपात्री प्रयोग, कवीसंमेलनाचे आयोजन, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, दंत रक्त तपासणी शिबीर, आणि आधार निवारा केंद्रात रहाणारे बेघर लोकांची बडनेरा शहरातून जाणीव जागृती रँली काढण्यात येते. असे सांगून एकूण बारा वर्षाचा संपूर्ण आढावा तपशीलासह राजू बसवनाथे यांनी उपस्थित मान्यवरांसमोर मांडला.”

आधार केंद्राच्या व्यवस्थापक ज्योती राठोड मँडम यांनी मंत्रीमहोदयांसह उपस्थित सर्व मान्यवरांचे जाहीर आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेघर निवारा केन्द्रातील सर्व म्हातारे आईबाबा तथा केअर टेकर रोहित घोंगडे, विलास थोरात,गजानन कांबे, सदानंद ठाकरे,रघुनाथ बनसोड, मधुकर देवगिरकर, ताराबाई रामटेके, गीताबाई सोमलवार यांनी अथक परिश्रम घेतले.