धम्मचक्राची गती वाढवू या ..!

258

१४ ऑक्टोंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या नागभूमीत बौद्ध धम्माची दीक्षा लाखो लोकांना दिली. ही धम्मदीक्षा जागतिक धम्मदीक्षाच म्हणावी लागेल. जे धर्ममार्तंड आपल्या धर्मात प्रवेश करावा म्हणून पैसा/ धमकी/ विशेष आमिष दाखवून लोकांना प्रोत्साहन करतात .पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हाकेला ओ देऊन समस्त अस्पृश्य बांधवाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आज त्यांची प्रगती नक्कीच वाखण्याजोगी आहे.

धर्माच्या बंदिस्त विचाराला तोडून मानवमुक्त विचारांची महाऊर्जा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाने भारतीय लोकांना दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्याय या मूल्यावर आधारित हा धम्म आज अनेक देशांचा मुख्य धम्म आहे. जातीय उतरंडीला उध्वस्त करून समतामुलक समाज निर्माण करणारा हा दिन ,माणसाला माणसाप्रमाणे वागवणारा विज्ञानवादी धम्म म्हणजेच बुद्ध धम्म होय.

विषमतेच्या मुळांना उखडून फेकून माणुसकीची नवी फुलबाग फुलवणारा क्षण म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन होय. हिंदू परंपरेच्या अमाणूषतेच्या नरक यातना झेलणारा हा वर्ग नव्या परिवर्तनाचा नवा क्रांतीवीर बनला आहे. त्यांचे कारण म्हणजेच बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान होय.

बुद्ध धम्म हा आचारधम्म आहे. माणुसकीची नवी पाठशाळा आहे. बहुजनांना नव्या विचारांची प्रेरणा देणारा मूल्यसापेक्ष विचारगर्भ आहे. म्हणून आज अनेक बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर येत आहेत . तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अखंड ज्ञानर्जन यांच्या प्रक्रियेतून बौद्ध बांधवांनी फार मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या प्रगतीचे गमक म्हणजे अंधश्रद्धा, रुढी,परंपरा ,देव, धर्म, वेद, पुरोहित यांना नकार होय.

ज्ञानाने मनुष्य शहणा होतो. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका…!संघटित व्हा..!! व संघर्ष करा..!!! या क्रांती नाऱ्याने बौद्ध बांधवांनी आपली प्रगती केली आहे. धम्माच्या नीतीचे आचरण करून आपली धम्म संस्कृती समाजात रुजवली आहे. आज या बांधवाचे शिक्षणात प्रमाण फार मोठे आहे. सदुसष्ट वर्षाच्या कालखंडात त्यांनी अत्यंत भरीव अशी कामगिरी केली आहे .सामाजिक जाणीव ,धम्ममय जाणीव, राजकीय जाणीव, शैक्षणिक जाणीव, वैज्ञानिक जाणीव, स्त्रीविषयक जाणीव ,साहित्य विषयी जाणीव इतर समाजापेक्षा जास्त आहे. पण आपण धम्मचक्राला गती जी द्यायची होती ती फारशी देऊ शकलो नाही हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजेत.

आजही बौद्ध बांधवात अनेक अनिष्ट प्रथा पाळल्या जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्यापासून फारकत घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य आज कपाटात बंद ठेवले जात आहे. वाचनाचा अभाव निर्माण झाला आहे. भौतिक सुखाच्या मागे हा समाज जात आहे. परिवर्तनाची कास धरून हिंदुत्ववादी विचारासोबत वाहत जात आहे .तरुण-तरुणीला योग्य दिशा मिळत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर कार्यक्रमात मोठे इव्हेंट्स साजरे केल्या जात आहेत. ज्या कार्यक्रमातून विचारांची आदान प्रदान व्हायला हवी तशी होताना दिसत नाही. अनेक संघटना बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करतो म्हणतात पण त्यांच्यात समन्वय दिसत नाही .सांस्कृतिक वातावरणाचा अभाव आपल्याला आज जाणवत आहे .

नव्या तंत्रज्ञानातून आपला समाज कसा पुढे जाईल यावर चिंतन होताना फारसे दिसत नाही. साहित्यिक मंडळीत गटबाजीला ऊत आलेला आहे .काही वर्तमानपत्र आपला मूळ उद्देश सोडून भरकडत आहेत. नव्या परिवर्तनाची दिशा समाजाला मिळताना दिसत नाही. अनेक संघटना राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करताना दिसत नाही. भारतीय लोकशाही व भारतीय संविधान समाप्त करण्याचे षडयंत्र प्रस्थापित लोक करत असताना आमचे नेते गुलाम झालेले आहेत. बार्टीच्या मुलांना योग्य शिष्यवृत्ती मिळत नाही .विविध पाठ्य पुस्तकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बहुजनांच्या समाजसुधारकांना स्थान मिळत नाही .प्रभावी असा राजकीय पक्ष नाही .अशा भयचक्र वातावरणात आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत आहोत. यावर्षीपासून आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन हा विचारांची आदान प्रदान करणारा. बुद्ध धम्माच्या विचारावर चालणारा संकल्प दिन म्हणून साजरा करू या.. अशोक विजयादशमी हा दिवस आपला जीवनाचा नवयान आहे. कारण बुद्ध धम्म हाच मानवतेचा महामुल्यवान पथ आहे.

तथागत बुद्ध तत्त्वज्ञान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञातून आपण नवा माणूस तयार करू शकतो.. समाजात निर्माण झालेले कुविचारांना मूठमाती देऊ शकतो. नव्या प्रगतीचे नवे विश्व निर्माण करू शकतो. ही ताकत फक्त आणि फक्त बौद्ध बांधवांतच आहे.. त्यांनी केलेल्या क्रांतिकार्यातूनच नवी पिढी, नवा देश उभा करणार आहे. बौद्ध धर्माच्या विचारवेगातूनच देशाचा विकास होऊ शकतो . देश एकसंघ राहू शकतो .बुद्ध धम्म हाच भारतीय धम्म आहे . भारतीय संविधानातील प्रत्येक कलमाच्या अंतर्गत त्यांची महती आहे .बुद्धधम्म हाच आपल्याला नवा महामार्ग दाखवतो. चला सारे मिळून धम्मचक्राची गती वाढवू या..!
सदुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जगातील सर्व बांधवांना सह्रदय मंगलकामना…!!
नमो बुद्धाय ,जयभीम…

” येथील सोबतीला सारे नव्या नव्याने ।।
धम्म विचारांची फुलबाग फुलवू नव्याने ।।
बुद्ध धम्माची क्रांतिज्वाला प्रकाशू नव्याने।।
चला धम्मचक्राची गती वाढवू नव्याने…।।”

✒️प्रा. संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००