दर्जेदार पुनर्वसनाकरिता 2.5 कोटी निधी आणि 945 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे-आमदार यशोमती ठाकुर यांची मागणी

54

✒️शेखर बडगे(अमरावती प्रतिनिधी)

अमरावती(दि.22ऑक्टोबर):-तालुक्यातील देवरा, देवरी, रेवसा व पुसदा येथील नागरी सुविधा दर्जेदार पुनर्वसनाकरिता 2.5 कोटी निधी व रोहणखेडा, पर्वतापूर, दोनद व तिवसा तालुक्यातील धारवाडा, दुर्गवाडा येथील 945 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली.
सन 2007 मधील महापुरामुळे अमरावती तालुक्यातील देवरा, देवरी, रेवसा व पुसदा येथील पुनर्वसनाकरिता मिळालेला निधी अपुरा असल्यामुळे अनेक मुलभूत सुविधांचे कामे रखडलेली आहेत तसेच पेढी बॅरेज उपसासिंचन प्रकल्पांतर्गत रोहणखेड-पर्वतापूर व दोनद येथील 857 कुटुंबांचे व तिवसा तालुक्यातील निम्न वर्धा प्रकलप अंतर्गत धारवाडा-दुर्गवाडा येथील 358 कुटुंबांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही.

त्यामुळे या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा मुद्दा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना भेटून मांडला. यावेळी त्यांनी तिवसा मतदारसंघातील रखडलेल्या पुनर्वसन व मुलभूत सुविधांची कामे पुर्ण झाली नाहीत, त्यामुळे पुनर्वसन ग्रस्तांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. असे सांगून त्यांनी यावेळी चर्चा करतांना अमरावती तालुक्यातील देवरा, देवरी, रेवसा व पुसदा येथे सन 2007 मध्ये आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे 2.80 कोटीची प्रशासकीय मिळाली त्यापैकी केवळ 37.14 लक्ष निधीच प्रत्यक्ष प्राप्त झाला असून उर्वरीत 2 कोटी 46 लक्ष 51 हजार रुपये निधी अप्राप्तच आहे. त्यामुळे येथील नागरी सुविधा दर्जेदार पुनर्वसनाची कामे निधी अभावी रखडलेली असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

त्याच प्रमाणे पेढी बॅरेज उपसासिंचन प्रकल्पांतर्गत दर्जेदार पुनर्वसन अंतर्गत रोहणखेडा-पर्वतापूर, दोनद येथील 587 पुनर्वसीत कुटुंबांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे या नागरिकांची पुनर्वसनासाठी अजूनही पायपीट सुरु आहे. तसेच तिवसा तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प अंतर्गत धारवाडा, दुर्गवाडा येथील 358 कुटुंबांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे या कुटुंबांची सुद्धा प्रचंड फरफट सुरु आहे. या सर्व बाबींचा विचार करुन पुनर्वसनाच्या या कामांसाठी निधी व त्या कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी पत्रातून केली आहे.

*तब्बल 38 वर्षापासून पुनर्वसनासाठी निधीच नाही*

तिवसा तालुक्यातील सुरवाडी खुर्द, सुरवाडी बु., ठाणाठुणी, करजगांव व भारवाडी आदी गावे पुनर्वसीत आहेत. सन 1984-85 मध्ये या गावांचे पुनर्वसन झाले असतांना व संबंधित गावातील ग्रामपंचायतीने मुलभूत सोयी-सुविधाकरिता निधी मिळावा अशी मागणी केली असतांनाही गेल्या 38 वर्षात या गावांना निधीच मिळाला नाही, त्यामुळे येथील पुनर्वसनग्रस्तांवर घोर अन्याय झाला असून या गावांच्या दर्जेदार पुनर्वसनाकरिता निधी मिळावा अशी मागणी सुद्धा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

*पुनर्वसनग्रस्तांना न्याय मिळणार कधी? आमदार ॲड. यशोमती ठाकूर*

विविध प्रकल्पासाठी शासन नागरिकांच्या जमिनी, शेत अधिग्रहीत करते. तसेच अतिवृष्टीमुळे महापुराचा सतत धोका असल्यामुळे त्या गावांचे इतरत्र पुनर्वसन करण्यात येते, घोषणाही होतात, निधीही मंजूर होतो,मात्र प्रत्यक्षात ही कामे वर्षानुवर्ष रखडलेली असतात. त्यामुळे या पुनर्वसनग्रस्तांची व त्यांच्या कुटुबाची प्रचंड फरफट होते. त्यांच्या वेदना सरकार कधी जाणून घेणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांची ही फरफट लक्षात घेता आता तरी दर्जेदार पुनर्वसनाकरिता मंजूर निधी प्रत्यक्षात मिळावा अशी भावना आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी याविषयी बोलतांना दिली.