आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर…..

976

🔸दिनांक २५ डिसेंबर रोजी ओबीसी धम्मदीक्षा समारोह

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

नागपुर(दि.13डिसेंबर):-सार्वजनिक धम्मदिक्षा समारोह समिती, सत्यशोधक ओबीसी परिषद व ओबीसी धम्मबांधव यांच्या वतीने दिनांक २५ डिसेंबर रोजी नागपुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे अॅड. डॉ. रमेश राठोड यांचे अध्यक्षतेखाली आयु, भुमीपुत्र नागवंशी शाक्य (हटवार दादा) यांच्या हस्ते ओबीसी धम्मदिक्षा समारोह आयोजित करण्यात आला असुन यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन छत्तीसगढ़चे आयु, नंदकुमार बघेल, माजी केंद्रीय कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम, आयु. माधुरी गायधनी उपस्थीत राहणार आहेत.

सार्वजनिक धम्मदिक्षा समारोह समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासंदर्भात्त नंदकिशोर दुपारे यांनी प्रसि‌द्धी पत्रक प्रकाशित केले असुन त्यानुसार दिनांक २५ डिसेंबर म्हणजे मनुस्मृती दहन दिन. बहुजन समाजावर सर्वच प्रकारची गुलामी लादूनही धर्मग्रंथ म्हणुन मिरवणाऱ्या मनुस्मृती या गलिच्छ ग्रंथाचे ९७ वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहात दहन केले होते.

बाबासाहेबांच्या प्रेरणेने ज्यांनी ज्यांनी मनुस्मृतीवर विश्वास ठेवणे बंद केले, देव धर्माच्या नावावर होत असलेली पिळवणूक आणि गुलामगिरी झुगारुन दिली. त्यांची उत्तुंग प्रगती झाली. हे कोणीही सहज बघू शकतो.

बाबासाहेबांच्या बौद्ध समाजाची गेल्या ६७ वर्षातील प्रगती कोणाच्याही नजरेत भरण्यासारखी आहे. नेमके हेच हेरुन कालकथीत उल्हास राठोड, हनुमंतराव उपरेकाका यांनी ओबीसी समाजात मोठी जागरुकता निर्माण केली. त्यांनीही बाबासाहेबांची प्रेरणा घेतली, प्रचंड वाचन केले, संशोधन केले. आणि आपल्या ओबीसी बांधवांना हे पटवून दिले की, ते सर्व पूर्वाश्रमीचे बौद्ध आहेत. ओबीसींच्या हे स्पष्ट लक्षात आले की त्यांना ब्राम्हणी स्वार्थाने अनेक जातींमध्ये विभागून त्यांचे शोषण केले. त्यांना शिक्षणापासून, प्रगतीपासून वंचित ठेवले. अशा कट कारस्थानी ब्राम्हणी व्यवस्थेतून सुटका करणे म्हणजे प्रगतीचा मार्ग शोधणे होय. हे ही ओबीसीच्या लक्षात आले. त्यातून पुन्हा बाबासाहेब गवसले आणि आपण स्वगृही म्हणजे बुद्ध धम्माच्या वाटेवर जाणे हेच सर्वस्वी योग्य आहे हे पटले. हनुमंतराव उपरेकाका यांनी हेच एक ध्येय ठेवून ओबीसीकरीता धम्मदिक्षेचे अभियान सुरु केले होते.

भारताच्या लोकसंख्येत ओबीसी ५२ टक्के आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही त्यांनी हिंदू धर्माची कास सोडली नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनात कुठलाही बदल झाला नाही. हिंदू धर्माच्या “ठेविले अनंते, तैसेचि राहावे” आणि “आलिया भोगासी असावे सादर” या शिकवणीमुळे त्यांचे जीवन निरुत्साही बनले. “गर्व से कहो, हम हिंदू है” असे म्हणणारे ओबीसी आजही शुद्र म्हणजे दलितच. त्यांना हिंदू धर्मात कवडीचीही प्रतिष्ठा नाही. काही दिवसापुर्वीचे आधुनिक भारतातील उदाहरण डॉ. मेधा खोले ह्या ब्राम्हण महिलेनी मराठा जातीच्या महिलेस सोहळ्याचे स्वयंपाक करून त्याचा धर्म बाटविल्याबद्दल पोलिसात गुन्हा दाखल केला, ही त्यांची जातीयताची मानसिकता आजही दिसून येते. दोन्ही महिला हिंदू धर्माच्याच तर त्यांचा धर्म कसा बाटला? असा क्षुल्लक गोष्टीमुळे वाटणारा, नासणारा किंवा बुडणारा धर्म हा हिंदू धर्म नसून तो ब्राम्हणी धर्म आहे. म्हणून हिंदू धर्मातून ब्राम्हणी धर्म वजा केल्यास शिल्लक उरतो तो फक्त बौद्ध धर्म होय.

या ब्राम्हणी त्यांच्या मूलभूत अधिकारावर, शिक्षणावर बंदी घातली आहे. त्यांना सर्व प्रकारच्या विकासापासून वंचित करणारी व्यवस्था लादली आहे. अर्थात त्यांच्या विकासांना खिळ घालणारे कुणी मुसलमान नाही व कुणी खिश्वनही नाही, बौद्ध तर नक्कीच नाही. हिंदू धर्मात मनुस्मृती, वेद, उपनिषद हे पवित्र व धर्माचा गाभा म्हटले जाते. ते किती लोकांनी वाचले किंवा पाहिले। शुद्रांनी, अतिशुद्रांनी वाचणे तर सोडा, पाहिले तरी कडक शिक्षा देण्याचे आदेश त्या ग्रंथातच आहेत. अर्थात ओबीसी शुद्रावर ज्ञानबंदी, असमानता, अपमान, लाचारी या सर्व बाबी हिंदू धर्मशास्त्रांनी लादल्यात. कर्मकांड, हिंदू धर्माचे पालन करुनही त्यांच्या संवैधानिक अधिकाराच्या आड येणारा, ओबीसीचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा केवळ एकच धर्म आणि तो म्हणजे ब्राम्हणी धर्म होय.

उत्तुंग जीवनाची मूल्ये आपणांस संविधानाने दिलीत खरी पण आपला धर्माने ते सर्व हिरावून घेतले आहे. एकीकडे आपला धर्म, आपली जात आणी दुसरीकडे संविधान-समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, यात मोठा विरोधाभास उभा झालेला आहे, म्हणून जो धर्म आपले शोषण करतो तो धर्मच आता झुंगारुन दिला पाहिजे. आपल्या जीवनाचा सर्वागीण विकास साधायचा असेल तर धम्मदीक्षा शिवाय कुठलाही पर्याय नाही. व्यक्तिगत जीवन फुलविण्यासाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, विज्ञाननिष्ठा रुजविण्यासाठी धम्मदीक्षा शिवाय पर्याय नाही. हे उपरेकाकांनी ओबीसी समाजाला पटवून दिले. त्यांनी हे ही पटवून दिले की आपण आपल्या पूर्वाश्रमीच्या बुद्ध धम्माला मुकल्यामुळेच आपली ही अधोगती झाली. बाबासाहेबांच्या बौद्धांची प्रगती पाहिल्यावर याची खात्री झाली.

त्यामुळे दुसरा तिसरा कोणता नव्हे तर बुद्ध धम्मच आपण स्वीकारावा हे नक्की झाले, पण अचाचक त्यांचा अकाली मृत्यू झाला. ते आज आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा आहे. त्यानी घोषणा केली होती की, २०१६ साली ओबीसी समाज मोठ्या संख्येने धम्मदीक्षा घेवुन बौद्ध होणार. त्यांची प्रेरणा घेऊन ओबीसी समाजाने मागील वर्षी धम्मदीक्षा घेतली.

या वर्षी सुद्धा धम्मदीक्षा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, उरुवेला कॉलोनी, छत्रपती चौक, वर्धा रोड, नागपूर येथे २५ डिसेंबर २०२३ (सोमवार) रोजी आयोजित केलेला आहे. सर्व ओबीसी बांधवांनी आणि इतरही बांधवांना विनंती आहे की येल्या २५ डिसेंबर २०२३ रोजी ओबीसी धर्मातर करणाऱ्यांनी आपली नावे तसेच ज्या ओबीसी बांधवांनी यापूर्वी धम्मदीक्षा घेतली आहे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धाच्या विचारांना मानणारे ओबीसी बांधव ह्यांनी आपली नावे अॅड. रमेश राठोड, २० विज्ञान नगर, मानेवाडा नागपुर ३४, मो.नं. ९५५२६३६८१४, ९२२६७८६८०० या पत्यावर कळवावे, ज्यांना आपल्या जाती व्यवस्थेच्या गुलामीतून मुक्त होण्याची इच्छा आहे, उत्तुंग जीवन मूल्य साधायची आहेत त्यांनी स्वईच्छेने धम्मदीक्षा घ्यावी, जोपर्यंत संपूर्ण भारत बौद्धमय होत नाही तोपर्यंत दरवर्षी ओबीसी धम्मदीक्षा कार्यक्रम मनुस्मृती दहनदिनी २५ डिसेंबर ला नागपूरच्या बौद्धभुमीत (नागभूमी) होत राहणार आहे. ही सर्वासाठी आनंदाची बाब होय. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिक्षाभुमी येथुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, छत्रपती चौक वर्धा रोड नागपुर पर्यंत धम्मरॅली काढण्यात येणार असुन लगेचच धम्मदिक्षा समारंभाला प्रारंभ होईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष भालदार, रूपाताई कुलकर्णी, शरद वानखेडे, गोविंद वरवाडे, चंद्राभाऊ ठाकरे, रंजणा सुरजुसे, अरविंद माळी, संजय नरखडेकर, पन्नालाल राजपुत, डॉ. माधव सोनेकर, मदन नागपुर, संजय सहारे, अरूणाताई सबाने, सुनिल बुटले, कविता बुटले, शंकरराव मोखारे, विलास काळे, मोहन सिडाम, वंदना बनकर आदिंने केले आहे.