प्रा.अरुण बुंदेले रचित ‘अभंग तरंग ‘ म्हणजे “जीवन तरंग”

140

अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांच्या “अभंग तरंग” या प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहावरील समीक्षण येथे देण्याचा हा माझा अल्पसा प्रयत्न.

प्रा.अरुण बुंदेले यांचा जन्म अचलपूर येथे एका गरीब कुटुंबात झाला.पिता आदर्श नगरसेवक कै.बाबारावजी बुंदेले व मातोश्री समाजसेविका कै.मैनाबाई बुंदेले यांच्या समाजसेवेचा वारसा जन्मत:च त्यांना मिळाला.

“अभंग तरंग” मधील आपल्या मनोगतात अभंगकार प्रा.बुंदेले म्हणतात की,माझी आई पहाटे जात्यावर दळण दळताना ज्या ओव्या गायची त्यात कुटुंबातील सर्व नात्यांची म्हणजे बाप-लेकी, भाऊ-बहीण,दिर-भावजय इत्यादी व माहेर,सासर,सणवार या सर्वांची मनोहर गुंफण असायची.त्यातूनच माझ्या मनात काव्यरचनेचे बीज रुजले.त्यावर त्यांच्या प्रेमळ सुसंस्कारांचे सिंचन झाले,ते बीज अंकुरले. शाळा महाविद्यालयात थोर पुरुषांची जयंती-पुण्यतिथी, स्नेहसंमेलन यात माझ्या कवितांचे संगोपन झाले आणि मी शिवाजी शिक्षण संस्थेत असताना त्या कवितांना प्रोत्साहनरुपी खत मिळून पाने- फुले व अनेक फांद्यानी हा काव्यवृक्ष बहरला.तो तसाच टवटवीत राहावा यासाठी मशागत केली.त्याचेच फलित म्हणजे माझा हा ” अभंग तरंगकाव्यसंग्रह होय.” असे कवी म्हणतात.

“अभंग तरंग “या काव्यसंग्रहाला दिलेल्या
शुभेच्छा संदेशात कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे म्हणतात की,” प्रा.अरुण बुंदेले यांचा “अभंग तरंग “हा वाड्.मय मूल्यासोबतच सामाजिक मूल्य जपणारा काव्यसंग्रह असून थोर पुरुषांचे जीवनकार्य व तत्त्वज्ञान ” मोठा अभंग ” छंद रचनेत शब्दबद्ध करून ते “अभंग तरंग ” या काव्य संग्रहाच्या रुपात वाचकांसमोर सादर करण्याचा हा प्रा.बुंदेले यांचा महाराष्ट्रातील पहिलाच काव्यसंग्रह असावा म्हणूनच त्यांच्या या स्पृहणीय व लक्षणीय कार्याची दखल समाजासोबतच साहित्यक्षेत्रतही घेतली जाईल असे मला वाटते.”

कुलगुरूंच्या या शुभेच्छा संदेशा व्यतिरिक्त या ” अभंग तरंग “ला सहा प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कवींच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत हे या काव्यसंग्रहाचे वैशिष्यच म्हणता येईल.ज्येष्ठ कवी शिवा प्रधान (अमरावती) आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की,” महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचारधारेची राखण करणारा हा अभंग तरंग आहे.” प्रसिद्ध कथाकार आणि कवी प्रा.डॉ.सतीश तराळ (अमरावती) आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की,”समाजप्रबोधन व समाज परिवर्तन या अभंग तरंगाचे प्रयोजन आहे.” प्रसिद्ध कवी तुकाराम खिल्लारे (परभणी) आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की ,” समाज मनाला मांगल्याचा मार्ग दाखविणारा असा हा अभंग तरंग आहे.” कवयित्री सरिता सातारडे (नागपूर) आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की,”महामानवांच्या समाजपरिवर्तनाचा विचार पेरणारा हा अभंग तरंग आहे.” पुरोगामी लेखक प्राचार्य डॉ. प्रवीण बनसोड (नेर,यवतमाळ) आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की, “प्रा.बुंदेले यांचा अभंग तरंग मनाची मशागत करणारा आहे.” तर प्रसिद्ध कवी सुभाष राघू आढाव ( मुंबई ) आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की, “अस्मिता आणि अस्तित्वाची जाणीव करून देणारा प्रा.बुंदेले यांचा अभंग तरंग आहे.” अशाप्रकारे कवींनी आपल्या प्रस्तावनेत अभंग तरंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असे मला वाटते.

“अभंग तरंग ” या कवितासंग्रहात ज्ञान,कर्म,भक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे.सर्व संत साहित्याचे सखोल अध्ययन त्यांच्याविषयी तसेच अभंगातील शिकवणीप्रमाणे त्यांचे वर्तन आहे अशा थोर स्त्री-पुरुष यांच्या विषयीची श्रद्धा त्यावर मनन- चिंतन व नित्य लेखन या सर्व गुणांचे मिश्रण आहे.भक्ती ही प्रेम रूप आहे.आपल्याला ज्यांच्या विषयी आदर वाटतो तीच वस्तू प्रिय असते त्यातूनच श्रद्धा दृढ होते व भक्ती अंगी बाणते हे प्रेम व्यावहारिक किंवा स्वार्थी नव्हे तर ते परम प्रेम निस्वार्थी असते. अगदी आपल्या जन्मदात्या आईप्रमाणे.ही प्रेमभावना प्रथम कुटुंब,गाव,समाज,राष्ट्र व विश्व अशी विविध वळणे घेत विकासत असते.”अभंग तरंगा “त याच क्रमाने अभंग आहेत मानवतेबद्दल प्रेम,करुणा तेव्हाच निर्माण होते जेव्हा प्रत्येक प्राणीमात्रात कवीला निर्मिकाचे रूप दिसतें.

आपल्या उद्धाराबरोबर सर्वसामान्य जनतेचाही उद्धार व्हावा हे प्रयोजन बाळगून त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने कवीचे हळवे व संवेदनशील अंतकरण कळवळते त्यांची काव्यरचना,त्यांची रचना शैली अगदी साधी सोपी एकदम मनाचा ठाव घेणारी असली तरी प्रत्येक अभंगाची त्यांची रचना अभंगाच्या सर्व लक्षणसह आहे. त्यात कृत्रिमता नाही.अभंग तरंग मधील अभंग वाचल्यानंतर त्यांच्या मनाचा साधा सात्विक भाव अभंगरुपाने सहजगत्या बाहेर पडत आहे असे वाटते. कोकिळेने तोंड उघडले की आपोआप संगीत वाहू लागते, प्राजक्ताची कळी उमलली कि
ती सुगंधाचे निःश्वास टाकू लागते.जातिवंत कवीचे काव्य असेच असते.संपूर्ण मानव जातीचा उद्धार व्हावा या जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेले अभंगतरंग मधील अभंग आहेत,हीच ती अभंगरचनेची प्रेरणा.
अभंग तरंगाच्या अंतरंगात शिरल्यावर असे दिसते की , कवीला कोणतेही क्षेत्र निषिद्ध नाही. थोरांसोबतच संताच्या जीवन कार्याचे वर्णन अभंगात आहे,त्यात दलित कामगार वर्ग,साधुसंत,स्त्री-पुरुष आहेत ज्यांनी समाजाचा उद्धार केला त्यांचे गुणगान आहे.

सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे शिक्षण.शिक्षणाने जीवनात होणारी क्रांती आश्चर्य जनक असते.आपली आई आपला पहिला गुरू तिला वंदन ‘ ‘ आई अभंगात केले आहे ती कुटुंबाचा मूळ कणा असते.कवी ‘आई’या अभंगात म्हणतात की,
“आईचं हृदय । पर्वत प्रेमाचा ॥
गंध चंदनाचा । कुटुंबाला ॥” 
एकूण स्त्री जातीच्या सन्मानार्थ महिला सन्मान,महिला दिन हे अभंग आहेत.स्त्रीभ्रूण हत्या व हुंडाबळी या अभंगात स्त्रियांवरील अत्याचाराची अन्यायाची चीड प्रकट होते.जीवनाचा शेवटचा टप्पा वृद्धत्व हे एक बालपणच असते याचे प्रासादिक शब्दात आणि करुण रसात ” वृद्ध बाळ ” या अभंगात अभंगकार प्रा.बुंदेले यांनी वर्णन केले आहे.कुटुंबानंतर समाजात ज्यांनी अनिष्ट रूढींचे निर्मूलन केले,शिक्षण प्रसार केला,लोककल्याणाची कामे केली,सावधानतेने नि दक्षतेने राजकारण केले व सोबतच स्त्री सुलभ सर्व कर्तव्य चोखपणे बजावली अशा माँ साहेब जिजाऊ,अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले,माता रमाई, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या सर्व थोर स्त्रियांना कवीने अभंग रचनेतून वंदन केले, त्यांच्या संघर्षमय जीवनाचा परिचय वाचकांना अल्पाक्षरात दिलेला आहे.

प्रा.अरुण बुंदेले यांनी”अभंग तरंग “या काव्यसंग्रहात अभंगांचे दोन भाग केलेले आहेत. पहिल्या भागात ” थोरांचे अभंग ” तर दुसऱ्या भागात त्यांचे कार्य अर्थात ” विचार अभंग ” यांचा समन्वय साधला आहे.त्यामुळे त्या थोर व्यक्तींचे जीवन कार्य लक्षात येते.क्रांतिसूर्य जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्यांनी शिक्षण क्षेत्रात, डॉ.भीमराव आंबेडकर यांनी रमाबाईच्या सहकार्याने सामाजिक क्षेत्रात,डॉ.पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण,कृषी व सामाजिक क्षेत्रात,जिजामाता व शिवाजी महाराज,अहिल्याबाई होळकर यांनी राजकारणात असूनही समाज कल्याणाची कामे केली.छत्रपती शाहू महाराज हे कर्ते सुधारक,बहुजनांचे नेते अस्पृश्यता निवारक,अण्णाभाऊ साठे कामगारांचे सुरक्षा कवच, समता व न्यायाचे पुरस्कर्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षणाचे विद्यापीठ साताऱ्यात स्थापन केले. फुले-शाहू-आंबेडकर यांनी सांगितलेले समानता तत्त्व प्रथम त्यांनी जीवनातआचरणात आणले.या सर्वांचे दर्शन अभंग तरंगात प्रासादिक शब्दात वाचकांना घडते.

थोर पुरुषांच्या व संतांच्या कार्याचा आढावा घेताना तथागत गौतम बुद्ध-धम्मदीक्षा,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज-ग्रामगीता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर- संविधान,डॉ.पंजाबराव देशमुख – जागतिक कृषी प्रदर्शन,फुले दांपत्य-साक्षरता हे वेगवेगळ्या विभागात लिहिलेले अभंग एकत्र करून वाचल्यास या थोरांचे प्रचंड कार्य लक्षात येते.अभंगकारांनी येथे पहिल्या विभागात थोरांच्या जीवन व विचारांची आणि दुसऱ्या विभागात त्यांच्या कार्याची अतिशय सुंदर गुंफण या अभंग तरंगात केलेली दिसते.संतांनी आपल्या अभंगातून – कीर्तनातून जनजागृतीचेच कार्य केले प्रा. बुंदेले येथे अभंग तरंगातील विविध अभंगातून तेच करीत आहेत.तसे त्यांचे समाजप्रबोध नाचे कार्य त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने स्थापन केलेल्या कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे सतत सुरू असते शिवाय थोरांच्या जयंती- पुण्यतिथी निमित्त सुद्धा सुरू असते.याशिवाय ते मागील तीस वर्षापासून विद्यार्थी प्रबोधन माला,पालक प्रबोधन माला, महिला प्रबोधन माला,अध्यापक प्रबोधन माला,काव्य प्रबोधन माला,परीक्षेला जाता जाता या सर्व स्वनिर्मित प्रबोधनमालेतून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन आजपर्यंत फार मोठ्या प्रमाणात केलेले आहे व आजही करीत आहेत.प्रा.बुंदेले यांनी आजपर्यंत सामाजिक व शैक्षणिक विषयावर जी अकरा पुस्तकं प्रकाशित केली त्यातूनही समाजप्रबोधन व शैक्षणिक प्रबोथनाचेच कार्य सतत केलेले आहे.

” अभंग तरंग ” मधील अभंगातून साक्षरता,शब्दांचे महत्त्व,वाचन प्रेरणा दिन,आदर्श गुरुशिष्य, शुद्धलेखन यावरही प्रकाश टाकला आहे. आरोग्यासंबंधी योग दिनाचे,व्यायामाचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे.वृक्षराज,निसर्ग,पर्यावरण,
जैवविविधता या अभंगातून पर्यावरण जागृती केलेले आहे. थोडक्यात अभंग तरंग मध्ये त्यांनी विविध विषय हाताळले आहेत.रचनेबद्दल काही अभंग उद्धृत केले तर त्यातील सहजतेचा प्रत्यय येतो.
ते खालील प्रमाणे ” भीमराव ” या अभंगात ते म्हणतात की,
“अस्पृश्यांना दिला। मुक्तीचा प्रकाश ।
तिमिराचा नाश । भीमराव ॥
॥”
” माता रमाई ” या अभंगात
“जीवनात त्याग । रमाईने केला ।
जगी घडविला । शिल्पकार ॥”
“कृषकांचे भाऊ ” या अभंगात
“कृषकांचे राजा। शेतकरी दाता।
भूषण भारता । पापळचे ॥”
” भाऊ ज्ञानदीप ” या अभंगात
“भाऊ ज्ञानदीप । विद्यार्थी वर्गाचे ।
शिवाजी संस्थेचे । जन्मदाते ॥”
“अण्णाभाऊ साठे” या अभंगात,
” प्रेरणेचे स्थान । कष्टकरी प्रजा ।
कामगार राजा । दूरदृष्टा ॥
“महात्मा फुले “या अभंगात
“महात्मा फुलेंचा । शिक्षण विचार ।
जीवन आधार । आयुष्याचा ॥
” तथागत गौतम बुद्ध ” या अभंगात
“करू अध्ययन l बुद्ध जीवनाचे ।
तत्व गौतमाचे । पंचशील ॥ ”
” गाडगे बाबा ” या अभंगात
सामाजिक क्रांती । किर्तनात केली ।
विचारात न्हाली । जन मन ॥
” पुस्तक चंदन ” या अभंगात
“पुस्तक चंदन । सुगंधाची खाण ।
कशाची ना वाण । वाचकाला ॥ “
या काव्यशैलीतून त्यांच्या मनाचा सद्‌भाव प्रतिबिंबित होतो.

अभंग तरंगातून त्यांची प्रतिभा सरिता कुटुंबापासून उगम पावलेली चढत्या सोपानाने स्वभाषा-स्वराष्ट्र यांना आपल्या अभंगात सामावून विश्वकुटुंबाला स्पर्श करते. ” विश्व हेच घर “यातून वसुधैव कुटुंबात समरस होते व आनंदाचा कंद असा निर्मिक परमानंदाचे निधान त्यांचे स्मरणात जीवन जगतो. प्रा.बुंदेले यांच्या अभंग लेखनाचा स्त्रोत असाच अखंड अभंग वाहत राहावा यासाठी त्यांना निर्मिकाने दीर्घायुरारोग्य व तेही निरामय असे द्यावे ही प्रार्थना ॥

काव्यसंग्रहाचे नाव :*अभंग तरंग*
लेखकाचे नाव : प्रा.अरुण बा.बुंदेले
प्रकाशक : सुधीर प्रकाशन,वर्धा.
पृष्ठ संख्या : १३२
मूल्य : १०० ₹

✒️समीक्षक(प्राचार्य डॉ.माणिक पाटील,अमरावती)मो :-०७२१२६६१४१०