आर्थिक उदारीकरणाचे जनक : पी व्ही नरसिंहराव

117

भारताचे माजी पंतप्रधान, नवीन आर्थिक धोरणांची सुरवात करणारे, विद्वान व्यक्तिमत्व पी व्ही नरसिंहराव यांची आज पुणयतिथी. २८ जून १९२१ रोजी आंध्रप्रदेशातील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ येथे झाले. मातृभाषा तेलगूबरोबरच हिंदी, इंग्रजी, मराठी, कन्नड यासारख्या दहा भाषांसह सहा विदेशी भाषा देखील त्यांना अवगत होत्या. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि हैदराबाद मुक्ती संग्रामात भाग घेतला. १९३५ साली हैदराबादच्या निजामाने विद्यापीठात वंदे मातरम हे गीत गण्यास बंदी घालून निजामाचे गौरव करणारे गीत गाण्याचा आदेश दिला होता तेंव्हा विद्यार्थी दशेतील नरसिंहराव यांनी त्याला कडाडून विरोध केला होता.

१९६२ साली ते पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री बनले. १९७१ सालापर्यंत ते केंद्रात मंत्री होते. या दरम्यान त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्वाची खाती सांभाळली. १९७१ ते १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात भूमी सुधारणा लागू करणारे आंध्रप्रदेश हे भारतातले पहिले राज्य बनले. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले पण नरसिंहराव विजयी झाले. १९८४ व १९८९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लढवली व जिंकली. १९९१ साली राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनले.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर त्यांची पंतप्रधान म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. पंतप्रधान बनल्यावर देशाची विस्कटलेली आर्थिक घडी सांभाळण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यांनी मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. मनमोहन सिंग हे निष्णात अर्थतज्ज्ञ होते. नरसिंहराव, मनमोहन सिंग जोडीने आधीच्या सरकारचे सर्व निर्णय बाजूला ठेवून आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारला. ज्यावेळी अतिशय गंभीर आर्थिक संकटातून देश सावरला त्यावेळी नरसिंहराव यांना फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक रिफॉर्म्स असे म्हटले जाऊ लागले. यासाठी १९९४ साली मनमोहन सिंग यांना युरो मनीने सर्वोत्तम अर्थमंत्र्यांच्या पुरस्काराने गौरविण्यात आले तेंव्हा त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की याचे खरे श्रेय नरसिंहराव यांना दिले गेले पाहिजे.

नरसिंहराव सरकारने १९९२ सालच्या अर्थसंकल्पात परकीय गुंतवणुकीला पोषक धोरण आणले त्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. मोठ्या प्रमाणावर तोट्यात असलेल्या सरकारी संस्थांचे पुनर्जीवन करण्यासाठी खाजगीकरणाची सुरवात नरसिंहराव यांनी केली तर सेबी अर्थात सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजची सुरवात देखील त्यांनीच केली. देशाच्या विकासाला गती देण्यासाठी त्यांनी खासदार निधीची सुरवात केली. सत्तेवर आल्यावर त्यांनी पंजाबमध्ये निवडणुका घेतल्या या निवडणुकीनंतर बियांत सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री बनले. त्या सरकारने दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता प्रस्थापित केली. पंजाबमधील दहशतवादाचे उच्चाटन करण्यामध्ये आणि फुटीरतावादी चळवळीला क्षीण करण्यामध्ये नरसिंहराव यांनी त्यांच्या खंबीर निर्धाराचे दर्शन घडवले.

नरसिंहराव म्हणायचे जग बदलले आहे, देशात देखील बदल झाले पाहिजेत. आपल्या याच सिद्धांताला सोबत घेऊन भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवा आकार देत त्यांनी आग्नेय आशिआई देशांसोबत मैत्रीचा प्रारंभ लूक ईस्ट या धोरणाने केला. सत्तेवर असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने १९९८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली त्यामुळे त्यांनी राजकारण संन्यास घेतला. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. २३ डिसेंबर २००४ रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांना विनम्र अभिवादन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५