संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात फळपिक विम्याची मदत व्याजासह जमा करा

247

🔸शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या विमा कंपनीवर गून्हे दाखल करण्याची मागणी

🔸शासनाला मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.3जानेवारी):- प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना २०२२ – २३ अंतर्गत अंबिया बहारामध्ये मोर्शी तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा फळपिक विमा काढला होता.

मात्र ५ महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा आजपर्यंत हिवरखेड महसूल मंडळातील ६११ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये प्रमाणे २ कोटी ४३ लाख ७ हजार २०० रुपये, अंबाडा महसूल मंडळातील १२९ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये प्रमाणे २७ लाख ७७ हजार ८०० रुपये अशी एकूण २ कोटी ८१ लाख रुपयांची मदत शासनाच्या व विमा कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे संत्रा उत्पादक शेतकरी विमा मदतीपासून वंचित असून आस्मानी संकटामूळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मंजूर विम्याची मदत ६ दिवसात संपूर्ण १२.५० टक्के व्याजासह संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी अन्यथा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटिल, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन देऊन केली आहे.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करीता मोर्शी तालुक्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १२ हजार रुपये भरून आंबिया बहार संत्रा फळ पिक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही.

फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजनेमध्ये मोठ्या अपेक्षेने विमा काढून सुद्धा त्यांना विमा मदत वेळेवर दिल्या जात नसेल तर फळ पीक विमा शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्या मालामाल करण्यासाठी, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी नसून विमा कंपन्यांच्या पाठीशी उभे असल्यामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला असून मोर्शी तालुक्यातील हिवरखेड अंबाडा महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ६ दिवसात २ कोटी ८१ लाख रुपयांची फळ पिक विम्याची रक्कम संपूर्ण व्याजासह जमा न झाल्यास मुंबई येथे मंत्रालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा शासनाला दिला आहे.