प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबीत समस्याने शिक्षकांत असंतोष

163

🔸महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चा आंदोलनाचा इशारा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.5जानेवारी):-जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त्त शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत . त्यासंबंधाने दिनांक निवेदन देण्यात आले होते तसेच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले ,विधान परिषद म.रा.मुंबई यांचे अध्यक्षतेखाली शिक्षकांच्या निवेदनातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. सदर आढावा सभेत निवेदनातील नमुद सर्व समस्या निकाली काढण्याचे लेखी आश्वासन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिले होते व तशी इतिवृत्तला नोंद घेण्यात आलेली आहे.

मात्र प्रशासनाने संघटनेला संबंधित समस्यासंबंधाने कार्यपुर्ती अहवाल दिलेले नाही तसेच शिक्षकांच्या समस्या प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष पसरलेला आहे .प्रशासनाच्या दिरंगाईमुळे व ढिसाळ कारभारामुळे शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत परिणामी प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नाईलाजास्तव महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचे निश्चित केलेले आहे.

डी.सी.पी.एस. धारक शिक्षकांचे खात्यातील तफावत दूर करणे.विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, उच्च् श्रेणी मुख्याध्यापकांची रिक्त् पदे पदोन्नतीने भरण्यात यावी,एकस्तर वेतनश्रेणी वरिष्ठ कोर्ट केस मधील याचिकाकर्ते अंतिम निकालानुसार मंजुरी आदेश देणे.आदिवासी क्षेत्रात कार्यरत असलेल्या न्यायप्रविष्ट शिक्षकांचे एकस्तर वेतननिश्चिती करुन मान.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या पत्रानुसार न्याय प्रदान करणे. शैक्षणिक अर्हता वाढीचे अधिकार पं.स.स्तरावर देणे.शैक्षणिक परवानगी आदेश देणे. मंजुर वैद्यकीय प्रतिपुर्ती देयकांची मंजुरी आदेशानुसार यादी प्रकाशित करणे. मुळ सेवापुस्तक पडताळणीस होत असलेल्या विलंबासंबंधाने नियोजन करणे.स्थायी आदेश प्रस्ताव मंजुर करणे, वरिष्ठवेतनश्रेणी मंजुरीसाठी नवीन प्रस्ताव मागविणे व तात्काळ मंजुरी प्रदान करणे. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त् शिक्षकांना एक वेतनवाढ देणे, शिक्षक पुरस्कार प्राप्त् शिक्षकांचे सेवानिवृत्तीसमयी अतिप्रदान म्हणुन केलेली वसुली परत करणे. सेवानिवृत्त् शिक्षकांची एकस्तर वेतनश्रेणी संबंधाने अतिप्रदान म्हणुन केलेली वसुलीची रक्कम परत करणे. नितीन विद्यासागर बमनवार पं.स.सावली यांचे जन्म् दिनांकात दुरुस्ती करण्याची मंजुरी देणे.रिक्त् असलेल्या विषय शिक्षक पदावर पदस्थापना करणे. निर्लेखित झालेल्या वर्गखोल्यांचे बांधकाम त्वरीत करुन देणे,संघटनेचे पदाधिकारी शिक्षकांच्या समस्या संदर्भात जि.प.ला चौकशीसाठी आले असतांना कार्यालयीन कर्मचा-यांनी संबंधितांना सन्मानपुर्वक सहकार्य करणे ,पदवी अर्हता धारण न केलेल्या विज्ञान विषय शिक्षकांना मुळ पदावर पदस्थापना न देता पदवी धारण करण्यास मुदतवाढ देण्यात यावी.

संगणक वसुली न करणेबाबत आदिवासी एकस्तर प्रोत्साहन भत्ता व एकस्तर वेतननिश्चितीची थकबाकी अदा करणे,इत्यादी समस्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले असून समस्यांचे निवारण दिनांक ३१ जानेवारी २०२४ पर्यंत न झाल्यास दिनांक १ फेब्रुवारी २०२४ पासून जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्यात येईल असे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चे राज्यनेते विजय भोगेकर, पुरोगामी महिला मंच राज्याध्यक्षा डॉ.अल्का ठाकरे, राज्यसरचिटणीस हरीश ससनकर, जिल्हानेते नारायण कांबळे,दिपक व-हेकर, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार,जिल्हा सरचिटणीस सुरेश गिलोरकर,जिल्हाकार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हाकोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, पुरोगामी महिला मंच जिल्हाध्यक्ष विद्या खटी, पौर्णिमा मेहरकुरे व पुरोगामी चे पदाधिकारी यांनी इशारा दिला आहे असे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कळविले आहे .