भ्रष्टाचारी दराटी ग्रामपंचायत जळीत प्रकरण अजूनही पोलीस तपासात

60

🔸भ्रष्टाचार उघडकीस येईल म्हणून ग्रामपंचायत कागदपत्रासह जाळली असा ग्रामस्थांचा आरोप

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 9 जानेवारी):-तालुक्यातील दराटी हे गाव ग्रामीण बंदी भागात असल्यामुळे बंदी भागावर कोणत्याही अधिकाऱ्यांचे फारसे लक्ष नसल्यामुळे स्थानिक राजकीय नेते मनमानी करून हुकूमशाही करून भ्रष्टाचार करत आहेत. म्हणून दराटी ग्रामपंचायत विरोधात ग्रामस्थांनी लोकशाही पद्धतीने अनेक तीव्र आंदोलन केले होते.

ग्रामस्थांच्या आंदोलनाचा प्रशासनावर प्रभाव जोर धरत असल्याचे दिसताच ग्रामपंचायत कागदपत्रासह जळून राख झाली होती. दराटी ग्रामपंचायत कार्यालय संदर्भात ज्या चौकशी समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. त्यांना कागदपत्रे जळून गेल्यामुळे कोणतेही कागदपत्रे मिळाले नसल्याने कोणतीही चौकशी झाली नाही. पण याच ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी, एस. सि., ओ. बि. सि व अन्य गरीब कुटुंबाचे मूलभूत हक्क व अधिकार जळून राख झाले होते.

जन्म मृत्यू नोंद व दराटी गावाचा विकास व स्वप्न या हुकूमशाही करणाऱ्या राजकारणी लोकांनी जाणीवपूर्वक जाळून राख केला असा आरोप गावकरी करीत आहेत.

दराटी ग्रामपंचायत साठी तेरा वित्त आयोग ते 15 वित्त आयोगातून दलित वस्ती सुधार व तांडा वस्ती सुधार अंतर्गत शासनाने भरपूर निधी दिला परंतु कंत्राटदार व ग्रामपंचायत सरपंच सचिव यांनी कामे थातूर मुतूर निकृष्ट दर्जाचे करून शासनाची व गावकऱ्यांची दिशाभूल केली आहे. व शासकीय निधी मध्ये भ्रष्टाचार केला आहे.

असे आरोप दराटी ग्रामस्थांनी आंदोलन करून उघडकीस आणण्याचे प्रयत्न केले. मात्र ग्रामपंचायत जळून राख झाल्यामुळे संपूर्ण दस्तऐवजाची राख रांगोळी झाल्याने भ्रष्टाचारी छाती काढून मोकाट फिरत आहेत.

या जळीत ग्रामपंचायत प्रकरणी स्थानिक दराटी पोलीस तपास करीत आहेत. परंतु राजकीय दबावामुळे पोलिसांनी जळीत ग्रामपंचायत प्रकरणाचे गांभीर्य अजूनही घेतलेले दिसत नाही. त्यामुळे दराटी ग्रामस्थ निराश व अपयशी ठरले आहे. आज पर्यंत असा कोणताच गुन्हा नाही की पोलिसांना तो सापडला नाही.

परंतु दराटी जळीत प्रकरण होऊन काही महिने होऊन गेले. मात्र तपास अजूनही लागला नाही. म्हणून दराटी पोलिसाबद्दल गावकऱ्यांना शंका येत आहे. दराटी ग्रामपंचायत सर्व कामाची चौकशी करून शासकीय कामांमध्ये अनियमिता करून निकृष्ट बोगस कामे करून स्वस्त दराचे डुप्लिकेट सामान वापरून भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच, सचिव व कंत्राटदारावर कठोर कारवाई करून बंदी भागात राहणाऱ्या दराटी ग्रामस्थांना न्याय द्यावा व पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर दराटी ग्रामपंचायत जळीत प्रकरण उघडकीस आणून या प्रकरणात हस्तक्षेप असणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी दराटी गावातील ग्रामस्थ करीत आहेत.