सह्याद्रि हॉस्पिटल्सने अतिशय दुर्मिळ फ्रोझन एलिफंट ट्रन्क सर्जरी यशस्वी करून महत्त्वाचा टप्पा पार केला

52

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.15जानेवारी):-वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी यश संपादन करत, सह्याद्रि हॉस्पिटल्सने फ्रोझन एलिफंट ट्रन्क ही गुंतागुंतीची सर्जिकल प्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. ही अनोखी आणि दुर्मिळ प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा करण्यात आली आहे. ५५ वर्षे वयाच्या महिला रुग्णावर करण्यात आलेल्या या प्रक्रियेमध्ये क्रोनिक एओर्टिक डिससेक्शन ठीक करण्यात आले, जे गेला बराच काळ दुर्लक्षिले गेले होते.

या रुग्ण महिलेला सुरुवातीला काहीच लक्षणे जाणवत नव्हती, सखोल तपासणी केल्यानंतर लक्षणे आढळून आली आणि क्रोनिक एओर्टिक डिससेक्शन झाल्याचे समजले. त्यामुळे एओर्टा (महाधमनी) मोठ्या प्रमाणात पसरली होती. सर्वसामान्यतः ती २५ ते ३० मिलीमीटर असते तर या केसमध्ये ती दुप्पट म्हणजे ६० मिलीमीटर इतकी झाली होती. गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घेऊन डॉ. स्वप्नील कर्णे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने विस्तारलेली एओर्टा बदलण्यासाठी आणि प्रॉक्सिमल डिसेंडिंग एओर्टा ठीक करण्यासाठी फ्रोझन एलिफंट ट्रन्क प्रक्रिया करण्याचे ठरवले.

फ्रोझन एलिफंट ट्रन्क प्रक्रियेमध्ये विस्तार पावत असलेली संपूर्ण एओर्टा बदलली जाते, यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांचा देखील समावेश असतो. या केसमध्ये रुग्ण महिलेची संपूर्ण रक्ताभिसरण संस्था तात्पुरती जवळपास २० मिनिटे थांबवण्यात आली होती आणि त्या वेळेत आवश्यक ग्राफ्ट्स इम्प्लांट करण्यात आले. या दरम्यान रुग्णाच्या मेंदूला सातत्याने रक्तपुरवठा होत राहावा यासाठी एक अँटीग्रेड सेरेब्रल पर्फ्यूजन तंत्र वापरण्यात आले. ही सर्जरी कित्येक तास सुरु होती, त्यामध्ये कमालीचा अचूकपणा आणि उच्च कुशल विशेषज्ञांच्या टीमची गरज होती. या प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचा घटक, फ्रोझन एलिफंट ट्रन्कची किंमत खूप जास्त असते. पण हा एक टिकाऊ उपाय आहे आणि भविष्यात काही उपचार करण्याची गरज पडली तर त्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म म्हणून वापरता येऊ शकतो.

पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डियाक ऍनेस्थेटिस्ट डॉ शंतनू शास्त्री यांनी सांगितले, “अशाप्रकारची अतिशय नाजूक शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत दक्ष दृष्टिकोन असणे आवश्यक असते, खासकरून मेंदूच्या रक्तपुरवठ्याच्या नाजूक गुंतागुंतीचा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा विशेष सावधगिरी बाळगावी लागते. या केसमध्ये आम्ही ब्लीडींगचे व्यवस्थापन अतिशय काळजीपूर्वक केले, प्रगत मॉनिटरिंग तंत्रे वापरली आणि रुग्णाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी सेरेब्रल प्रोटेक्शन उपायांचा अवलंब केला. शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही न्यूरॉलॉजिकल समस्या न उद्भवता रुग्णाची तब्येत ठीक झाली ही बाब आमच्या दृष्टिकोनाचा प्रभाव दर्शवते. सुयोग्य पद्धतीने नियंत्रित केलेले ब्लीडींग आणि सर्वसमावेशक रिकव्हरी प्लॅनचा अवलंब यामुळे अगदी पाच ते सहा दिवसात या रुग्ण महिलेची तब्येत स्थिर झाली.”

पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डिओ थोरॅसिस सर्जन डॉ स्वप्नील कर्णे म्हणाले, “हृदयातील महाधमनीमधील बिघाडामुळे गंभीर आणीबाणीचा सामना करताना आम्ही फ्रोझन एलिफंट ट्रंक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. या नाजूक सर्जरीमध्ये विस्तार पावत असलेली महाधमनी बदलून, खालच्या थोरॅसिस एओर्टावर उपचार करण्यात आले, त्यामुळे रुग्णाची रक्ताभिसरण संस्था स्थिर राहिली. तपासणी आणि सर्जरीपासून ते शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची देखभाल करेपर्यंत, आमच्या कुशल टीमने केलेल्या सहयोगपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश मिळाले, त्यामुळेच ही रुग्ण महिला तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतर सर्वसामान्य जीवन जगू शकेल.”

अशाच प्रकारच्या एका केसचे उदाहरण देताना डॉ स्वप्नील कर्णे यांनी सांगितले, “हल्लीच आम्ही हाताळलेल्या, अशाचप्रकारच्या एका केसमध्ये ॲक्युट एओर्टिक डिससेक्शन असलेल्या ६२ वर्षांच्या रुग्णाच्या बाबतीत तातडीने उपचार करणे भाग होते. एओर्टाच्या डिससेक्ट झालेला होता, त्यामुळे शरीराचा खालचा भाग आणि मेंदू यांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होऊ शकत होता. अशा केसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो वेळ, प्रत्येक मिनिट रुग्णाच्या जीवाला असलेला धोका वाढवते. हल्लीच्याच दुसऱ्या लक्षणे दिसून येत नसलेल्या आणि फ्रोझन एलिफंट ट्रन्कने उपचार केलेल्या केसमध्ये आम्ही एओर्टाचा संपूर्ण वरचा भाग, एओर्टाचा कमानीसारखा भाग आणि जवळची खालची एओर्टा यांच्या ऐवजी एक स्वतंत्र ग्राफ्ट बसवला. पण ॲक्यूट डिससेक्शनमध्ये फक्त वरच्या एओर्टाचा डिससेक्टेड भाग बदलला जातो. यशस्वी परिणाम मिळवण्यासाठी ही स्थिती लवकरात लवकर लक्षात येणे आणि त्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असते.”

सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये क्रांतिकारी फ्रोझन एलिफंट ट्रंक प्रक्रिया यशस्वी झाल्याचे संपूर्ण श्रेय समर्पित आणि कुशल वैद्यकीय टीमचे आहे. कार्डियाक सर्जन डॉ स्वप्नील कर्णे या नेतृत्वाखालील या टीममध्ये कार्डियाक सर्जन डॉ सुमित अगस्ती होते ज्यांनी या नाजूक सर्जिकल इंटरव्हेन्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे अनुभवी कार्डियाक ऍनेस्थेशिओलॉजिस्ट डॉ शंतनू शास्त्री यांनी या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्णाची सुरक्षितता आणि आराम याची काळजी घेतली. कार्डियाक पर्फ्यूशनिस्ट श्री प्रशांत धुमाळ यांनी तात्पुरत्या बंद काळात रक्ताभिसरण संस्थेचे व्यवस्थापन अतिशय कुशलपणे केले. या सर्वांनी मिळून हे अभूतपूर्व सर्जिकल यश संपादन करण्यात मोलाचे योगदान दिले.

फ्रोजन एलिफंट ट्रंक म्हणजे काय? : एफईटी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया एओर्टिक डिससेक्शनच्या गंभीर केसेसमध्ये वापरली जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, यामध्ये महाधमनीच्या दुबळ्या झालेल्या भागाच्या ऐवजी एक स्पेशल ग्राफ्ट बसवला जातो, त्यासाठी रक्तपुरवठा तात्पुरता थांबवला जातो. यामुळे ब्रांच व्हेसल ग्राफ्टिंगमार्फत मेंदूला रक्तपुरवठा होत राहतो आणि अँटीग्रेड सेरेब्रल पर्फ्यूजनसह मेंदूच्या कार्याचे देखील रक्षण केले जाते. सर्जरीनंतर रुग्णाला ब्लीडींग होऊ नये आणि तब्येत नीट बरी व्हावी याची काळजी घेतली जाते. एफईटी प्रक्रिया हा एक टिकाऊ उपचार आहे आणि भविष्यात गरज लागल्यास संभाव्य उपचार करता येऊ शकतात, गुंतागुंतीच्या एओर्टिक स्थितींवर उपचार करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.