रमाईचा त्याग, बलिदान आणि संयम स्त्रियांनी स्वीकारावा : रेखाताई ठाकूर

135

🔸माता रमाई जयंती उत्सव विविध सामाजिक उपक्रमासोबतच प्रबोधन कार्यक्रमाने साजरी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.10फेब्रुवारी):-घरात एखाद्या स्त्रीला जर दुय्यम स्थान मिळत असेल तरी ती आंबेडकरी चळवळीची अवहेलना आहे. पुरुषांच्या समानतेने स्त्रीला सर्वत्र वागणूक मिळावी. जेव्हा स्त्रीला दुय्यम स्थान मिळते तेव्हा तिथे मनुस्मृती सुरू होते. स्वाभिमानी, विचारी रमाईच्या संघर्षाची लढाई ही शोषितांच्या मुक्तीसाठी सामाजिक क्रांतीसाठी लढणाऱ्या बाबासाहेबांना बळ देणारी आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी रमाईला आपले थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक अर्पण केले आहे. महिला परिषदेत रमाईला अग्रस्थान दिले आहे.

त्यामुळेच महिलांना राजकारणामध्ये सक्रिय करण्यासोबतच त्यांची वैचारिक रित्या जागृती केल्याशिवाय सामाजिक क्रांती यशस्वी होणार नाही हे जाण असणाऱ्या बाबासाहेबांनी बाणेदार, लढाऊ महिलांची पिढी निर्माण केली. असे आपल्या मार्गदर्शनातून रेखाताई ठाकूर यांनी प्रतिपादित केले. रमाईचा त्याग बलिदान आणि संयम स्त्रियांनी स्वीकारावा, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी रमाई जयंती उत्सव समिती पुसद येथील जयंती उत्सवामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडी पुसद यांच्यावतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमासोबत प्रबोधनात्मक कार्यक्रमातून साजरी करण्यात आली. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी जयंती उत्सवाचे निमित्ताने सकाळी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन व बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. त्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्ये रक्तदानासारखे जीवनदायी कार्यामध्ये महिलांनी रक्तदान करून जयंती निमित्ताने एक आदर्श जोपासला. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेल्या जयंती उत्सवामध्ये समस्त महिलांच्या मुक्तीचे कवाड उघडणाऱ्या डॉ. बाबासाहेबांच्या जीवनसंगिनीचा जयंती महोत्सवाची सुरुवात शाहिरी जलशाने शितल साठे व सचिन माळी आणि त्यांच्या समूहमार्फत करण्यात आली.

नवयान महाजलसा या प्रबोधनात्मक जलशातून बाबासाहेबांचे आणि आपले नाते काय व बाबासाहेबांनी मुक्तीचा प्रवास कसा आणला हे गाण्यातून विषद केले. गुलामाला माणूस बनवण्याची क्रिया फक्त बाबासाहेबांनी केली. मतदानाच्या हक्कासोबतच आपण घेत असलेला श्वास सुरक्षित करण्याचे काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केले आहे. माणूस जिवंत आणि सुखी, समृद्ध होण्याचाही अधिकार दिल्याची महती आपल्या जलशातील एका वंदन गीतातून शितल साठे यांनी गायली. त्यासोबतच माता रमाईच्या खडतर जीवन गाथेची महती सुद्धा गाण्यातून अनोख्या पद्धतीने मांडल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते. त्यांनी केलेल्या त्यागाच्या भूमिकेबाबत ऐकून स्वाभिमानाने प्रत्येक प्रेक्षकांच्याही माना ताठ झाल्या होत्या. एकंदर संपूर्ण जलशांमधून श्रोतागणांवर कधी शहारे उभे राहिले तर कधी टाळ्यांच्या गडगडाटाने आसमंत दुमदुमला होता.

जलशानंतरच्या द्वितीय सत्रामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रमासोबतच रमाईच्या लेकींचा विविध क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून यश संपादन करणाऱ्या १७ रमाई मातेच्या लेकीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या छायाताई हंबर्डे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये वंचित चे पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ देवळे, वंचित चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम, पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष विद्याताई नरवाडे, शहराध्यक्ष दीपाताई हराळ, कुसुम विजय उबाळे, बदामीबाई डांगोरिया, उज्वला बाबर, रजियाबी जानूला शाह, आशाताई धोंगडे हे मंचावर विराजमान होते.
कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनाची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकातून विशद केली. तर यावेळी डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांनी रमाईच्या कार्याची महती विषद केली. या देशाला प्रचंड बलाढ्य रूपाने लोकशाही मिळवून दिलेला बाबासाहेबांच्या संविधानाला वाचविण्यासाठीची ही वेळ आहे.

त्यासाठी या युद्धात ज्या हत्याराची गरज आहे. तेथे हत्यार उचलण्याचीरमाईचा त्याग, बलिदान आणि संयम स्त्रियांनी स्वीकारावा : रेखाताई ठाकूर तयारी आहे. गरज पडली तर लेखणी -पुस्तक, भाषण -राजकारण आहे. शाहिरी आणि डफडीची साथ आहे. त्यामुळे दुश्मनाला जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याची भूमिका यावेळी फारूक अहमद यांनी मांडली. माता रमाई केवळ त्यागाचे प्रतीक नाहीतर संघर्षासोबतच शक्तीचा, समाजकल्याणाचे प्रतीक आहे. ते आमचे शक्तिपीठ असल्याचे माता रमाई बद्दलची महती विशद करताना श्रोत्यांना आपल्या मार्गदर्शनातून वंचितचे राज्य प्रवक्ता फारुख अहमद मार्गदर्शनातून यांनी मांडली. माता रमाई ने केलेल्या त्याग, संघर्ष हा डॉक्टर बाबासाहेबांना जगातील सर्वात शक्तिमान समतावादी योद्धा बनवण्यामध्ये प्रेरणा होती. त्यामुळे माता रमाई ची जयंती सर्वच समाज घटकात साजरी व्हावी अशी -हास्त अपेक्षा सुद्धा फारूक अहमद यांनी यावेळी व्यक्त केली. रमाई मातेचे शील आणि चारित्र्यसंपन्नतेचे गुण प्रत्येक स्त्रियांनी अंगीकारावे असे प्रतिपादन करीत सामाजिक राजकीय कार्यामध्ये महिलांनी अग्रक्रमाने सहभागी व्हावे अशी -हास्त अपेक्षा जयंती उत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्ष छायाताई हंबर्डे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रियंका गायकवाड यांनी केले तर आभार उषा ढोले यांनी मानले. महिलांच्या पुढाकाराने ऐतिहासिक व यशस्वी आयोजनाची सुरुवात वंचित बहुजन आघाडीच्या महिलांनी करणे हीच खरी जयंतीदिनी प्रेरणा देणारी बाब असल्याची प्रतिक्रिया आज जनमानसात उमटून दिसत आहे.

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी एक काम वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव शहराध्यक्ष जयानंद उबाळे, डॉ. अरुण राऊत, राजरत्न लोखंडे व गजानन बागल यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात मधुकर सोनवणे, मिलिंद पठाडे, कृष्णा दोडके, बाबुराव वाढवे, कैलास धबाले, भास्कर बनसोड, राहुल कांबळे ओंकार कांबळे, प्रीतम आळणे, निकेश कांबळे, विश्वास सावळे, अजय जाधव, बबन टाळीकुटे, इमरान खतीब, वंचित महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष विद्याताई नरवाडे, पुसद तालुका महासचिव सुनंदाताई धबाले, शहराध्यक्ष दीपाताई हराळ, शहर महासचिव निर्मलाताई सोनोणे, कल्पना सावळे, शोभा कांबळे, शीला कांबळे, वनिता धुळे, रजनी भगत, आशाबाई तालिकुटे, नम्रता पाटिल, संगीता इंगोले, शांता केवटे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी यांच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.