राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत गंगाखेड येथे तपासणी शिबिर संपन्न

72

🔸ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून दिला प्रतिसाद

✒️प्रतिनिधी गंगाखेड(अनिल साळवे)

गंगाखेड(दि.10फेब्रुवारी):-सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार आणि गंगाखेडचे आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने वाटप करण्यासाठी तपासणी शिबिर गंगाखेड शहरातील संत जनाबाई महाविद्यालयात संपन्न झाले असून या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे काल दिसून आले. या तपासणी शिबिराचे उद्घाटन गुट्टे काका मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री प्रल्हादराव मुरकुटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आ. गुट्टे आपल्या मतदार संघातील जनतेला दिलासा मिळावा व विकासाचा बॅकलॉग भरून निघावा याकरिता कायम प्रयत्नशील असतात. आमदार गुट्टे यांच्या माध्यमातून मतदार संघातील अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत.मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान गंगाखेडच्या माध्यमातून आ.डॉ. रत्नाकर गुट्टे विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजातील विविध घटकांना धीर देण्याचे कार्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी मतदार संघातील दिव्यांगाना आवश्यक साहित्य साधनांचे वितरण करण्याचा मोठा कार्यक्रम आ.गुट्टे यांनी गंगाखेड येथे घेतला होता. त्यात १.२५ कोटी रुपये किंमतीचे साहित्य दिव्यांगाना वाटप करण्यात आले होते.

आ.गुट्टे यांनी आयोजित केलेल्या या तपासणी शिबिरात ६० वर्षावरील १०५२ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून यात ७२९ लाभार्थी पत्र ठरले आहेत. पात्र लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार नंबरचा चष्मा, चालण्यासाठी काठी, कोपर काठी, तीन पायांची काठी, चार पायांची काठी, वॉकर, ॲल्युमिनियम कुबड्या, श्रवण यंत्र, घडीचे वॉकर, चाकांची खुर्ची, कमोड व्हीलचेअर, कमोड खुर्ची, कृत्रिम दात, संपूर्ण पाठीचा पट्टा, मानेचा पट्टा, गुडघ्याचा पट्टा, सिलिकॉन कुशन इत्यादी साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला नेहमीच भरभरून प्रेम दिले असून येथील मायबाप जनतेचे माझ्यावर अनेक उपकार आहेत.

या उपकारांची परतफेड करणे शक्य नाही. परंतु त्यांचा एक सेवक म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. माझी तब्येत बरोबर नसल्याने मी दवाखान्यात दाखल आहे. तसे काळजी करण्याचे कारण नाही परंतु डॉक्टरांनी पूर्णतः आराम करण्याचा मला सल्ला दिला असल्याकारणाने जेष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेण्याकरिता मला आज उपस्थित राहता आले नाही याची मनस्वी खंत आहे असे आ.गुट्टे यांनी भ्रमणध्वनी द्वारे कार्यक्रमास शुभेच्छा देताना म्हटले आहे.
यावेळी गटविकास अधिकारी जयराम मोडके साहेब, ज्येष्ठ व्यापारी सुभाषजी काका नळदकर, मित्रमंडळाचे प्रभारी हनुमंतराव मुंडे, वैजनाथ टोले, खालेद शेख, राधाकिशन शिंदे, उद्धव शिंदे, युवक विधानसभा अध्यक्ष कुलदीप जाधव, सुमित कामत यांच्यासह अलीमको कंपनीचे डॉक्टर, कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय केंद्र शासन पुरस्कृत जेष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत तपासणी शिबिराचे लाभार्थी लक्ष्य पूर्ण झाल्याने दि.११ फेब्रुवारी रविवार रोजी राजारामबापू सभागृह पूर्णा येथे व दि.१२ फेब्रुवारी सोमवार रोजी महात्मा गांधी विद्यालय पालम येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेले तपासणी शिबिर तूर्तास स्थगित करून पुढे ढकलण्यात आले आहे. भविष्यात पालम व पूर्णा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांकरिता कार्यक्रमाचे भव्य आयोजन करून आपणास लवकरच कळविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती. – आ.डॉ. रत्नाकर गुट्टे