मोटर सायकल रॅली व डीजे लावून काढली सैनिकांची मिरवणूक

155

✒️प्रतिनिधी गंगाखेड(अनिल साळवे)

गंगाखेड(दि.10फेब्रुवारी):-जिल्ह्यातील माजी सैनिक संघटेनच्या वतिने व चाटोरी ग्रामस्थ तथा माजी सैनिक सुभेदार विश्वनाथ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच सैन्यातुन सेवानिवृत्त झालेले ज्ञानोबा केशवराव किरडे यांच्या स्मरणानार्थ दि.८ फेब्रुवारी गुरुवार रोजी मरडसगाव पाटी ते चाटोरी भव्य मोटरसायकल रॅली सह मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले.सीमा सुरक्षा बलचे सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांच्या समर्थनात पाचशे मोटरसायकल रॅलीसह तसेच डीजेच्या तालावर मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते

आतिषबाजी व फुलांच्या वर्षावात ऐतिहासिक भव्य मिरवणूक काढण्यात आली. देशाची २० वर्ष सेवा करून आपल्या जन्म भूमीवर परतलेले ज्ञानोबा केशवराव किरडे व त्यांच्या पत्नी उषाताई ज्ञानोबा किरडे यांच्या सम्मानार्थ भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले. चाटोरी येथील गावकऱ्यांनी त्यांच्या वर सत्कारांचा वर्षाव केला. मिरवणूकीमध्ये जिल्ह्यातील आजी व माजी सैनिक व तसेच बालाजी विद्यालय इसाद येथील विद्यार्थ्यांनी मिलिटरी ड्रेससह ड्रिल प्रीयेड करत सैनिकांना सन्मान दिला.

तसेच जिल्हा परिषद शाळा चाटोरी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी रॅलीत सहभाग नोंदवला. वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ ही सोबत उपस्थित होते. पत्रकार बांधव, व्यापारी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळ, गावातील नागरीक यांनी आपला सहभाग नोंदवला. मडसगाव पाटी येथील शहीद शुभम मुस्तापुरे चौक, येथे शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांना मानवंदना देण्यात आली व त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीची सांगता श्री महारुद्र मंदिर चाटोरी येथे करण्यात आली. या ठिकाणी सेवानिवृत्त सैनिकांसह तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने पार पडला. यावेळी आपले मनोगत सूभेदार काशीनाथ पौळ यांनी व्यक्त केले. त्यानंतर श्री ह भ प देशभक्तप्रेमी वैजनाथ महाराज थोरात हिंगोलीकर यांचे कीर्तन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पदुदेव जोशी पालमकर यांनी केले.

ज्ञानोबा केशवराव किरडे यांनी जनतेचे आभार मानताना भारावुन गेले त्यांनी सैन्यातील चांगले वाईट अनुभवांना उजाळा दिला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राजस्थान, मिझोराम, बंगाल, उडीसा, पंजाब, गुजरात, त्रिपुरा, या ठिकाणी त्यांनी कर्तव्य बजावले. तसेच त्यांना २०२० मध्ये उत्कृष्ट पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची १०५ बटालियन त्रिपुरा येथून ते सेवानिवृत्त झाले.

तसेच यावेळी त्यांच्यासोबत रिटायर झालेले त्यांचे सहकारी महादेव ज्ञानोबा सानप वागदरी, मिलिंद पंडित पांढरगाव सीमा सुरक्षा बलचे सैनिक रॅलीमध्ये सोबत होते.कार्यक्रमासाठी उपस्थित कॅप्टन सूर्यकांत मुंडे, गंगाखेड माजी सैनिक संघटना अध्यक्ष सुभेदार अशोक आयनीले, सुभेदार विश्वनाथ सातपुते, पंडित सोनवणे, माणिक बडवणे, नामदेव उगले, गंगाखेड तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आनंद डी शिंदे, आनिल भानुदासराव किरडे, चाटोरी गावातील नागरिक व तालुक्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.