अजितराव…! आर आर पाटलांचे कुटूंब तुमच्यासारखे कृतघ्न निघाले नाही !

113

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे दोन नंबरचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. यावेळी ते तासगावात गेले. तिथ त्यांनी त्यांच्या नाराजी नाट्याचा जाहिर कार्यक्रम सादर केला. शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर अजित पवारांनी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील व त्यांचा मुलगा रोहित पाटील यांना आपल्या गोटात येण्याचा आग्रह केला होता. आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी अजित पवारांचा आग्रह धुडकावून शरद पवारांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. सत्तेसाठी किंवा सत्तेच्या मोहाने ते अजित पवारांच्या सोबत गेेले नाहीत. तसेच रोहित पाटील हे रोहित पवारांच्या सोबत कर्तव्य यात्रेत सहभागी झाले. राज्यभर त्यांनी कर्तव्य यात्रा गाजवली.

याचाच राग मनात धरून अजित पवारांनी परवा सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर आल्यानंतर आर आर पाटील गटाचे स्वागत स्विकारले नाही. “तुम्ही माझी काय राखली ? असे म्हणत त्यांचे स्वागत धुडकावले. त्याचवेळी आर आर पाटील गटाचे कट्टर विरोधक संजय पाटील यांच्या मुलाकडून स्वागत स्विकारत आर आर पाटील कुटूंबावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. स्वागत नाकारताना अजित पवार आर आर पाटील यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून जे बोलले त्याचा विचार करण्यासारखी बाब आहे. आर आर पाटील गटाला उद्देशून “अजित पवार म्हणाले की तुम्ही माझी काय राखली ?” खरेतर हा विचार स्वत: अजित पवारांनी करायला हवा. ज्या चुलत्याने आपल्याला ओळख दिली.

सहा वेळा आमदारकी, एक वेळा खासदारकी दिली. तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद दिले, मंत्रीपद दिले. इतकं सगळं देणा-या चुलत्याचे आपण काय राखले ? आपल्या वयोवृध्द चुलत्याची आपण काय शिल्लक ठेवली ? याचा विचार अजित पवारांनी करायला हवा. त्यांनी स्वत: आत्मपरिक्षण करावे मग आर आर पाटील यांच्या कुटूंबियांना प्रश्न करावा की तुम्ही माझी काय राखली ?

आज जर आर आर पाटील जीवंत असते तर ते शंभर टक्के शरद पवारांच्या सोबतच उभे राहिले असते. शरद पवारांनी आर आर पाटील यांना ताकद देत मंत्री, उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेले. आर आर पाटील यांनीही राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा विचार महाराष्ट्राच्या काना-कोप-यात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे शरद पवारांच्यावरती प्रेम होते. आत्ताच्या घडीला आर आर पाटील नक्कीच शरद पवारांच्यासोबत ठामपणे उभे राहिले असते. शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षासोबत आर आर पाटील यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. आज ते हयात नाहीत. असते तर नक्कीच अजित पवारांनी जमा केेलेल्या कृतघ्नांच्या टोळीत सामिल झाले नसते. आर आर पाटील यांच्या कुटूंबाने जो निर्णय घेतलाय तो योग्यच आहे. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांच्यासोबत गद्दारी न करता, कृतघ्नपणा न करता शरद पवारांना साथ द्यायचा निर्णय घेतला आहे. तो नक्कीच आर आर पाटील यांच्या आत्म्यास सुखावणारा आहे.

अजित पवार रोज शरद पवारांची लाज काढत आहेत. त्याचवेळी आर आर पाटील यांच्या कुटूंबाने आर आर पाटील यांची लाज राखली आहे. ते जर अजित पवारांच्यासोबत कृतघ्नांच्या टोळीत सामिल झाले असते तर आर आर यांच्या आत्म्यास नक्कीच वेदना झाल्या असत्या. अजित पवार आज ज्या पध्दतीने बोलत आहेत, शरद पवारांच्यावर घसरत आहेत ते पाहता त्यांनी चुलत्याची काहीच शिल्लक ठेवली नसल्याचे जाणवते. शरद पवारांनी त्यांना काय दिले नाही ? त्यांच्यासाठी काय केले नाही ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो. अजित पवारांच्या आयुष्यातून शरद पवार वजा केले तर अजित पवार कितीसे उरतील ? त्यांना स्वत:च्या बळावर आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री होता आले असते का ? अजितराव शरद पवारांचे पुतणे नसते तर बारामतीकरांनी त्यांना बारामतीच्या गणपती मंडळाचे अध्यक्ष तर केले असते का ? अजित पवारावांच्यात इतकेच नेतृत्व कौशल्य आहे, इतकीच ताकद आहे तर त्यांनी चुलत्याने स्थापन केलेल्या पक्षावर, त्या पक्षाच्या चिन्हावर डल्ला का मारला आहे ? अजित पवारांच्या बुडात दम असेल तर त्यांनी राज ठाकरेंसारखा स्वत:चा पक्ष काढावा, जनतेत जावं, जनतेला आपला विचार पटवून द्यावा आणि शरद पवारांना मात द्यावी.

शरद पवारांची धुळधान करावी. राज ठाकरेंनी चुलत्यासोबत मतभेद झाल्यावर बाजूला होत नवा पक्ष काढला. स्वत:च्या बळावर तो उभा केला. राज्यभर पोहोचवला. त्यांनी कधीच वयोवृध्द चुलत्याच्या पाठीत वार केले नाहीत. कुणाची तर सुपारी घेवून चुलत्यावर चिखलफेक केली नाही. राज ठाकरे गद्दार नाही झाले. त्यांनी स्वत:चा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांनी असे केले असते तर त्यांची उंची नक्कीच वाढली असती. त्यांच्या बद्दलचा आदर दुणावला असता. राजकीय मतभेद होवू शकतात. वेगळा विचार होवू शकतो. त्यात गैर नाही आणि वेगळे व्हायलाही हरकत नाही. पण ज्या फांदीवर बसला त्याच फांदीवर कु-हाड चालवणे योग्य नाही.

अजितराव शरद पवारांच्यापासून बाजूला झाले. भाजपाच्या छावणीत सामिल झाले. त्यांच्या लंगोटीत राज्य बँकेची, सिंचन घोटाळ्याची घाण आहे. इडीला ते घाबरले आहेत. स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी ते वयोवृध्द चुलत्यावर शस्त्र चालवत आहेत. आता ते रोज शरद पवारांच्यावर पातळी सोडून टिका करत आहेत, घसरत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या चुलत्याची राखली नाही त्यांनी इतरांच्याकडून का अपेक्षा करावी ? “तुम्ही माझी काय राखली ?” असा आर आर पाटील गटाला जाब विचारण्याचा नैतिक अधिकार अजित पवारांना नाही. त्यांच्या पेक्षा आर आर पाटलांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा कृतज्ञ आहेत.

त्यांनी सत्तेसाठी, स्वत:च्या स्वार्थासाठी, राजकीय महत्वकांक्षेसाठी आपल्या बापाच्या, पतीच्या विचाराशी कृतघ्नपणा केला नाही, गद्दारी केली नाही. शरद पवारांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली आहे. सध्याच्या गद्दारांच्या आणि मतलबी लोकांच्या गर्दीत आर आर पाटील यांच्या कुटूंबाचा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. छगन भुजबळांसारखे भले भले सत्तेच्या वळचणीला जात आहेत. सत्तेच्या सावलीत बसत सुपा-या वाजवत आहेत. अशावेळी बाप हयात नसताना, पती हयात नसताना रोहित पाटील व सुमनताई पाटील यांनी जी भूमिका घेतलीय ती नक्कीच अभिमान वाटावा अशीच आहे.