जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव तालुक्यात प्रथम

188

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.24फेब्रुवारी):-मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत शिक्षण विभाग पंचायत समिती गंगाखेड अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळांच्या मूल्यांकनामध्ये जिल्हा परिषद शाळा मधून तीन शाळांची निवड करण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक गुंजेगावच्या जिल्हा परिषद शाळेने पटकविला.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन माननीय गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने करून तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या शाळा मधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव या शाळेची प्रथम क्रमांकासाठी निवड केली.

बालाघाट डोंगर रांगेत व तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले गुंजेगाव हे गाव या गावची शाळा ही एक आदर्श शाळा म्हणून नावारूपाला येत आहे.2020 साली जिल्हास्तरावर या शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेअसल्यामुळे मागील काही वर्षापासून या शाळेचा प्रत्येक विषयावर गुणवत्तेचा चढता आलेख आहे.मग ती शाळेची विद्यार्थ्यांची पटसंख्या असो विद्यार्थ्यांची गुणवत्ता किंवा एन एम एम एस, स्कॉलरशिप, मंथन, नवोदय, आयुका यासारख्या स्पर्धा परीक्षा या सर्व बाबतीत या शाळेची प्रगती ही दिवसेंदिवस वाढतच आहे.विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे बौद्धिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक असे सर्व प्रकारचे उपक्रम या शाळेत राबविले जातात.पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत आज रोजी 283 विद्यार्थी शिक्षण घेतात शाळेत एकूण नऊ शिक्षक कार्यरत आहेत

माननीय माजी आयुक्त केंद्रेकर साहेब यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या श्रीहरीकोटा,थुंबा या अंतरिक्ष केंद्राला विमान प्रवासासह भेट या स्पर्धेतही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगावच्या दोन विद्यार्थिनींची निवड झाली होती.त्यातून त्यांना शासकीय खर्चाने श्रीहरीकोटा, बेंगलुरु,थूंबा या ठिकाणच्या अंतरिक्ष केंद्राला भेट देण्याची संधी याच शाळेने मिळवून दिली गुंजेगाव येथील ही जिल्हा परिषदेची शाळा आजूबाजूच्या परिसरामध्ये नावलौकिक मिळवत आहे.

ही शाळा घडविण्यामागे शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सहकारी शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व सर्व गावकरी या सर्वांचे अथक परिश्रम आहेत.आज तालुक्यामध्ये या शाळेची शैक्षणिक गुणवत्तेचा गुंजेगाव पॅटर्नअशी ओळख निर्माण झाली आहे. सभोवतालच्या काही गावांच्या विद्यार्थ्यांचा ओढा सध्या या जिल्हा परिषद शाळेकडे असल्याचा दिसून येत आहे.