गुरुजी, प्राचीन ग्रंथांत देहविक्रीचा उल्लेख आहे काहो?

645

🔸देहविक्री, वेश्यावृत्ती आणि वेश्याव्यवसाय विशेष

भारतीय समाजात वेश्याव्यवसाय फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतात. ऋग्वेदात अशा स्त्रीला साधारिणी म्हणून संबोधले जाई. पुरुषांना, विशेषत: धनिकांना, अमीर-उमरावांना कामवासनेच्या पूर्तीसाठी रखेल ठेवण्याची किंवा वारांगनेकडे जाण्याची मुभा होती. धर्मसूत्रांत वेश्याभगिनींसंबंधी अनेक विचार प्रकट केलेले आहेत. गौतम धर्मसूत्रात वेश्याव्यवसायाबद्दल माहिती आहे. अशा स्त्रियांच्या दयनीय अवस्थेबद्दल उल्लेख करून त्यांच्या विविध स्तरांची कल्पना धर्मशास्त्रात दिलेली आहे. गौतम ऋषींनी दासी, गणिका व पण्यस्त्री असे त्यांचे वर्गीकरण दिले आहे. दासी ही एकाच पुरुषाची सेवा करणारी, तर पण्यस्त्री सामान्य श्रेणीची वेश्या मानली जाई. नृत्यगायनात व इतर कलांमध्ये कुशल असणारी गणिका उच्च श्रेणीची मानली जाई.

मृच्छकटिक या संस्कृत नाटकातील नायिका वसंतसेना ही गणिका सुसंस्कृत व कलावती म्हणून वर्णिली आहे. महाभारत काळात राजाच्या दरबारात नृत्यगायन क्षेत्रातील कलावंतिणी राजाच्या छत्राखाली आपली कला जोपासून दरबारात मनोरंजन करीत. महाभारताच्या आदिपर्वात गांधारीच्या अनुपस्थितीत धृतराष्ट्राची सेवा अशा दासींकडून होत असल्याचे म्हटले आहे.

उद्योगपर्वात देखील कौरवांच्या दासींचा उल्लेख आहे. या स्त्रिया राजदरबारातील नर्तिकाही असत व राजघराण्यातील पुरुषांच्या रखेल्याही असत. मत्स्यपुराणात वेश्याभगिनींची विविध कर्तव्ये नमूद केलेली आहेत. बौद्ध काळात- इ.स.पू. ७००-५०० दरम्यान अनेक धार्मिक व सामाजिक स्थित्यंतरे घडली. बौद्ध मठांमध्ये गणिकांना प्रवेश दिला जात असे. जातक कथांमध्ये तसेच अन्य बौद्ध वाङ्‌मयातही आम्रपाली या नृत्यनिपूण गणिकेसंबंधीचे उल्लेख आढळतात. सुमारे पाचशे वर्षे बौद्धधर्माचा अंमल भारतीय समाजावर राहिला, त्या काळात तिला बहिष्कृत केले जात नसावे. गणिकेला सामाजिक प्रतिष्ठा होती. गणिकेला राजाकडून सन्मान व गुणीजनांकडून प्रशंसा लाभत असे, असा उल्लेख नाट्यशास्त्रात आढळतो. ती अभिगमनास व चिंतन करण्यास योग्य अशी असावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

कौटिल्य अर्थशास्त्रात- इ.स.पू.चौथ्या शतकामध्ये वेश्याभगिनींचे नऊ वर्ग वर्णिले आहेत. तसेच वेश्याव्यवसायाचे नियंत्रण करण्यासाठी नियमावली दिली आहे. त्यांच्या उत्पन्नावर करवसुलीचा अधिकार राजाला असल्याचे नमूद केलेले आहे. वात्स्यायनाने रचलेल्या कामसूत्र (इ.स.तिसरे वा चौथे शतक) या ग्रंथातील वैशिक या अधिकरणामध्ये विविध प्रकारच्या वारांगनांसंबंधी माहिती आली आहे. या काळात वेश्यागमन जरी समाजमान्य असले, तरी विविध जातींप्रमाणे वेगवेगळे स्थान होते. कामसूत्रामध्ये कुंभदासी, परिचारिका, स्वैरिणी, कुलटा, नटी, शिल्पकारिका, रूपाजीवा व गणिका असे वर्ग नमूद केले आहेत. जिला चौसष्ट कला अवगत आहेत, ती गणिका होय. या काळातील समाजव्यवस्थेत वेश्याव्यवसायाला विशिष्ट स्थान व दर्जा दिलेला आहे. समाजाचे ते एक अविभाज्य अंग होते.

जैन राजांची कारकीर्द- इ.स.दुसरे शतक यांत राजदरबारातील कलावंतीण ही राजाची रखेली असे व तिने इतर पुरुषांबरोबर संबंध ठेवणे निषिद्ध होते. मात्र सामान्य जनांना रिझविणाऱ्या सामान्य नर्तकी या इतर वर्गांतील पुरुषांबरोबर संबंध ठेवू शकत. मात्र काळाच्या ओघात वारांगना व गणिका हा भेद नष्ट झाला. त्यांची निर्भर्त्सना व अवहेलना होऊन त्यांना अमीर उमरावांकडून उपमर्द सोसावा लागला. चाणक्य नीतिसार या ग्रंथात सामान्य वेश्याभगिनींची दयनीय अवस्था वर्णिली आहे.

भारतातील पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये वारांगना वा कलावंतीण ही अखंड सौभाग्यवती म्हणून संबोधली जाई. दक्षिण भारतात नववधूचे मंगळसूत्र कलावंतीण ओवून देत असे. दुर्गापूजेसाठी देवीच्या मूर्तीसाठी शकुन म्हणून वेश्येच्या घरातील माती आणून सुरुवात करीत. लैंगिकसंबंधाचे नियमन करताना पारंपरिक समाजात विविध रूढी-परंपरेमुळे काही प्रमाणात विवाहबाह्य संबंधांना मान्यता होती. भारतातील रूढी परंपरांनुसार काही धार्मिक भावना आणि अंधश्रद्धा या देवदासी प्रथेला पोषक ठरल्या. तिसऱ्या शतकातील धार्मिक ग्रंथांत व साहित्यांमध्ये या प्रथेचा उल्लेख आढळतो. अथर्व वेदामध्ये देवदासींना गंधर्व गृहिता म्हटले आहे. कालिदासाच्या मेघदूतामध्ये देवदासींचे काव्यात्मक वर्णन आढळते. कल्हणाच्या राजतरंगिणी ग्रंथात सातव्या शतकापासून ही प्रथा उत्तर भारतात रूढ असल्याचे म्हटले आहे. वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरात नृत्यनिपुण देवदासी होत्या. महाराष्ट्रातही खंडोबाला मुरळी म्हणून मुली वाहिल्या जातात. यातील काही मुरळ्याही वेश्याजीवन पत्करतात. भारतात ब्रिटिश अंमल सुरू झाल्यानंतर या व्यवसायाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. उदा.कोलकाता व मुंबई येथील यूरोपीय व्यापाऱ्याच्या सोयीसाठी कुंटणखाणे निर्माण झाले.

कोलकाता शहरातील कलिंगा बाजार व चितपूर येथील वेश्यावस्तीसंबंधीचे उल्लेख तत्कालीन जनगणनेत सापडतात. बंगालमध्ये कुलीन पद्धतीमुळे ब्राह्मणांना बहुविवाह करण्यास मुभा होती. कौटुंबिक प्रतिष्ठेसाठी अनेक आईबाप भरमसाट हुंडा देऊन आपली मुलगी उच्चजातीय ब्राह्मणांना देऊ करीत. जरठ पातीच्या निधनामुळे अनेक अश्राप मुली बालविधवा होत. ज्या सती जात नसत त्यांची अवहेलना होई व त्यामुळे त्यांना कुंटणखान्यात आश्रय घ्यावा लागे. तत्कालीन बंगाली साहित्यात देखील कलानिपुण वेश्यांभगिनींसंबंधी उल्लेख आढळतात. शरदचंद्र चतर्जींच्या श्रीकांत, देवदास कादंबरीमधून या स्त्रियांची संस्कृती व पिळवणूक यांचे चित्रण आढळते. श्रीमंत जमीनदार व व्यापारी हे रखेल्या ठेवणे ही प्रतिष्ठेची बाब समजत. रखेल्यांना बंधावेश्या म्हणत व त्यांना घरदार व दागदागिने दिले जात.

मुंबई वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायदा १९२३अन्वये वारांगनेच्या उत्पन्नावर जगणे, हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. भारतातील वेश्याव्यवसाय, अनैतिक व्यापारबंदी आणि अजाण मुलींचे संरक्षण या दृष्टीने झालेले कायदे असे- वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायदा- मुंबई १९२३ व सौराष्ट्र १९५२. अनैतिक व्यापारनिर्मूलन कायदा- मद्रास १९३०, बंगाल १९६३, उत्तरप्रदेश १९३३, पंजाब १९३५, बिहार व मध्यप्रदेश १९५३, म्हैसूर १९३० व हैदराबाद १९५२. अजाण मुली संरक्षण कायदा- उत्तरप्रदेश १९२६. नाईक मुलीसंरक्षण कायदा- १९९०. देवदासी प्रतिबंधक कायदा- मुंबई १९३४ व चेन्नई १९४७. संपूर्ण भारतासाठी १ मे १९५६ रोजी स्त्रिया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास बंदी करणारा कायदा लागू करण्यात आला. मात्र या प्रश्नाचे गांभीर्य ध्यानात घेऊन भारतीय पतित उद्धारण संघटना यांसारख्या बिगरशासकीय संस्थांनी जी पाहणी केली- १९९३अनुसार महाराष्ट्र राज्यात सर्वांत अधिक म्हणजे ३.५ लाख वेश्याभगिनी होत्या. या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये अकराशे लालबत्ती- रेडलाइट क्षेत्रे असून सुमारे २३,८८,३३० भगिनी या धंद्यात आहेत.
सरकारी व बिगरसरकारी पातळ्यांवरून शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी उपक्रम राबविण्यात येतात.

महिला व बालकल्याण संचालनालयामार्फत मुलींसाठी प्रमाणित शाळा तसेच महिला संरक्षणगृहे स्थापन केली आहेत. या ठिकाणी सुटका केलेल्या भगिनींचे पुनर्वसन व नवजीवन उभारणीचे प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतून असे प्रयत्न करण्यात येतात. मुंबई शहरातील कुंटणखान्यांमधील बळजबरीने डांबलेल्या मुलींसाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्य करतात. संवेदना व समर्थन या संस्थांतर्फे नेपाळ व इतर राज्यांतून फसवून आणलेल्या मुलींना साहाय्य केले जाते. त्याचप्रमाणे प्रयास ही संस्था महिलांच्या लैंगिक शोषणासंबंधी कार्यरत आहे. लालबत्ती विभागात काम करणाऱ्या विविध संघटनांनी मुंबईच्या प्रेरणा या संघटनेमार्फत नॅकसेट कार्यजाळे सक्रिय केले आहे. कुंटणखान्यातील शोषित महिला व मुलींसाठी पुनर्वसनाचे काम यांद्वारे चालते. महाराष्ट्र राज्याच्या सर्व विभागांत नॅकसेट च्या सहयोगी संस्था आहेत. नगर जिल्ह्यातील स्नेहालय ही अशीच एक सदस्यसंस्था आहे. महात्मा फुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून संवेदना ही संस्था सन १९८०पासून मुंबईतील कामाठीपुरा परिसरात अनेक उपक्रम राबविते.

वारांगना आरोग्य, कायदेविषयक साहाय्य व पर्यायी रोजगाराबाबत मदत केली जाते. नारी संघर्ष पंचायत या नावाने येथील भगिनी स्वत:च संघटित होऊन स्वत:चे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. आशा हा प्रकल्प मुंबई महापालिकेतर्फे, एडस्‌ व इतर यौनकर्माशी संबंधित आजारांबाबत जागरूकता वाढविणे व उपचार करण्याबाबत ठोस काम करीत आहे. वरील प्रकल्पाशी संलग्न अशा तीस संस्था वारांगनांमध्ये एडस्‌बाबत जागृती आणणे, ऐच्छिक रक्ततपासणी मोहिमा व निरोध- कंडोम वापराबाबत माहिती देणे, आदी कामे करतात. मुंबईखेरीज इतर शहरांमध्येही स्वयंसेवी संस्थांचे कार्य चालते. नेटवर्क अगेन्स्ट कमर्शिअल सेक्स्युअल एक्सप्लॉयटेशन अँड ट्रॅफिकिंग ही नगरमधील स्वयंसेवी संस्था, लालबत्ती विभागात शरीरविक्रय व लैंगिक शोषणाविरुद्ध कार्य करीत आहे. कोलकाता येथे नोव्हेंबर २००० साली वारांगनांची परिषद झाली. या परिषदेस आशिया खंडातील अनेक देशांतील भगिनी उपस्थित राहिल्या. त्यांचे माणूस म्हणून हक्क जपण्यासाठी व समाजात मिळणारी उपेक्षा कमी करण्यासंबंधी या परिषदेत आवाज उठविण्यात आला.

या परिषदेचे संयोजन दुर्बार महिला समन्वय समिती या बंगालमधील महिलांच्या संस्थेने केले. येथील सोनागाची प्रकल्पाद्वारे त्या भगिनींना एड्‌सबाबत माहिती मिळते. पुणे शहरामधील वंचित विकास ट्रस्टतर्फे निहार हा एक लक्षणीय प्रकल्प चालविला जातो. सन १९८९पासून येथे अशा भगिनींच्या बालकांसाठी निवासी केंद्र चालविले जाते. या मुलांना पालनपोषण, शिक्षण व रोजगार मिळवून देण्याचे कार्य चालू आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. स्त्रियांच्या प्रश्नावर विचार व कृती करण्यासाठी महाराष्ट्र सरकार व पोलीस विभागाने सुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. महिला व बालकल्याण संचालनालयातर्फे निराश्रित महिलांना नारी निकेतन संस्थातर्फे साहाय्य मिळते. मात्र सरकारी योजनांना जोड म्हणून स्वयंसेवी संस्थांचे या क्षेत्रातील कार्य अनिवार्य आहे.

वेश्याव्यवसायास कारणीभूत ठरणारे घटक- कोणत्याही समाजात वेश्यावृत्ती व वेश्याव्यवसाय निर्माण होण्यास व फोफावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेकविध घटकांमध्ये मुख्यत्वे या बाबींचा समावेश होतो- वेश्याव्यवसायास चालना देणाऱ्या प्रेरक घटकांमध्ये स्त्रियांची कौटुंबिक पार्श्वभूमी महत्वाची ठरते. आई- वडिलांमधील सततचे तणाव व संघर्ष, व्यसनाधीन वडील किंवा वेश्याव्यवसाय करणारी आई-बहीण असणे, अशा परिस्थितीमुळे स्त्रीवर ही आपत्ती ओढवू शकते. स्त्रीला वेश्याव्यवसायाकडे आकृष्ट करणारे घटक मुख्यत: आर्थिक स्वरूपाचे असतात. दारिद्र व उपासमारीमुळे ग्रामीण भागातील स्त्रियांना फसवून, नोकरीची वा विवाहाची खोटी आमिषे दाखवून कुंटणखान्यात आणून विकले जाते. अनाथ तसेच परित्यक्ता स्त्रियांना कधीकधी शरीर विक्रयावाचून इलाज उरत नाही. त्याचप्रमाणे चंगळवादी शहरी संस्कृतीमुळे अधिक पैसा कमविण्याकरिता काही स्त्रिया कॉलगर्लचा व्यवसाय पत्करतात. यांतील काही नोकरीच्या व्यतिरिक्त कमाईसाठी कुमार्गाला वळतात. शहरातील हॉटेले, क्लब व इतर मनोरंजनाच्या ठिकाणी या स्त्रियांचे दलाल गिऱ्हाईक पटवितात व अनैतिक व्यवहारांना संघटित स्वरूप प्राप्त होते.

वेश्याव्यवसाय पत्करण्यामागचे निर्णायक घटक- प्रिसिपिटेटिंग फॅक्टर्स हे प्रामुख्याने निराधार व फसविल्या गेलेल्या स्त्रियांच्या बाबतीत बलवत्तर ठरतात. कुमारी मातांना कुटुंबातून बहिष्कृत केले गेल्यास त्यांची दयनीय परिस्थिती होते. अशिक्षित व गरीब मुलींना असाहाय्यतेमुळे वेश्याव्यवसाय करावा लागतो. समाजात वेश्याव्यवसाय फैलवण्यामागे आणखीही काही निर्णायक घटक कार्यरत असतात. विवाह हा लैंगिक गरजा भागविण्याचा रीतसर मार्ग असला, तरी त्याद्वारे समाजातील सर्वच स्त्रीपुरुषांच्या सर्व प्रकारच्या शारीरिक गरजा भागवल्या जातातच, असे नाही. अनेक कारणांनी विवाहासारखा पर्याय काही व्यक्तींच्या बाबत कधी दुर्लभ, तर कधी असफल ठरतो. अशा परिस्थितीतील पुरुषांना विवाहबाह्य संबंध ठेवणे शक्य होत नाही. वेश्यांबरोबर संबंध ठेवणे सोपे जाते, कारण तेथे परस्परांबद्दलचे भावनिक आकर्षण, प्रेम, बांधीलकी, निष्ठा यांचा पूर्ण अभाव असतो. पैशाच्या मोबदल्यात शारीरिक गरज भागू शकते. अनेकवेळा विकृत किंवा अनैसर्गिक गरजा भागविण्यासाठी त्यांचा उपयोग घेतला जातो.

शहरीकरणामुळे व दारिद्र्यामुळे शहरात कामासाठी एकटे राहणाऱ्याची संख्या वाढते. हुंड्यासारख्या प्रश्नांमुळे विवाहित स्त्रीला छळ व अवहेलना सोसावी लागते व स्वत:चा बचाव करण्याकरिता कधीकधी घर सोडावे लागते. या निराधार स्त्रियांची विटंबना टळू शकत नाही व त्यांना अनिच्छेने या व्यवसायात ओढले जाते. लैंगिक संबंधांविषयीचे अज्ञान तसेच संपर्कमाध्यमांतून दाखविले जाणारे अश्लील व बीभत्स स्त्री-पुरुष संबंध यांचा प्रभाव तरुण अजाण मुलामुलींच्या अध:पतनास कारणीभूत होतो. तरुण मुलींच्या वाट्याला अकाली मातृत्व व बहिष्कार आल्यामुळे त्या या व्यवसायात पडतात, हे येथे निंदनीयच!

✒️संकलन व सुलेखन:-श्री कृष्णकुमार गो. निकोडे गुरुजी(मराठी व हिंदी साहित्यिक)मु. एकता चौक, रामनगर- गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३