वंचित समुहातील लोकांचे प्रश्न एकत्र करून जनतेचा जाहिरनामा तयार !

183

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4फेब्रुवारी):-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील ११८ गावात वंचित, उपेक्षित व दुर्बल घटकात कार्य करणाऱ्या व्यक्ती,गट,समुह,मंडळ, संस्था, संघटना यांना भेटून त्यांचे निकडीचे प्रश्न, समस्या, अडचणी संकलित केल्या आहेत.त्यावर सर्व बाजूंनी चर्चा केली आहे.त्याचे विश्लेषण करून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या समोर मांडणार आहोत.

सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, कामगार,एकल महिला, कंत्राटी शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, भटके विमुक्त जमाती, ऊसतोड मजूर, आदिवासी,बचतगट, अल्पसंख्याक समुह, ओबीसी संघटना,बेघर, गुंठेवारी क्षेत्रातील रहिवासी, मोलकरीण,हमाल, मेंढपाळ,दिव्यांग संघटना, रिक्षाचालक असे अनेक घटकासमवेत बैठक घेऊन त्यांचे निकडीचे प्रश्न, अडचणी घेण्यात आले आहेत.यावर आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने काम केलेलें नाही.

यावर फक्त आश्वासन देऊन वंचित घटकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.सध्या आरोग्य, शिक्षण,निवारा, रोजगार, महागाई हे प्रश्न समाजात असताना सत्ताधारी पक्ष भावनिक अस्मिता, धार्मिक व मंदिराचे राजकारण करीत आहे.यातून देशातील नागरिकांचे एकही प्रश्न सुटणार नाही.त्यामुळे जनतेचा जाहीरनामा तयार करून तो संबंधित उमेदवार व राजकीय पक्षातील प्रमुख यांना सादर करून हे मुद्दे सोडवण्यासाठी प्रयत्न करावे.

यासाठी दबावगट निर्माण करणार आहोत.त्यासाठी सर्व लोकसभा मतदारसंघात एक कमिटी स्थापन करून पत्रकार परिषदेत याविषयी घोषणा करण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना एकाच मंचावर एकत्र करून त्यांच्या पुढे हा जाहीरनाम्यातील मुद्दे पुर्ण करण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच जनतेच्या जाहीरनाम्यातील सर्व मुद्दे आपण पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती जाहीरनामा समितीव्दारे करण्यात येणार आहे.