काय गं माय! खरंच पैशांचा पाऊस पडतो का ?

126

भारतावर निसर्गाने भरभरून उधळण केली आहे. तीन भिन्न ऋतुसह विविधतेने नटलेला हा देश काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विविध नेत्रसुखद, प्रेक्षणीय स्थळांची मोहिनी घालतो. इथे हिमालयासारखे उंच बर्फाच्छादित पर्वत असून राजस्थानमध्ये शेकडो मैल पसरलेले वाळवंट आहे. देशाला विस्तीर्ण समुद्र किनारे लाभले आहेत. तसेच येथे सुपीक, विविध रंगाची आणि हजारो प्रकारची पिके देणारी जमीन असून, त्यामुळे प्रदेशागणिक विविध प्रकारचे पदार्थ चाखण्याचा मनमुराद आनंद घेता येतो. येथे अनेक धर्मांचे, पंथांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्रित राहून विविधतेत एकतेचा सुखद अनुभव देतात. त्यामुळे भारतात जन्म मिळाल्याचा निश्चित अभिमान वाटतो. पण जेव्हा ठाण्यामध्ये पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेमुळे सतरा महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची बातमी वाचनात येते, तेव्हा मात्र शरमेने मान खाली जाते. ह्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी सात लोकांना अटक केली असून त्यात एका महिलेचा सहभाग असल्याचे कळते. पोलीस पुढील चौकशी करीत असून ह्या कामुक भामटय़ांचे जाळे देशभर पसरले असल्याचे कळते. आणि ते सत्य असेल तर ती अतिशय चिंतनीय बाब आहे.

पाऊस आणि तो देखील पैशांचा? मोठी अनाकलनीय गोष्ट आहे. आपण एकविसाव्या शतकात विज्ञान युगात वावरतो आहोत. आणि अशा स्थितीत पैशांचा पाऊस पाडण्याच्या भूलथापांना स्त्रिया बळी कशा पडल्या? हा प्रश्न डोकं कुरतडतो. ही केवळ अंधश्रद्धा असून, त्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्या नागवल्या गेल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ठाम मत होते की,ज्या कुटुंबात स्त्री साक्षर असते, त्या कुटुंबाचा विकास होतो. पर्यायाने समाज, देश प्रगती पथावर जातो. आपल्या समाजव्यवस्थेने हजारो वर्षापासून स्त्रियांना शिक्षणापासून हेतुपुरस्सर दूर ठेवल्यामुळे त्यांच्यातील अज्ञानामुळे त्या कायम अंधश्रद्धेच्या बळी ठरल्या आहेत. म्हणुन बाबांनी संविधानात स्त्रियांना सक्तीचे शिक्षण केले. त्या संधीचा लाभ घेत स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक यश मिळवून प्रगती केली आहे. परंतु सध्यस्थितीत देखील स्त्रिया मोठय़ा प्रमाणात अनेक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांच्यावर अनेक जाचक बंधने आहेत. त्यामुळे तिला बाहेरच्या जगाची तिची ओळख होत नाही. अशा स्त्रिया ह्या भोंदू लोकांच्या आमिषाला बळी पडून स्वनाशास कारणीभूत ठरतात.

जगात थोड्या फार फरकाने सगळीकडे परंपरागत अंधश्रद्धा आहेत. प्रगत देशांत ती अल्प प्रमाणात, तर दुर्गम, मागास, अतिमागास देशांत प्रचंड प्रमाणात असल्याचे आढळून येते. कारण तिथे शिक्षणाचा अभाव आहे. एकीकडे आपण विज्ञान, तंत्रज्ञानात उत्तुंग भरारी घेत सूर्याला गवसणी घालण्याचे बेत आखतो आहोत, तर जगात कुठेही, कुणाशी ही भ्रमणध्वनीच्या माध्यमातुन संपर्क प्रत्यक्ष बोलू शकतो. त्याच आधुनिक जगात आपल्या वरील संकट टळावे किंवा बरकत व्हावी म्हणुन रस्तोरस्ती सुई, मिरच्या, लिंबूच्या माळेची विक्री होतांना दिसते आणि त्याहून आश्चर्य म्हणजे सुशिक्षित म्हणवणारे लोक ती विकत घेतांना ही दिसतात.

अंधश्रद्धेचं भूत हे धर्माच्या छत्रछायेखाली वृद्धिंगत होते. ते कायम विज्ञानाकडे, आधुनिक तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवून, परंपरागत रिती, रिवाज, पद्धती की ज्या विज्ञानाच्या कसोटीवर खर्या उतरत नाहीत, त्याच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडते.देवाला मुक्या प्राण्यांचा बळी देणे, दरवाजावर टाचणी, लिंबू, मिरच्या एका धाग्यात बांधुन लावणे.

लहान मुलींच्या केसात बट आली म्हणजे तिचे देवाशी लग्न लावून तिला देवदासी बनवणे, कुठे गुप्त खजिन्याच्या हव्यासापोटी नरबळी देणे, घरावरील संकट टाळून बरकत व्हावी म्हणुन नागबळी पूजा करणे अशा कितीतरी अंधश्रद्धेने प्रेरित गोष्टी सांगता येतील.भारतीय जनमानसावर अंधश्रद्धेचं भूत किती घट्ट आहे. ह्याचे एक उदाहरण देतो.फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीतील एका कुटुंबातील अकरा लोकांनी एकाच वेळी आत्महत्या केल्याची घटना घडल्याने देशभर हाहाकार उडाला. सहाजिकच प्रश्न पडतो की, एकाच कुटुंबातील अकरा लोकांना असा काय प्रश्न पडला होता़ कि, त्यांनी सामुदायिक आत्महत्येचे पाउल उचलले?

पोलीस तपासात त्या घरांमध्ये दोन रजिस्टर सापडली. त्यातील नोंदीनुसार असे समजले कि, मोक्ष प्राप्ती हवी असेल तर जीवनाचा त्याग करून मृत्यूला जवळ करा. म्हणजे त्यांनी मोक्ष प्राप्तीसाठी मृत्यूला जवळ केले. धर्म, श्रद्धा हा खाजगी विषय असून, कुणी कशावर विश्वास ठेवावा. हे ज्याने त्याने ठरवायचे असते. पण आपण जी गोष्ट करतो, ती खरी की खोटी ह्याची पडताळणी करायला नको? निसर्गाने इतके सुंदर आयुष्य दिले आहे. ते असेच वाया घालवायचे का? ,त्यांना असा कोणता उपदेशक भेटला की ज्याने स्वताचे आयुष्य संपवून मोक्ष प्राप्त केला? आणि पुन्हा जन्म घेऊन ह्यांना उपदेश करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर अवतरला.माणसाच्या उत्पत्तीपासून एक तरी असे उदाहरण देता येईल का? ज्या व्यक्तीने जिवन संपवून मोक्ष प्राप्ती केली आहे. आणि अशी व्यक्ति पुनर्जन्म घेऊन मार्गदर्शन करती झाली? वैज्ञानिक दृष्ट्या ही केवळ असंभव गोष्ट आहे. ह्याचा सरळ अर्थ असा होतो की, हे सर्व थोतांड असून, त्याची उत्पत्ती निव्वळ अंधश्रद्धेतून होत असल्याचे सिद्ध होते.

आता प्रश्न येतो तो म्हणजे मोक्ष म्हणजे काय?
मोक्षाच्या धर्मागणिक वेगवेगळ्या धारणा आहेत. ज्याला मोक्ष म्हंटले जाते, त्याला बौद्ध धम्मात निर्वाण किंवा निब्बाणा असे म्हणतात.निर्वाण किंवा निब्बाण म्हणजे अंत. ह्याचा अर्थ असा होत नाही की, माणसाचा अंत किंवा मृत्यू. ह्याचा अर्थ असा आहे की, माणसाच्या मनातील सर्व इच्छा, भ्रम, मोह, माया, क्रोध, स्वार्थ, ह्यांचा अंत होऊन ज्याला मानसिक समाधान, तृप्ती, सुख, आनंद प्राप्त होतो. ती अवस्था म्हणजे निर्वाण किंवा निब्बाण असे म्हणतात.ही एक मानवी जीवनातील परमोच्च अवस्था असून,ही अवस्था प्राप्त व्यक्ती दुसर्‍या कुणालाही उपद्रव करीत नाही. तो आपल्या विचारांवर ठाम असतो. तो सर्व गोष्टींचा विज्ञानाच्या कसोटीवर विचार करून मार्गक्रमण करतो. त्यामुळे अशी व्यक्ति अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरांना झुगारून देते. तो फक्त मानवी कल्याणाचा ध्यास घेऊन पुढील आयुष्य त्यासाठी घालवतो.

हे सर्व लिहिण्याचे कारण एव्हढेच आहे की, अंधश्रद्धेच्या आहारी जावून आपण आपलेच किती नुकसान करून घेतो. आपल्या देशात शहरांपेक्षा गाव खेड्यांमध्ये संख्येने खूप लोक वास्तव्यास आहेत. तिथे साक्षरतेचे प्रमाण अल्प असल्यामुळे अंधश्रद्धांचा पगडा जास्त असल्याचे दिसते. म्हणुन कुणी जर अशाप्रकारचे अघोरी उपाय किंवा लालसा दाखवली तर कुटुंबातील लोकांशी चर्चा करणे आवश्यक आहे, जेणेकरून मत मतांतरांतून योग्य मार्ग दिसतो. त्यामुळे पुढील संकट टाळता येते. त्यासाठी प्रत्येक स्त्री, पुरुषाने जीवनातल्या प्रत्त्येक गोष्टींचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार केल्यास अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना निश्चित पायबंद बसेल.

✒️अरुण निकम(मो:-9323249487)