गेवराई तालुक्यातील ‘पीएम किसान’च्या हप्त्यापासून १५ हजार शेतकरी वंचित

130

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १६ तर महाराष्ट्र सरकारच्या नमो सन्मान निधीच्या हप्त्याचे वितरण २८ फेब्रुवारी रोजी झाले. पण, गेवराई तालुक्यातील जवळपास १५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन्ही योजनांचे हप्ते जमा झालेले नाहीत. यासाठी शेतकरी कृषी कार्यालयात गर्दी करत आहेत.

राज्या सराकारने नमो सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. दरम्यान, या दोन्ही योजनांचे हप्ते ता. २८ फेब्रुवारी रोजी एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. पण, तालुक्यातील ५५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांपैकी तब्बल १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्ते जमा झाले नसल्याने या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
आपल्याला हप्ता का मिळाला नाही, म्हणून हे शेतकरी कृषी कार्यालयात मोठी गर्दी करत आहेत. पण, कार्यालयात अपुरे मनुष्यबळाचे कारण समोर करत याठिकाणी कर्मचारी मात्र व्यवस्थित मार्गदर्शन करत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

*खाते इनॲक्टिव्ह झाले*

गेवराई तालुक्यातील जवळपास १५ हजार शेतकऱ्यांचे खाते इनॲक्टिव्ह केल्याने त्यांच्या खात्यावर दोन्ही योजनांतील २ हजार रुपयांचा हप्ता पोचला नाही, ही बाब समोर आली आहे. या शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही.
ई-केवायसी पूर्ण न होणे, जिओ-व्हेरिफिकेशन किंवा बँक खात्याशी आधार लिंक न करणे ही कारणेदेखील हप्ता खात्यात जमा न होण्याची असू शकतात. त्यामुळे हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. यानंतरच त्यांना योजनेचा लाभ मिळेल, असे तालुका कृषी अधिकारी अभय वडकुते यांनी सांगितले.