गोळ्या दिल्या पण खोकल्याचे औषध दिले नाही म्हणून, रूग्णाने डॉक्टरच्या कानशिलात लगावली गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार

236

 

बीड जिल्हा प्रतिनिधी – नवनाथ आडे,9075913114

सर्दी, खोकल्याचा आजार झालेला रूग्ण उपचारासाठी आला. डॉक्टरांनी त्यास गोळ्या दिल्या. परंतू खाेकल्याचे औषध न दिल्याने संतापलेल्या रूग्णाने डॉक्टरच्या कानशिलात दोन चापटा मारल्या.
हा प्रकार गेवराई उपजिल्हा रूग्णालयात ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता घडला. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकाराने डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेवराई उपजिल्हा रूग्णालयात शुक्रवारी डॉ.बालाजी नवले हे अपघात विभागात कर्तव्यावर होते. महाशिवरात्री असल्याने ओपीडी विभागात सुट्टी होती. त्यामुळे स्वप्नील जगन्नाथ मस्के (रा.गेवराई) हा सर्दी, खोकला झाल्याने उपचारासाठी आला. डॉ.नवले यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याला गोळ्याही दिल्या. परंतू समाधान न झाल्याने मस्के याने डॉक्टरांकडे खोकल्याच्या बाटलीची मागणी केली. डॉ.नवले यांनी ही बाटली अपघात विभागात उपलब्ध नाही. तोपर्यंत गोळ्या दिल्या असून उद्या सकाळी ओपीडीतून खोकल्याचे औषध घ्या, असा सल्ला दिला. हाच राग आल्याने मस्केने शिवीगाळ करत डॉक्टरच्या कानशिलात दोन चापटा मारल्या. त्यानंतर येथील ब्रदर महेंद्र भिसे, कक्षसेवक संतोष भोटकर आणि सुरक्षा रक्षक किशोर उबाळे यांनी त्याला पकडले. त्याला बाजूला केल्यानंतरही तो शिवीगाळ करत तेथून निघून गेला. त्यानंतर डॉ.नवले यांनी गेवराई पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून मस्केविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

*चुक आरोग्य विभागाची अन् शिक्षा डॉक्टरांना*

खरं तर औषधी, गोळ्या मुबलक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही आरोग्य विभागाची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ ऑगस्ट २०२३ पासून सर्व सेवा, सुविधा, उपचार मोफत केले असून औषधीही देण्याचा निर्णय घेतला. परंतू आजही शासकीय रूग्णालयांमध्ये पूर्णपणे औषधी दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. याचा फटका डॉक्टरांना बसत आहे. यावरून डॉ.नवले यांना रूग्णाने मारहाण केली आहे. परंतू यानिमित्ताने डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.