रंगपंचमीच्या आधी धरणगावात हिरवेगार पाणी…

235

 

धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील

धरणगाव — येथील नगरपरिषद मार्फत शहराला रंगपंचमीच्या अनोख्या सदिच्छा प्राप्त झाल्या असून घराघरात हिरव्यागार पाण्याचा पुरवठा केला जात असून नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ खेळला जातोय.
धरणगाव आणि पाणी हे समीकरण काही नवीन नाहीये. गावातील जनता तर नेहमीच म्हणत असते की, “घर ना उघडा आनी याहीन ले लुगडा.” विज्ञान विषयांत शालेय शिक्षणात शिकवलं जातं, पाण्याचे गुणधर्म… पाण्याला रंग नसतो, पाण्याला गंध नसते, पाण्याला चव नसते मात्र धरणगाव या सर्व गुणधर्मांना अपवाद आहे. इथल्या पाण्याला रंग असतो, गंध असतो आणि चवही असते मात्र याबाबत जर गावातील राजकीय लोकांना विचारणा केली तर ते सांगतात की, ज्यांना धरणगाव चे पाणी पचले त्याला इतरत्र कुठेही पाण्यापासून त्रास होत नाही. आता नेमकं या उत्तराचा अभिमान बाळगावा की लाज हाच मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. पंधरा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा देखील अशुद्ध स्वरूपाचा होत असेल तर नेमकं पाणी कुठे मुरतंय याची चिकित्सा झाली पाहिजे. फिल्टर प्लांट असून देखील जर गावातील पाणीपुरवठा असा होत असेल तर मग जनतेने नेमकं कोणाकडून अपेक्षा ठेवावी. पाणी, रस्ते, गटारी यामुळे निर्माण झालेला साथीच्या आजारांना आळा कसा घालायचा याच चिंतेत नागरिक हैराण आहेत परंतु बोलायला मात्र कोणीच तयार नाही. सहनशीलतेचा नोबेल पारितोषिक जर दिला गेला तर तो धरणगावकर जनतेला बिनविरोध दिला जाईल यात तिळमात्र शंका नाही. ‘अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो’, असं बाबासाहेब म्हणायचे. गावात लोकांनी बोअरवेल लावून घेतले, आरो बसवले परंतु त्यातून फक्त व्यक्तीगत समस्यांची सोडवणूक झाली मात्र गावाचं काय?

लेखनप्रपंच
लक्ष्मणराव पाटील
जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड जळगाव तथा एक सामान्य धरणगावकर नागरिक