उद्योजकीय कौशल्य विकसित करण्याची नितांत गरज – प्रा. राजेश्वरी कदम

93

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड, (दि. 4 एप्रिल)
उद्योजकीय कौशल्य विकसित करण्याची आज नितांत गरज असून विद्यार्थ्यांनो, सातत्याने ज्ञान संपादन करून चारित्र्य निर्माण करा, तुम्ही मिळवलेल्या ज्ञान व शिक्षणाचा उपयोग समाजाच्या हितासाठी केला पाहिजे असे प्रतिपादन नायगाव, जि. नांदेड येथील प्रा. राजेश्वरी कदम यांनी केले. येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी वितरण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गीत सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम, प्रा. डॉ. धनराज तायडे, नॅक समन्वयक प्रा. डॉ. कुंतल बोंपिलवार व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाने केलेल्या गुणवत्तापूर्ण विकासाची व राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

प्रा. राजेश्वरी कदम आणि मान्यवरांच्या शुभहस्ते २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले.

महाविद्यालयाचे संजीवक कै. डॉ. आत्मारामजी गावंडे यांचे खूप उपकार आपल्यावर आहेत. विद्यार्थ्यांनो, भरपूर शिका आणि आई, वडिलांना विसरू नका. माजी विद्यार्थी म्हणून गावंडे महाविद्यालयासही विसरू नका, माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद व्हा, असे आवाहन डॉ. यादवराव राऊत यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले.

प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात पदवी वितरण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. पी. डी. जाधव, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा.अभय जोशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. के. बी. शिरसे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.