धानोरे गावात गुरू -शिष्य जयंतीनिमित्त मान्यवरांना भारतीय संविधान भेट २० विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव !…

57

 

शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर आपले प्रेरणास्त्रोत – व्याख्याते पी.डी.पाटील

शिवजयंतीचे खरे जनक राष्ट्रपिता ज्योतिराव फुले – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील

पुढच्या वर्षी गुरु-शिष्य जयंती महोत्सव व्यापक स्वरूपात करणार !.. – सरपंच भगवान महाजन

धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील

धरणगाव — तालुक्यातील धानोरे गावात आधुनिक भारताचे शिल्पकार – शिक्षणतज्ञ – विचारवंत – क्रांतीसुर्य – महात्मा जोतिराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार – कायदेपंडित – अर्थतज्ञ – बोधिसत्व – महामानव – पुस्तकप्रेमी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच गुरू -शिष्य यांच्या जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय गोपाल बाविस्कर यांनी करून दिला. जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच भगवान महाजन होते. प्रमुख व्याख्याते सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते. सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय,आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतीराव फुले, महामानव डॉ.बी आर आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाची मंगलमय वातावरणात सुरवात झाली. मान्यवरांचे शाल – पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
गुरु – शिष्य जयंती महोत्सवाचे औचित्य साधून धानोरे गावातील २० विद्यार्थ्यांनी महामानवांच्या जीवनपटावर सुंदर भाषण केले. गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व आयोजकांकडून प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. सरपंच भगवान महाजन यांनी प्रति विद्यार्थी २०० रुपये व आयोजकांकडून विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन बालगोपालांचा गौरव केला.
प्रमुख व्याख्याते सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक तथा आदर्श शिक्षक पी.डी.पाटील यांनी बाबासाहेब व तात्यासाहेब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर हेच आपले प्रेरणास्त्रोत आहेत यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे असे आवाहन पाटील यांनी केले.
संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष तथा शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की, तथागत गौतम बुद्धापासून तर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामानवांनी जाती भेदाच्या चौकटी तोडून समाजिताचे कार्य केले. महापुरुषांना जाती-जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका आणि शिवजयंतीचे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुलेच आहेत असे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान महाजन यांनी महामानवांचे विचार सांगत असताना ग्रामस्थांनी कर्मकांडापासून दूर राहावे, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका, सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा हेच खऱ्या अर्थाने महापुरुषांना आदरांजली असेल आणि पुढच्या वर्षी गुरु – शिष्य जयंती ग्रामपंचायत चौकात मोठ्या उत्साहाने एकोप्याने साजरी करणार असे प्रतिपादन महाजन यांनी केले.
याप्रसंगी गावाचे सरपंच भगवान महाजन, माजी सरपंच गोपाल बाविस्कर, उपसरपंच अशोक पाटील, मा.उपसरपंच वामन शिरसाठ,ग्रामपंचायत सदस्य मायाबाई विसावे, राजाराम महाजन, हरी पाटील, पितांबर बाविस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष, युवक आबालवृद्ध, लहान मुलं – मुली यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल बाविस्कर व आभार प्रदर्शन अजय बाविस्कर केले.
गुरु – शिष्य जयंती महोत्सव यशस्वीतेसाठी मनोज शिरसाठ, स्वप्नील विसावे, कुंदन शिरसाठ , निलेश शिरसाठ, दिपक शिरसाठ, भूषण विसावे, सुमेध सुरवाडे, अजय बाविस्कर आदित्य राजेंद्र जाधव, मोहित जगन्नाथ भालेराव. भिम संघर्ष मित्र मंडळ धानोरे व समस्त धानोरे ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.