वसुंधरा प्राथमिक शाळेचा सुयोग धस राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत महाराष्ट्रात पहिला

32

🔹आष्टीतील चिमुकल्या सुयोगची यशोगाथा : गायन कलेसाठी पन्नास हजार रुपयाचे साहित्य खरेदी

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.25जून):-कोरोना महामारी मुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत.पहिली मध्ये दाखल झालेल्या मुलांनी शाळा आणि आपले शिक्षक यांना देखील पाहिले नाही.मित्र नाही,खेळणं नाही,मस्ती नाही,गाणी नाही की गोष्टी नाही.मधल्या सुट्टीतला पोषण आहार नाही,खेळाचा तास नाही,मोकळ्या वेळेत वाचनालयातील गोष्टीची पुस्तके नाहीत.झेंडा वंदन, पताका, गणवेश,खाऊ वाटप सगळं – सगळं बंद.वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, वाचन स्पर्धा यामध्ये सहभाग नाही. शाळेतील कुठलाच आनंद नाही.सगळं कोरोनामुळे ठप्प.सगळीकडे ऑनलाईन शिक्षण.लहान – लहान मुलं यापासून वंचित आहेत. अभ्यासाचा ससेमिरा नाही.

नाही तरी हल्ली लहान मुलांना अभ्यासाचा ताण फार येतो.कारण विषय खूप असतात. लहान मुले त्यांचे बालपण हरवून बसतात इत्यादी.

परंतु दर वेळेस आपण त्यांना सांगत असतो की,शाळा खूप चांगली असते.अगदी लहानपणी मुलांना कदाचित शाळा आवडत नसेल,पण नंतर म्हणजे पौगंडावस्थेत शाळा,शिक्षक,मित्र – मैत्रिणी हे मुलांचे विश्व असते.ते या विश्वात पूर्णपणे रमून जातात.म्हणून शाळा या संस्थेची गरज आहे.परंतु कोविड मुळे हे सारं – सारं बंद.शाळेमध्ये निबंध, वक्तृत्व, चित्रकला अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतात. स्नेहसंमेलने असतात. विज्ञान प्रदर्शने भरवली जातात. सहली असतात.या सर्व गोष्टींमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. चार लोकांसमोर कसे वागावे,बोलावे हे समजते.सभाधीटपणा येतो. नेतृत्वगुणाची वाढ होते. मुले आपापल्या आवडीप्रमाणे या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात.या सर्व उपक्रमांचा पुढील आयुष्यात नोकरी मिळवितांना,मुलाखतीला सामोरे जाताना उपयोग होतो.
पालकांची महत्त्वाकांक्षा म्हणून ते आपल्या मुलांना ढिगभर क्लासेसना पाठवतात व यात मुलांचे स्वछंदी, फुलपाखरांप्रमाणे असणारे बालपण हरवून जाते.दोष मात्र दिला जातो शाळेला.

सरतेशेवटी असे वाटते की,पालकांनी आपल्या मुलांची आवड,कल व त्याचबरोबर कुवत ओळखून त्याला प्रोत्साहन द्यावे,त्याचा उपयोग मुलांचे भावी आयुष्य सुखी,समाधानी,आनंदी व यशस्वी होण्यास मदत होईल.असाच प्रयोग आष्टी तालुक्यातील एका आदर्श शिक्षकाने आपल्या मुलाच्या बाबतीत केला.त्या गुणी व आदर्श शिक्षकाचे नाव आहे विकास बुवासाहेब धस.विकास धस सरांनी आपल्या मुलाचा कल ओळखत व त्यामधील सुप्त गुण पाहून त्याला संधी प्राप्त करून दिल्या.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात,तसं धस सरांचा मुलगा सुयोग याच्या बाबतीत झालं.अवघ्या ६ वर्षाचा असलेल्या सुयोगला गायन, वादन, लेखन याचा छंद होता. शाळा नसल्यामुळे घरी वेळही भरपूर होता.सरांनी याचाच फायदा घेतला आणि त्याला गायन वादन शिकवले.सुयोगच्या गायन छंदासाठी धस सरांनी पन्नास हजार रुपयांचे संगीत वाद्य खरेदी केले.त्यामुळे सुयोग ते सहजच शिकला. लेखनाचा छंद असल्यामुळे त्यांनी तोही जोपासला. सरांच्या घरामध्ये लेखन कला वडिलांपासून आहे. सुयोगच्या आजोबांचे देखील हस्ताक्षर सुंदर आहे.थोडक्यात म्हणजे हस्ताक्षराची कला ही गणितीय भाषेत आबाबा कसोटी म्हणावी लागेल.आ म्हणजे आजोबांकडून बाबाकडे आणि बाबांकडून बाळाकडे.गायन वादनाबरोबर सुयोग सुंदर हस्ताक्षर काढत होता.विशेष म्हणजे यासाठी सुयोगला कोणताही क्लास लावलेला नाही.या त्याच्या कलेमुळे सुयोगच्या नावाप्रमाणे योग जुळून आला.सुयोगचे हस्ताक्षर सुंदर मोत्याप्रमाणे असल्यामुळे त्याने बालसंस्कार समूह महाराष्ट्र आयोजित ऑनलाईन राज्यस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धत भाग घेतला.दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.

यात १ ते ४ चा व ५ ते ८ चा असे गट होते.विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देणारी, उद्याचे नवनिर्माणकार घडवणारी सुंदर अशी ही स्पर्धा होती.कोरोना कालावधीत शाळा बंद पण शिक्षण चालू या अंतर्गत विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेशी जोडून ठेवण्याचे काम या स्पर्धेने केले.गेल्या दिड वर्षापासून विद्यार्थीही अभ्यासापासुन, लिखानापासून दुरावले होते.लेखनाचा सराव ही कमी पडत चालला होता.विद्यार्थी हित लक्षात घेऊन राज्यस्तरीय ऑनलाईन हस्ताक्षर स्पर्धा ही १० जून रोजी घेण्यात आली.यात १ ते ४ या गटात सुयोगने भाग घेतला.आणि अपेक्षेप्रमाणे घवघवीत यश संपादन करून एकूण ३७०० विद्यार्थ्यांमधून छोटया गटात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला.या स्पर्धेचा निकाल २२ जून रोजी सांयकाळी ६ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आॕनलाईन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची बहारदार सुरुवात सुदाम साळुंके व नवनाथ सुर्यवंशी यांच्या प्रास्तविकाने झाली.या कार्यक्रमासाठी पूर्व शिक्षण संचालक पुणे चे गोविंद नांदेडे साहेब हे अध्यक्ष म्हणून लाभले तर शिक्षण संचालक औरंगाबाद रमाकांत काठमोरे साहेब,प्राचार्य डायट संगमनेर डी.डी.सूर्यवंशी साहेब, शिक्षणाधिकारी जि.प. अहमदनगर शिवाजी शिंदे साहेब,पोपटराव काळे साहेब,मोहनीश तुंबारे साहेब, श्रीम.साईलता सामलेटी मॕडम,रामनाथ कराड साहेब,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ,नारायण मंगलारम,श्रीम.वैशाली भामरे मॕडम, दै.रयतेचा वाली संपादक शाहू संभाजी भारती इत्यादी आदर्श मान्यवर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उभ्या महाराष्ट्रावर उमटवलेले प्रेरणादायी स्रोत,दिग्ग्ज मान्यवर लाभले.

सर्व मान्यवरांचा बालसंस्कार समूह आयोजक टिमकडून आॕनलाईन पद्धतीने यथोचित सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रेरणादायी,उद्बोधक मार्गदर्शन केले.त्यांचा प्रत्येक शब्द म्हणजे चैतन्याने रसरसलेली बौद्धिक मेजवानी होती.तसेच स्पर्धेचे तोंडभरुन कौतुक केले.यावेळी राज्यातून प्रथम आलेला पियुष हिंगणे,विनया जाधव,आदित्य पागिरे व पालक प्रतिनिधी म्हणून विवेक खामकर सर व बांदेकर मॕडम यांनी तर आयोजक टिम मधील राजेंद्र पोटे,सुनिता इंगळे,कैलास भागवत, अकबर शेख,मनिषा पांढरे, अशोक शेटे यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या.हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पार पडला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शबाना तांबोळी मॕडम व बालाजी नाईकवाडी सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले.
या स्पर्धेचा निकाल लहान गट,मोठा गट पुढील पद्धतीने घोषित करण्यात आला.लहान गट – प्रथम सुयोग विकास धस व विराज खामकर,द्वितीय – विनया जाधव व आदित्य पागिरे तर तृतीय – नील बांदेकर यांस गौरवण्यात आले.तर प्रत्येक गटातून पाच उत्तेजनार्थ बक्षीसे,लहान गट एकूण ४० विशेष उत्तेजनार्थ बक्षिसे मान्यवरांच्या उपस्थित देण्यात आली.या कार्यक्रमास सुदाम साळुंके,नवनाथ सूर्यवंशी,कैलास भागवत,श्रीम.सुनिता इंगळे, श्रीम.शबाना शेख,राजेंद्र पोटे,अकबर शेख,बालाजी नाईकवाडी,अशोक शेटे, श्रीम.मनिषा पांढरे,निलेश दौंड,श्रीम.सुशिला गुंड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आष्टी शहरामधील नामांकित वसुंधरा प्राथमिक विद्यालयात इयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेत असलेला चि.सुयोग विकास धस याने बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर आपल्या सुवाच्च आणि सुंदर हस्ताक्षराने अनेक जणांना भुरळ घातली आणि भल्याभल्यांना लाजवले होते.

बालसंस्कार समूह महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून सुयोगने आष्टी तालुक्याचेच नव्हे तर बीड जिल्ह्याचे नाव मोठ केले आहे.सुंदर हस्ताक्षराचं कौशल्य सुयोगकडे त्याच्या माता – पित्याकडूनच त्याला प्राप्त झालेले आहे.अगदी कमी वयामध्ये राज्यातून पहिला येण्याचा बहुमान मिळवणं ही आपल्या सर्वांसाठी खूपच अभिमानास्पद बाब आहे.
महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे सुयोग विकास धस या चिमुकल्याचे आ.बाळासाहेब आजबे, आ.सुरेश आण्णा धस,मा.आ.भीमसेन धोंडे, मा.आ.साहेबराव दरेकर, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तहसीलदार राजाभाऊ कदम, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, विस्तार अधिकारी धनंजय शिंदे,अर्जुन गुंड,वसुंधरा शाळेचे संस्थापक मनोरंजन धस,आदर्श मुख्याध्यापक सुरेश पवार,सर्व केंद्रप्रमुख,शिक्षक वृंद, मित्र, पत्रकार यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.सुयोगचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.