पुरोगामी महाराष्ट्र राज्यात धर्म व जातीचे नावाने नको ते उपदव्याप?

37

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात देशभर साजरी झाली. 131 व्या जयंती निमित्त प्रबोधन झाले, सांस्कृतिक कार्यक्रम झाले. वाचन झाले .उत्सव आहे ,समजून घेण्याचे आणि अभिवादन करण्याचे वेगवेगळे माध्यम आहेत. तरुणांचा उत्साह खूप दिसला. कोविड च्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतरची ही जयंती. महापुरुषांचे विचार पेरण्याचे काम झाले. अनेक वर्षांपासून होत आहेत आणि पुढे ही होत राहील . गरज आहे.

2. बाबासाहेबांची जयंती साजरी केली, ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली, ताकद ही मिळाली. आनंद झाला. कारण बाबासाहेबांचा स्वाभिमान ,चारित्र्य, त्याग, शील, शिक्षण ,विद्या , जीवन संघर्ष, सामाजिक क्रांतीची आंदोलने . माणसाला माणूसपण व संधी देणारी संविधानाची मूल्ये अशा अनेक पैलूंवर प्रबोधन झाले. बाबासाहेबांचे विचार स्वीकारून त्यावर मार्गस्थ होणे फार गरजेचे आहे असे सांगितले गेले. दरवर्षी हेच सांगतो आपण सगळे एकमेकांना, मात्र मनावर घेणारे किती असतील? काही मूल्यमापन, हिशोब।

3. या दोन्ही गुरू शिष्याने जे जे सांगितले त्यावर कृती कार्यक्रम आणि वर्षभर त्याची निष्ठेने अमलबजावणी होणे आवश्यक आहे. पुढच्या 132 व्या जयंती ला आयोजित कार्यक्रमात उपलब्धी रिपोर्ट सादर करून यश अपयशाची चर्चा करण्याचा कार्यक्रम घ्यावा लागेल. त्यात सामाजिक आर्थिक विकासाचा कार्यक्रम अंतर्भूत करावा.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या: “लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात रक्तविहिन मार्गाने क्रांतिकारी बदल घडवून आणणारी शासन पद्धती-राज्यव्यवस्था :” म्हणजे लोकशाही. तेव्हा, बजेट ,बजेट चा वापर, बजेट साठी कायदा, शिष्यवृत्ती, फ्रीशिप, भूमिहीनांना जमीन, निवाऱ्यासाठी पक्के घर, वस्तीत सेवा सुविधा, रोजगार ,उपजीविका, सन्मान, सुरक्षा ,शिक्षण आरोग्य हे प्रश्न आहेत. चर्चा झाली पाहिजे. योजना आहेत, कशा राबविल्या जातात याकडे लक्ष दिले पाहिजे . जयंती साजरी करणाऱ्या सर्वांचा हा वर्षभऱ्याचा कार्यक्रम ठरला पाहिजे. आपण स्वतः शी प्रामाणिक नसू तर इतरांशी कसे प्रामाणिक राहणार?

4. पुरोगामी महाराष्ट्र राज्यात धर्म व जाती चे नावाने नको ते उपदव्याप काही राजकीय नेत्यांनी सुरू केले आहे. हे लोक महापुरुषांची नावे घेतात, अभिवादन ही करतात, जल्शोष ही करतात मात्र काम सामाजिक सलोखा बिघडविण्याचे करतात असेच दिसते. मीडिया अश्या घटनांना खूप प्रसिद्धी देते तेही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य चा हक्क म्हणून. मीडिया चे वर्तन ही चांगले नाही. याकडे सर्व मीडिया नि दुर्लक्ष करून पाहावे. प्रयोग करायला काय हरकत आहे. एकूणच, अराजकता माजविण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे की काय अशी दाट शंका येते. पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय असे घडत आहे. राजकीय सत्ता प्राप्ती चा हा खेळ निंदनीय व खेदजनक आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

5. शोषित- वंचित वर्गाचे खूप प्रश्न आहेत. शैक्षणिक ,सामाजिक, आर्थिक विकासाचे, न्यायाचे प्रश्न आहेत. यावर ,नेत्यांनी शक्ती खर्च घालावी व शासन प्रशासनाला जाब विचारायचे सोडून, यंत्रणा भलत्याच unproductive कामाला जुंपली जात आहे. असे घडत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी , जिजामाता, सावित्रीमाई, रमाई, इत्यादींची जयंती साजरी करण्याचे फलित नकारात्मक कसे काय? महापुरुषांच्या बाबत चांगले बोलायचे आणि विपरीत वर्तन करायचे ही स्वतःशीच धोकेबाजी आहे, बेईमानी आहे.

6. जातिनिर्मूलनाचे काम करण्याऐवजी जातीव्यवस्था मजबूत करण्याचे काम देशात होत आहे, महाराष्ट्र राज्य यास अपवाद नाही हे अलीकडच्या घटनांवरून दिसून येते. सत्ताधारी आणि विरोधक सारखे एकमेकांविरुद्ध बोलत आहेत. दोन्हीकडील अंधभक्त झगडत आहेत. अजूनही अनेक गोष्टी आहेत. प्रशासन सुस्त होत आहे.

7. सरकारच्या कोणकोणत्या विभागाने जयंती कशाप्रकारे साजरी केली ह्याचा अहवाल सरकारने कलेक्टर कडून मागवावा. शाळेत 14एप्रिल ची जयंती कशी करावी ह्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने GR/परिपत्रक काढून दिले होते. ह्याचे कितपत अनुपालन झाले हे विभागाने पहिलेच पाहिजे. अन्यथा GR ची अवहेलना म्हणजे सरकारी आदेशाचे उल्लंघन होय.उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा ही केली पाहिजे. संविधान जागृतीचे आदेश असताना पालन होत नाही. ही मानसिकता धोकादायक आहे.

8. शासन प्रशासनातील लोकांनी सचोटीने वागावे, संवेदनशीलता चा परिचय द्यावा. भ्रष्ट्राचार करू नये, शोषण करू नये, अन्याय करू नये. तरच शोषित वंचितांना न्याय मिळेल.भ्रष्टचार करणारा , अप्रामाणिक होऊन कायदा राबविणारा कोणताही अधिकारी -कर्मचारी, नेता , मंत्री इत्यादी समाजाला व देशाच्या लोकशाहीला धोका आहे, संविधानाचा पराजय अशा लोकांच्यामुळे होणार आहे,होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील 25 नोव्हेंबर 1949 चे भाषण वाचावे. इशारा देतात, सल्ला देतात, अंधभक्त होऊ नका, सांगतात संविधानिक लोकशाही मार्गांचा अवलंब करा, राजकीय लोकशाही सामाजिक आर्थीक लोकशाहीत लवकर परावर्तित करा. ज्यांचे हातात संविधानाची सत्ता व अधिकार आहे ते विपरीत वागताना दिसतात. हेच देशाच्या अखंडतेला बाधक आहे.बाबासाहेबांनी जे सांगितले ते आपण स्वीकारणार नसू तर जयंती साजरी करण्याचे प्रयोजन फेल होते. बाबासाहेबांच्या विचारांचा स्वीकार व अंमल ही काळाची गरज आहे. बोलणाऱ्यांनी तरी आदर्श वर्तनाचे उदाहरण दाखवून द्यावे, फक्त बोलून चालणार नाही.

9. भारत ही बुद्धभूमी आहे. तेव्हा, समता, स्वातंत्र्य, बंधुता ,न्याय, चे काम झाले पाहिजे. शांतता, मानवता, मानवी प्रतिष्ठा व मानवी कल्याण ही वैश्विक नीतिमूल्ये जोपासण्याचे, त्यानुसार जीवन जगण्याचे बळ या तत्वज्ञानातून मिळते. राष्ट्रनिर्माणासाठी असे करणे आवश्यक आहे. जयंतीचा हा उद्धेश सफल करणे आपले कर्तव्य आहे. 1 मे ला महाराष्ट्र दिवस आहे. स्वातंत्र्य चे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संविधान लागू झाले ,देश प्रजासत्ताक झाला. भारत एक राष्ट्र झाले आहे, 135 कोटी लोकांचे राष्ट्र. नेत्यांनो, भारताला जाती- धर्माचे प्रांत – भाषेचे नावाने ,विभागू नका. असे करणे आपल्या संविधानिक कर्तव्यात बसत नाही. कर्तव्याचे वाचन करा.

10. दि 01मे 2022 ला संविधान वाचण्याचा कार्यक्रम करा. मानसिक गुलामीतून बाहेर येण्याचा मार्ग संविधान वाचण्याने जरूर सापडेल. भोंगे लावण्याची व उतरविण्याची गरज भासणार नाही. खरं तर, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बाबासाहेब यांचे संविधान सभेतील 25 नोव्हेंबर1949 चे भाषण वाचावे, संविधानिक नीतिमूल्ये जोपासून त्यानुसार वर्तन करण्याची प्रेरणा नक्की मिळेल. संविधानाचा सन्मान हे देशप्रेम व देशाभिमानाचे कर्तव्य आहे. प्रथमत:भारतीय व अंततः ही भारतिय ही बाबासाहेबांची शिकवण लोकशाही समृद्ध करते आणि देश घडवते. घडविणारे बना, बिघडविणारे नाही.

✒️इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि(संविधान फौंडेशन,नागपूर)M-9923756900