मोर्शी येथे शिवभोजन थाळीचा शुभारंभ !

81

🔸आमदार देवेंद्र भुयार यांनी केले उद्घाटन !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.1मे):- महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडी सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीबांसाठी शिवभोजन थाळी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली. या भोजन थाळीचा गोरगरिबांना व गरजूंना लाभ मिळावा. यासाठी स्थानिक जयस्तंभ चौक मोर्शी येथे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा शिवभोजन थाळीचे संचालक सुरेशचंद्र विटाळकर यांच्या नेतृत्वात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले असून या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन आज दि. 1 मे महाराष्ट्र दिनी मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेशजी वानखडे शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख यांनी भूषविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी विलासराव मुसळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा नगरसेवक रवींद्रभाऊ गुल्हाने, युवा उद्योजक जगदीश जयस्वाल, शिवसेनेचे मोर्शी शहर प्रमुख घनश्याम शिंगरवाडे, न. प. चे माजी उपाध्यक्ष मोहनभाऊ मडघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्रभाऊ जिचकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, पत्रकार अजय पाटील, शेरखान, विलास ठाकरे, दिलीप गवई, मिलिंद पन्नासे, अभी व्यवहारे, अजय कोंडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून आ. देवेंद्र भुयार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांच्या शुभहस्ते फित कापून शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिवभोजन थाळी केंद्राचे संचालक सुरेशचंद्र विटाळकर सौ. विटाळकर यांच्या हस्ते सर्व अथिति गन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या शिवभोजन थाळीत दोन पोळ्या, एक वाटी वरण, एक वाटी भाजी, एक वाटी भात राहणार असून गोरगरीब व गरजूंसाठी केवळ दहा रुपयात देण्यात येणार असून दरवर्षी एक मे महाराष्ट्र दिनी गोड जेवण देण्याचा मनोदय शिवभोजन थाळीचे संचालक सुरेशचंद्र विटाळकर यांनी व्यक्त केला. यावेळी शिवभोजनाची सुरुवात करणाऱ्या महिलांचा आ. देवेंद्र भुयार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुरेशचंद्र विटाळकर यांनी केले.