नाशिक जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी कोरोना केअर सेंटर व डेडिकेटेड हॉस्पिटल उभारण्याची सिटू ची मागणी

33

✒️ शांताराम दुनबळे(नाशिक, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.1ऑगस्ट):-जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये (सातपूर, अंबड, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर) या तालुक्यांमध्ये औद्योगिक कामगारांमध्ये कोरोना लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा गावागावांमध्ये प्रसार होत आहे. परिणामी वाढत्या रुग्णांचे विलगीकरण करणे व त्यांना उपचार उपलब्ध करणे कामी अनेक अडचणी येत आहेत. अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही व त्यांना अनेक हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागत आहेत. तसेच तसेच खाजगी हॉस्पिटल कडून या रुग्णांना अवाजवी बिले आकारून प्रचंड पिळवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी कोरोना केअर सेंटर व डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी उद्योगांशी चर्चा करावी व या उद्योगांनी असे कोरोना सेंटर आणि हॉस्पिटल उभारावे अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे व जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांनी केली आहे.

उद्योग सुरू करताना महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन काटेकोरपणे केले जात नसल्यामुळे कोरोणाचा प्रसार वेगाने होत आहे. यासंदर्भात उद्योगांनी स्व प्रमाणपत्र देऊन उद्योग सुरू केले आहेत. परंतु शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्ती, सूचनांचे पालन होते की नाही हे बघण्याची कुठलीही प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात नाही. उद्योजकांच्या स्वप्रमाणपत्रावर विश्वास ठेवणे अवघड आहे. अनेक उद्योगात या सर्व अटी शर्ती व सूचनांचे पालन केले जात नाही असा आरोपही डॉक्टर कराड यांनी केला आहे. काही उद्योगांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत परंतु यांनी प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी
उद्योजकांनी महाराष्ट्र शासनाच्या अटी शर्तीचे पालन केले की नाही हे तपासण्याची व त्याची काटेकोर अमंल करण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही लागण होत आहे. अशा रुग्णांना विलगीकरण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नाही. नाशिक जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी तालुकानिहाय व शहरांमध्ये त्यांच्या खर्चाने कोरोना केअर सेंटर व डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल उभारावेत यासाठी योगदान केले पाहिजे अशी मागणी डॉक्टर कराड यांनी केली आहे. यासाठी पालकमंत्री म्हणून मोठ्या उद्योगांशी चर्चा करून असे सेंटर आणि हॉस्पिटल उद्योगांनी सुरू करण्याबाबत पुढाकार घ्यावा अशी विनंती डॉक्टर कराड यांनी पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांना केली आहे.

असे झाल्यास शासन व प्रशासनावर दबाव कमी होईल व जिल्‍ह्यातील रुग्‍णांना विलगीकरण कारणे व उपचार करणे शक्य होईल. असेही सिटूच्या निवेदनात म्हटले आहे.

या संदर्भात कामगार संघटना सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार असल्याचे डॉक्टर कराड यांनी निवेदनात म्हटले आहे.