सांगताना विज्ञान, जगताना अज्ञान

78

राष्ट्रीय विज्ञान दिनांच्या सदिच्छा सर्वच स्तरावर बघण्यात आल्या. ही अत्यंत परिवर्तनकारी बाब आहे. सगळे जन विज्ञानाकडे वळून अज्ञानाला दूर करून एक आदर्श विज्ञानवादी जिवन जगण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला पाहिजे. पण विज्ञान दिवस साजरा करून होणार नाही तर विज्ञान समजून घेऊन वागणे महत्त्वाचे असते. आपण वेगवेगळे दिवस या साठी साजरे करत असतो की किमान वर्षातून एकदा तरी त्या दिवशी त्या विषयांची किंवा क्षेत्राची समीक्षा व्हावी. समिक्षा कशासाठी तर आपण जगताना त्या विषया संदर्भात कीती बदल केले आणि किती बदल अपेक्षित आहेत याचा लेखा जोखा म्हणजे समिक्षा असते. कोणत्याही बाबीची समिक्षा झाली तर प्रगती आणि अधोगती लक्षात येत आहे. खर तर आपल्या कडे एक मोठी खंत आहे आपण दिवस साजरे करतो पण त्या दिवसाचे महत्त्व किंवा जाणीव आपल्याला राहत नाही.

जसे आपण विज्ञान दिवसाचेच उदाहरण घेतले तर आम्ही विज्ञान दिन हा सोशल मिडीयावर सदिच्छा व्यक्त करून साजरा केला. विज्ञान जर समाजामध्ये रूजवायचे तर फक्त सोशल मिडीयावर विज्ञान दाखवून जमणार नाही. विज्ञान कृतीमध्ये पाहिजे. विज्ञानाचा अर्थ समजून घेऊन वागायला सुरवात करणे म्हणजे विज्ञान दिन साजरा करणे होय. भारताला विषेशतः महाराष्ट्राला विज्ञानवादाची खुप मोठी परंपरा मिळालेली आहे. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करत आलेले आहोत. विज्ञान दिनांच्या सदिच्छा बघुन चांगलेही वाटले आणि मनाला दु:खही वाटले. याचे कारणही तसेच आहे. विज्ञान दिन सोशलमिडीयावर साजरा करणाऱ्या बऱ्याच लोकांना विज्ञानाचा अर्थ च माहिती नाही तरी दुसरे लोक सदिच्छा देतात म्हणून त्यांनी दिल्या.

मी तर सर्वात अगोदर त्या लोकांना विज्ञान दिनांच्या सदिच्छा देऊ इच्छितो जो वर्ग शिकलेला सवरलेला आहे, आणि लग्न फक्त आपल्याच जातीत पोटजातील मुलामुलींशी करण्याचा अट्टाहास धरतो, आणि वेगवेगळ्या जातीतील व्यक्ती शी प्रेमसंबंध वा लग्न केलेच तर रक्त तांडव होते आणि मग जातीच्या नावाखाली पुन्हा न्याय मागायला रस्त्यावर येतात अशा सर्वांना व त्यांच्या समर्थकांना खुप खुप सदिच्छा?* काय चाललेय देशामध्ये विज्ञान दिन साजरा करायचा आणि जातीचा विषय आला तर जिवघेणे कृत्य करायचे पण मानसाचा स्वीकार करायचा नाही. विज्ञानाच्या दृष्टीने मानसाच्या किती जाती आहेत? आपण किती माणतो? जाती ला चिकटून राहणारा विज्ञानवादी होऊ शकतो का? वरिल प्रश्नच कोणाच्या डोक्यात आले नाही म्हणून उत्तर मिळण्याची अपेक्षा करणे मुर्खाचे ठरेल.
आम्हाला जिवन जगताना विज्ञानवाद किंवा विज्ञान मुळात पुस्तकात शिकायची गरजच नाही फक्त आमचे डोके जाती धर्माच्या बाहेर काढून विचार केला तर भारत जागतिक विज्ञान दिन भारताच्या नावावर साजरा करू शकतो.

पण आम्ही तर्क करत नाही, आणि जातीधर्माच्या बाहेरचा परिवर्तनवादी विचार आमच्या डोक्यात येत नाही. विज्ञानामुळे आमचे जिवन सोईस्कर व सुखमय झाले असे आपण माणतो. वेगवेगळ्या शोधाच्या माध्यमातून मानवाला भरपूर सुखसुविधा निर्माण झालेल्या आहेत. हे फक्त विज्ञानामुळेच. आपण वैज्ञानिक दृष्टीने बघितलं तर भारतामध्ये लेण्या कशा कोरल्या असतील, की ज्या लेण्या आज बघायचं झाले तर आपल्याला टॉर्च लाऊन बघावं लागते जेव्हा घनदाट जंगल आणि लाईट चा शोध नव्हता तेव्हा कशा कोरल्या असतील? छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले बघीतले तर आज आपण रिकामे चालत जाऊ शकत नाही तर गडावर मोठमोठे दगड कसे नेले असतील, कोणते यंत्र वापरले असेल, कोणत्याही प्रकारचे इंजिनिअरिंग चे शिक्षण नसताना एवढ्या मोठ मोठ्या वास्तु कशा निर्माण झाल्या असतील यावर आम्ही कधी चर्चाच करत नाही. कारण आम्हाला विज्ञान कळालं नाही म्हणून तर्क करण्याची क्षमता आमच्या मध्ये उरलीच नाही. थोडक्यात विज्ञान म्हणजे फक्त शाळेत शिकवले जाते तेवढेच विज्ञान नाही. तर जिवन जगताना आपण कसे जगतो हे सुद्धा विज्ञान आहे.

आज आपण बघितलं तर आम्ही विज्ञानाशी भावनिक वा गांभीर्याने वागत नाही पण अज्ञान आणि बुवाबाजी विषयी आम्ही भावनिक आहोत. आम्हाला विज्ञान शिकवले जाते तरी आम्ही अज्ञान शिकतो, जगतो आणि अज्ञानाशी भावनिक होतो. विज्ञान काय आहे हे आमच्या संतांनी आम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितले आपण संताच्या विचाराचे पालन जरी केले तरी आम्ही विज्ञानवादी बनतो. संत कबिरापासून तर गाडगेबाबा, पर्यंत आम्हाला विज्ञानवादाची शिकवण दिली पण आम्ही स्विकारली नाही. आणि अज्ञान आणि अंधविश्वास डोक्यात घेऊन त्याला महत्त्व दिले, अंधविश्वासावर कोणी बोलले तर भावना दुखणाऱ्यांचे प्रमाण खुप आहे. परंतु जेव्हा अंधविश्वास जोपासला जातो तेव्हा आमच्या संताचे विचार पायदळी तुडविले जातात पण भावना मात्र कोणाच्या दुखत नाही. जसे संत कबीर म्हणायचे

जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान,
मोल करो तलवार का, पड़ा रहन दो म्यान।

आजही आपण बघतो कोणाचे कौतुक करायच्या अगोदर जात बघितली जाते, काही ठिकाणी तर कौतुक फक्त जातीचेच केले जाते तर की ज्या जातीचा आणि विज्ञानाचा तिळमात्रही संबंध नाही. आपण संत तुकाराम महाराज यांचे अभंग जर बघितले तर आपल्या लक्षात येईल जिवन जगताना विज्ञानाचा वापर कसा करायचा तो. संत तुकाराम महाराज म्हणतात-

नवसे कन्यापुत्रे होती तरी का करावे लागे पती

नवस केल्याने लेकरं होतात तर पतीची गरजच काय असा तिखट प्रश्न करून संत तुकाराम महाराज यांनी आम्हाला चारशे वर्षाअगोदर विज्ञानाचा रस्ता दाखवला. परंतु आम्ही संत तुकाराम महाराज यांच्या रस्त्याची कधीच ओळख करून घेतली नाही. विज्ञानाचा वापर कसा करायचा याचे सर्वोत्तम गुरू म्हणजे संत तुकाराम महाराज होत म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्यात सत्यनारायणाचा उल्लेख आढळत नाही आणि अवस्येविषयी सर्व गैरसमज दूर करून छत्रपती शिवरायांनी जास्तीत जास्त लढाया ह्या अमावस्येला च जिंकल्या त्याच अमवस्येला आजही मुहूर्त निघत नाही ते काम शिवरायांनी करून दाखवले कारण गुरु संत तुकाराम महाराज होते.
कधीच शाळेत न जाणारे राष्ट्रसंत ज्यांनी संपूर्ण जगाला विज्ञान शिकवले ते गाडगेबाबा अस म्हणतात-

जत्रा मे बिठाया पथरा
तिरथ बनाया पाणी
पैसो की धुलधानी
भाई दुनिया हुई दिवानी

अशा शब्दांत प्रबोधन करून आम्हाला अज्ञानापासुन दूर नेण्याचा महामार्ग या संताने दाखवला. हे खरे विज्ञानवादाची संत आमचे मार्गदर्शन आहेत.सोशल मिडीया वर विज्ञान दिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीच्या घरात, संत कबीर, संत नामदेव, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी, अशा विज्ञानवादी संताचे फोटो सुद्धा नाहीत. शनिवारी, अवस्येला दाढी कटींग न करणाऱ्या लोकांनी विज्ञानदिनांच्या सदिच्छा देऊन नेमके काय साध्य केले असेल? खरच आपण सोशल मिडीयावरच नाही तर जिवनात विज्ञानवाद स्विकारारायचा असेल तर संताची वाणी, ओव्या आपल्याला मार्गदर्शक ठरतात नाही तर आजही प्रचंड अंध्दविश्वास, भेदभाव येथे निर्माण झालेला आहे तो जोपर्यंत दुर होणार नाही तोपर्यंत विज्ञान दिवस खऱ्या अर्थाने साजरा होणार नाही.

✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते(रा. आरेगांव ता. मेहकर(मोबा: ९१३०९७९३००)