छत्रपती संभाजी राजे आणि कवी कलश

35

[छ.संभाजीराजे भोसले स्मृती दिन]

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले हे छत्रपती शिवराय व सईबाई यांचे थोरले चिरंजीव तथा मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. त्यांचा जन्म दि.१४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना बालपणापासूनच मिळाले. संभाजी राजांच्या आई महाराणी सईबाईंचे निधन ते लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील गाडे ही कुणबीण त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाऊ यांनी केला. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई सोयराबाईंनी त्यांना पोरकेेेपणाने वागवून त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्नही केला.

इ.स.१६७४ मध्ये छ.शिवरायांचा राज्याभिषेक झाला तोवर संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे व रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकास रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना आपलेसे केले होते. नंतर १२ दिवसात मातोश्री जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्याकडे मायेने लक्ष देणारे कोणी उरले नाही. छ. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात व रणांगणावर गुंतले असताना तरुण शंभूराजांचे दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद झाले. त्यांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवरायांनी अण्णाजी हे अनुभवी व कुशल प्रशासक म्हणून त्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी राजांना ते मान्य नव्हते, त्यामुळे ते राजांच्या विरोधात गेले. दरबारातील काही मानकरी शंभूराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले, हे केवळ अण्णाजीच्या सांगण्यावरुन. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवरायांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत शंभूराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवरायांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून शंभूराजांना पाठवावे लागले.

त्यांचे राजब्रीद वाक्य – “श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||” हे होते. अर्थ – शिवाजी पुत्र संभाजीची ही मुद्रा सूर्यप्रभेप्रमाणे शोभते आहे व या मुद्रेची आश्रयदायी लेखासुद्धा कुणावरही सत्ता चालवते. छ. संभाजी महाराजांना साधु संतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेव भट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतातील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. त्यांना राजपद महत्प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता. त्यांचा मंचकारोहण सन १६८० साली झाला. दानपत्रात शंभूराजांच्या स्व-हस्ताक्षरातील ओळी पुढील प्रमाणे आहेत – “|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज || || छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री ||” यात तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये कले होते. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा शाहजीराजांस निशायुद्ध प्रवीण तसेच ‘हैन्दवधर्म जीर्णोद्धाकरण घृतमति’ म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालून हिंदवी धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील छ.शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘म्लेंव्छक्षयदीक्षित’ म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले, असा करतात. यावरून छ.शंभूराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन घडते.

इ.स.१६८९च्या सुरुवातीला छ.संभाजी राजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. दि.१ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून ते रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने नागोजी माने यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली व सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत व शत्रूसैन्यात चकमक झाली. संख्याबळ कमी असल्याने प्रयत्‍नांची शिकस्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले. त्यानंतर छत्रपती शंभूराजेंसह सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड आताचे धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने शंभू राजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्ट नकार दिला. औरंगजेबाने दोघांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढली. तरीही छ.संभाजी महाराजांनी शरणागती पत्करली नाही. तेव्हा दि.११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला.
!! त्यांच्या अनेक अविस्मरणीय स्मृतींना पुरोगामी संदेश परिवारातर्फे विनम्र अभिवादन !!

✒️संकलक व लेखक:-श्री निकोडे कृष्णकुमार गुरुजी.
[हिंदी-मराठी साहित्यिक तथा इतिहासाचे अभ्यासक.]मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा. नं. ७४१४९८३३३९.