कोरोनाने संपवली ‘चळवळ’! अकोल्यातील प्रा. मुकुंद खैरेंचं कुटुंब कोरोनाने उद्ध्वस्त

24

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.5मे):-अकोला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वच जण सैरभैर झाले आहेत. या आजारानं काही ठिकाणी अख्खी कुटूंब उद्ध्वस्त केली आहेत. नियतीच्या या फेऱ्यानं अवघ्या काही दिवसांत अनेक हसती-खेळती कुटूंब दु:खाच्या वाळवंटात पार होरपळून निघाली आहेत. अगदी असंच झालं आहे अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील प्रा. मुकुंद खैरे यांच्या कुटूंबाचं. आज सकाळी प्रा. मुकुंद खैरे यांचं अकोला येथे कोरोनावर उपचारादरम्यान निधन झालं. कोरोनानं अवघ्या पंधरा दिवसांत प्रा. खैरे यांच्या घरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 19 एप्रिलला प्रा. खैरे यांच्या पत्नी छाया यांचं अकोल्यात कोरोनावर उपचारादरम्यान निधन झालं. तर 2 मे रोजी त्यांची 32 वर्षीय वकील असलेली मुलगी शताब्दी यांचं निधन झालं. तर आज सकाळी प्रा. खैरे यांचाही कोरोनानं मृत्यू झाला. 

कोण होते प्रा. मुकूंद खैरे : 
प्रा. मुकूंद खैरे हे समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष होते. 6 डिसेंबर 1991 मध्ये त्यांनी या संघटनेची स्थापना केली होती. प्रा. खैरे हे अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील गाडगेबाबा महाविद्यालयातून राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते. प्रा. खैरे आंबेडकरी चळवळ आणि संविधान अभ्यासकांतील मोठं नाव होतं. समाज क्रांती आघाडीच्या माध्यमातून त्यांनी दलित आणि आदिवासींचे प्रश्न व्यापकपणे मांडलेत. 1991 ते 2004 या काळात विदर्भात समाज क्रांती आघाडीची चळवळ ऐन भरात होती. त्यांच्या नेतृत्वात अनेक जिल्ह्यांमध्ये दलित आदिवासींच्या प्रश्नावर निघालेले हजारोंचे मोर्चे त्याकाळी चर्चेचा विषय झाले होते. प्रा. मुकुंद खैरे यांनी राज्यभरात राज्यघटनेवर अभ्यासपुर्ण व्याख्यानं दिली आहेत.

गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी आपल्या चळवळीला राजकीय अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. प्रा. खैरै यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या ‘रिपब्लिकन डावी लोकशाही समिती'(रिडालोस) कडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांनी चार हजारांवर मतं घेतली होती. तर 2014  मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून 25 हजारांवर मतं घेतली होती. रिपब्लिकन चळवळ दलितांपूरतीच मर्यादित न राहता ती अधिक व्यापक होण्यासाठी ते कायम आग्रही राहिलेत. 

नियतीच्या फेऱ्यात अडकलेलं खैरे कुटूंब : 
प्रा. मुकूंद खैरे यांच्या कुटूंब म्हणजे पत्नी छाया आणि अर्चना, शताब्दी आणि श्वेता अशा तीन मुली. वैचारिक आणि सामाजिक अधिष्ठान लाभलेलं हे मुर्तिजापूरातील अतिशय आनंदी असं सुंदर कुटूंब. त्यांचं कारंजा रोडवरील घर मुर्तिजापूरसह जिल्ह्यातील आणि चळवळीतील अनेकांसाठी मदत मिळण्याचं हक्काचं केंद्र होतं. मात्र, 2004 पासून या कुटूंबाला नियतीची नजर लागली की काय?, असा प्रश्न पडणाऱ्या घटना घडल्या आहेत. 29 फेब्रुवारी 2004 ला प्रा. मुकूंद खैरे यांच्या एका सभेला हे कुटूंब कारने जात असतांना त्यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. या अपघातात प्रा. खैरे यांची मोठी मुलगी अर्चना हिचा जागीच मृत्यू झाला होता. तर या अपघातात स्वत: प्रा. खैरे आणि लहान मुलगी गंभीर जखमी झाले होते.

या अपघातातून खैरे आणि लहान मुलगी बचावले. या अपघातानंतर प्रा. खैरे यांच्या चळवळ आणि आंदोलनाची गती काहीशी मंदावली. मात्र, त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही. मात्र, कोरोनानं या कुटूंबाला नेस्तनाबूत करून टाकलं. अवघ्या पंधरा दिवसांत या कुटूंबातील तीन जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. 19 एप्रिलला प्रा. खैरे यांच्या पत्नी छाया यांचं अकोल्यात कोरोनावर उपचारादरम्यान निधन झालं. तर 2 मेला त्यांची 32 वर्षीय वकील असलेली मुलगी शताब्दी यांचं निधन झालं. शताब्दी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पाच वर्षांपासून वकीली करीत होत्या.

अतिशय कमी वयात त्यांनी उच्च न्यायालयातील हुशार आणि अभ्यासू वकील म्हणून लौकिक मिळविला होता. तर आज सकाळी प्रा. खैरे यांचाही कोरोनानं मृत्यू झाला. तब्बल वीस दिवसांपासून त्यांचा रूग्णालयात कोरोनाशी संघर्ष सुरू होता. प्रा. खैरे यांची सर्वात लहान मुलगी श्वेता हिच्यावर अवघ्या पंधरा दिवसांत आई, बहीण आणि वडील यांच्या चितांना अग्नि देण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. 
सध्याचा काळ हा अतिशय अस्वस्थ करणारा आहे. कोरोनानमूळे दररोज घडणाऱ्या घटनांनी समाजमन पार सैरभैर झालं आहे. अशा काळात कोरोनापासून स्वत:ची काळजी घेणं, स्वत:ला जपणं हेच सर्वात पहिलं औषध आहे. प्रा. मुकूंद खैरे आणि कुटूंबातील दिवंगत सदस्यांना  ‘ भावपूर्ण श्रद्धांजली!.