अस्पृश्य समाजाचे विद्रोही संत !

26

(संतशिरोमणी चोखोबा पुण्यतिथी विशेष)

संतश्रेष्ठ चोखोबा हे एक संतकवी होते. ते संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रभावळीतले महान संत होते. संतश्रेष्ठ नामदेवजी हे त्यांचे गुरू होते. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे संत चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, विटाळ, अस्पृश्यता, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले होते. ते सांगतात – “जन्मता विटाळ मरता विटाळ।चोखा म्हणे विटाळ आदिअंती।आदि अंती अवघा विटाळ साचला। सोवळा तो झाला कोण न कळे।। चोखा म्हणे मज नवल वाटते। विटाळापरते आहे कोण।।”संतशिरोमणी चोखा मेळा अर्थात संत चोखोबा हे यादव काळातील संतश्रेष्ठ नामदेवजींच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. त्यांची जन्मतिथी अज्ञात आहे. मात्र त्यांचे जन्मस्थळ विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी हे गाव असल्याचे सांगतात. तर संत चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात. संत चोखा मेळांचे कुटुंब हे जातीने महार होते.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या द्वाराजवळ असलेली त्यांची समाधी तथा मंदिर याची ग्वाही देत आहे. ते मूळचे वऱ्हाडातील आहेत, असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्म मेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असत. तरीही ते सगळे नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण तथा गुणसंकीर्तन करीत होते – “आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण। वेदांचे वचन न कळे आम्हा।। चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा। गाईन केशवा नाम तुझे।।” संतश्रेष्ठ चोखा मेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते. ते उदर निर्वाहासाठी मोलमजुरी करत. पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्र्य, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला.

त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे, असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती. ते रागानेच विठ्ठलास म्हणत – “जोहार मायबाप जोहार।तुमच्या महाराचा मी महार। बहु भुकेला जाहलो। तुमच्या उष्ट्यासाठी आलो।। आमुची केली हीन याती। तुज कां न कळे श्रीपती। जन्म गेला उष्टे खाता। लाज न ये तुमचे चित्ता।।”चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही ही संत ज्ञानदेवजींमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संतशिरोमणी चोखोबाजी म्हणतात, “खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटी भावे डोळा।।” असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठा व अभेद्य भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी, असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.

संस्कारसंपन्न, संवेदनक्षम व विद्रोही संतश्रेष्ठ चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्‍न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो.इ.स. १३३८मध्ये म्हणजेच १४व्या शतकात संत चोखोबा मातीखाली गाडले गेल्याच्या कारणाने ब्रह्मलीन झाले. का? तर ते गावकुसाच्या कामात व्यस्त असताना दरड कोसळल्याचे सांगितले जाते. त्यांनी देह त्यागल्यानंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून त्यांचे गुरूवर्य संत नामदेवजींनी त्यांच्या अस्थी ओळखून त्या गोळा केल्या व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली, असे चरित्रकार सांगतात.आज त्यांच्या समाज बांधवानी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे संतशिरोमणी चोखोबांच्या अभंगांचे पारायण कोणीही करत नव्हते. अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंगगाथा पारायणास मंगळवेढा जि.सोलापूर येथे सन २०१३मध्ये थाटामाटाने सुरुवात केलेली आहे. कारण – “ऊस डोंगा परि। रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा?।। चोखा डोंगा परि। भाव नोहे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा?।।”

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे पावन पुण्यतिथी निमित्त संतशिरोमणी चोखा मेळाजींच्या पावन चरणी विनम्र अभिवादन !!

✒️संत चरणधूळ:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.C/o – प. पू. गुरूदेव हरदेव कृपानिवास,मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली (७७७५०४१०८६).
ई-मेल – Krishnadas.nirankari@gmail.com